समाज, धर्म आणि संशोधन

मानवी प्रगतीचा इतिहास बघताना, इतिहासलेखन सुरू झाल्यानंतर युरोपातला सर्वात भयंकर काळ असं ज्याला म्हणता येईल ते मध्ययुग, अंधारयुग पाचवं ते पंधरावं शतक या हजार वर्षांचं होतं. याला अंधारयुग समजतात, कारण या काळात प्रचंड प्रमाणात युद्ध झाली, अनेकविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात लोक मेले. शांतता, सुबत्ता यांचा हा काळ नव्हता. शांतता नव्हती म्हणून कला, विज्ञान, (सामाजिक) शास्त्र, अशा अनेक बाजूंनी युरोप मागे पडला. तिथल्या समाजावर ख्रिश्चन धर्माचा अतिशय गाढ पगडा बसला आणि त्यातून जगाचं दीर्घकालीन नुकसानच झालं. त्या आधी असणार्‍या प्राचीन ग्रीको-रोमन संस्कृतींमधे कला, संगीत, विज्ञान, शास्त्र यांचा अभ्यास होत होता. असंही म्हणतात की चौथ्या शतकात अलेक्झांड्रियाच्या हायपेशियाला पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे लक्षात आलं होतं. ख्रिश्चन धर्म, त्यातल्या तेव्हाच्या (आता वेडगळ/अडगळ ठरलेल्या) समजुती आणि समाजावर ख्रिश्चॅनिटीचा असणारा पगडा विद्वानांना वेळेत न उमगणे, यातून तत्कालीन युरोपीय समाजाची अधोगती झाली. ही अधोगती एवढी वाईट समजली जाते की युरोपीय भाषा आणि त्यांच्यातून आपल्याकडेही कालबाह्य मूल्यांना ‘मध्ययुगीन’ म्हणण्याची प्रथा आलेली आहे. चौदाव्या शतकाच्या आसपास युरोपात सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू झालं, ज्याला आता renaissance असं नाव पडलेलं आहे. या रेनेसाँनंतर कला, विज्ञान, सामाजिक शास्त्र या सर्व शाखांमध्ये युरोपची प्रगती पुन्हा सुरू झाली. मध्ययुग अथवा रेनेसाँचा धांडोळा घेणं हा या लेखाचा आवाका नाही. समाजाच्या धारणा, धर्म, संशोधन आणि संशोधनातून होणारी मानवी प्रगती यांचा आपसातला संबंध मोजक्या उदाहरणांवरून थोडक्यात पाहणं हा या लेखाचा उद्देश आहे.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते याचा हायपेशियाला चौथ्या शतकात अंदाज आला होता तर निकोलस कोपर्निकस १५व्या शतकात येईपर्यंत काय झालं? महत्त्वाचं असं काहीही नाही. विश्व पृथ्वीकेंद्री आहे हे दाखवण्यासाठी विश्वरचनाशास्त्र प्रचंड किचकट बनवलं गेलं. पृथ्वीभोवती अन्य ग्रह, सूर्य आणि इतर तारे फिरतात, असा त्या काळात समज होता. तत्कालिन युरोपीय समाज बहुतांशी ख्रिश्चन होता, आणि ख्रिश्चॅनिटीमधे विश्वाची कल्पना पृथ्वीकेंद्री असण्याची होती. पण या सिद्धान्तामधे ग्रह वक्री* का होतात याचं स्पष्टीकरण अतिशय क्लिष्ट होतं. एका मुख्य कक्षेत ग्रह पृथ्वीभोवती फिरतात. ग्रह वक्री का होतात यासाठी epicycles आणली गेली. पेनाची स्प्रिंग ताणून वर्तुळाकार बनवली तर कसा आकार दिसेल, ग्रह तशा प्रकारच्या कक्षेत फिरतात असा सिद्धात मांडून ग्रहांच्या वक्री गतीचं स्पष्टीकरण देण्यात आलं. मंगळ आणि शनी या दोन ग्रहांची निरीक्षणं करून कोपर्निकसला पृथ्वी सूर्याभोवती फिरते याचा अंदाज आला. एवढंच नाही तर पृथ्वीची सूर्याभोवती असणारी कक्षा वर्तुळाकार नाही, दीर्घवर्तुळाकार आहे, असा त्याचा निष्कर्ष होता. अतिशय क्लिष्ट स्पष्टीकरण देण्यापेक्षा ‘सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात’ असं मानल्यास या वक्री गतीचं स्पष्टीकरण देणं अगदीच सोपं होतं. (पुढे न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमानंतर epicycles पूर्णतः मोडीत निघाली.) कोपर्निकसच्या निधनानंतर त्याच्या या सिद्धान्तावर धार्मिक तत्त्ववेत्त्यांकडून बरीच टीका झाली. अगदी कोपर्निकसला त्याच्या पूर्वसुरींनी काय म्हटलेलं आहे हे समजलं नाही, ते त्याच्या विचारात शास्त्रीय पद्धत नाही, इथपर्यंत.

पुढे खरा त्रास मात्र गॅलिलेओने भोगला. कोपर्निकसचा विश्वरचनेचा** सिद्धान्त आणि त्याबद्दल असणारे वाद इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलेओपर्यंत पोहोचले होते. गॅलिलेओने कोपर्निकसच्या सिद्धान्ताला पाठिंबा दिला; आणि चर्च आणि धर्माच्या विरोधात ही कृती असल्याचं समजलं गेलं. पृथ्वी हलत नाही असं बायबलमधील संदर्भांमधे लिहिलेलं आहे आणि गॅलिलेओने ते नाकारलं होतं. इथे सरळसरळ धर्माने विज्ञानात (किंवा विज्ञानाने धर्मात!) ढवळाढवळ केलेली होती. या धर्मबुडवेपणाबद्दल गॅलिलेओला तुरूंगात डांबलं गेलं. एवढंच नाही, तर गॅलिलेओच्या पूर्वप्रकाशित लिखाणावर बंदी आणली गेली आणि त्याला पुढे लिहायलाही बंदी केली गेली. पुढे रोमन कॅथलिक चर्चमधल्या प्रभावी व्यक्तींशी मैत्रिपूर्ण संबंध राखण्यामुळे त्याच्यावरची बरीच बंधनं शिथिल झाली. त्याने पुढे काही वर्ष आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया रचणारं कामही केलं. पण मरणानंतरही गॅलिलेओच्या नशिबात उपेक्षाच होती. त्याच्या वाडवडलांच्या आजूबाजूच्या जागेत त्याचं दफन करू देण्यास कॅथलिक चर्चने नकार दिला. धर्मातल्या अशास्त्रीय समजुतींपायी, धर्म बुडवला म्हणून गॅलिलेओला 'मरणान्तानि वैराणि'चा फायदा मिळाला नाही.

कोपर्निकसच्या आणि गॅलिलेओच्या या इतिहासाचं आजही महत्त्व आहे का?

धर्माचा आणि पूर्वापार चालत आलेल्या समजुतींचा पगडा एवढा जबरदस्त होता की आईनस्टाईनसारखा थोर शास्त्रज्ञही त्याला बळी पडला. गणिताच्या माध्यमातून विश्वरचनेचं कोडं सोडवताना तो त्याचा भौतिक अर्थही लावत होता. त्या समीकरणांमधून त्याला स्पष्ट दिसत होतं की विश्व प्रसरण पावत आहे. पूर्वीच्या समजुतींचा पगडा एवढा जबरदस्त, की त्याने विश्वाचं प्रसरण गणितातून काढून टाकण्यासाठी एक स्थिरांक मध्ये घुसवला. थोडक्यात, समीकरणांमधलं विश्वाचं प्रसरण त्याने काढून टाकलं.*** दु:खात सुखाची गोष्ट अशी की या समजुतीपायी विज्ञानाची प्रगती फार वर्ष अडकली नाही. विश्वाचं प्रसरण होतंय हे एडविन हबलने निरीक्षणांमधून काही वर्षांतच शोधून काढलं. त्यातून पुढे विश्वनिर्मितीचा प्रसिद्ध सिद्धान्त 'बिग बँग' अथवा 'महास्फोट' याचा पाया रचला गेला.

प्राचीन काळात काही चिनी राजज्योतिषांना (फलज्योतिषी नव्हेत, ज्योतिषी) जीव गमवावा लागला होता, त्याची अलीकडेच आठवण झाली. कारण, तर त्यांना ग्रहण वर्तवता आलं नाही. ग्रहणाचा पृथ्वीवर, मनुष्यावर काय परिणाम होतो, याची तेव्हा कल्पनाही नव्हती. तरीही त्यांना जीव गमवावा लागला. लाक्वियामधला भूकंप वर्तवू शकले नाहीत किंवा या भागात भूकंप होऊ शकतो याचा अंदाज देऊ शकले नाहीत म्हणून इटालियन न्यायालयाने काही संशोधकांना अगदी गेल्याच महिन्यात दोषी ठरवलं आणि सहा वर्षांसाठी गजाआड केलं. भूकंपाचा अगदी अ‍ॅक्युरेट (मराठी?) अंदाज कोणीही वर्तवू शकत नाही. हे सांगताना सुलभीकरण करून सांगितलं जात असलं तरीही सामान्यांपर्यंत काय संदेश गेला आहे? शास्त्रज्ञ भविष्यातल्या दु:खद घटनांचा अचूक अंदाज घेऊ शकले नाहीत तर त्यांच्यावर दावा गुदरता येतो. संशोधनाच्या भविष्याच्या, विज्ञानाच्या आणि त्यामुळे प्रगतीच्या दृष्टीने ही घटना खचितच आनंददायक नाही१.

एका मराठी दिवाळी अंकाच्या लेखासाठी हा विषय अगत्याचा का वाटला?

अलीकडेच फेसबुकाच्या एका मराठी ग्रूपमधे चर्चा करताना प्राचीन भारतीय शिल्प, भारतीय संस्कृती, कला आणि नग्नता असा विषय निघाला. सहाजिकच त्या चर्चेत लज्जागौरीचा उल्लेख झाला. घटस्थापनेला या मातृकेचा उल्लेख "या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता" अशा प्रकारे झाला. धागाकर्त्याच्या अपेक्षेच्या विपरीत हे मातृरूप नसून स्त्रीदेहाची विटंबना असण्याचे आक्षेप आले. मातृरूप एका विशिष्ट रूपातच पाहावे असा आग्रह धरणे अनावश्यक आहे. एकेकाळी आपले पूर्वज या रूपात मातृकेची पूजा करत, याबद्दल रा.चिं.ढेरे यांनी संशोधन केलेलं आहे. त्या संशोधनाकडे, संदर्भांकडे दुर्लक्ष करून स्वत:च्याच, मर्यादित मोजपट्ट्या लावून ते शिल्प हिडीसच आहे म्हणून भावना दुखावून घेणं प्रकर्षाने दिसलं. विशेषतः दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या चर्चेत ढेर्‍यांच्या संशोधनाची संभावना पिवळ्या पुस्तकात झाली आणि पुस्तकं निरुपयोगी असण्याचं मत हे पुन्हा पुन्हा कोपर्निकस-गॅलिलेओची आठवण करून देणारं वाटलं.

देवदेवतांची नग्न चित्रं काढणार्‍या मकबूल फिदा हुसेन, ऊर्फ एम.एफ. हुसेन यांच्या निधनानंतर अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा निषेध झाला. काही मर्यादेपर्यंत सुसंस्कृत प्रकारचाही हा निषेध होता. पण अनेक ठिकाणी 'मरणान्तानि वैराणि' हे तत्त्व पुन्हा एकदा विसरलं गेलं. अखेरच्या दिवसात हुसेनवर आपल्या जन्मदेशातूनच परागंदा होण्याची वेळ आली. गॅलिलेओला आपल्या वाडवडलांसोबत पुरण्याचा हक्क मिळाला नाही, चारशे वर्षांनंतर हुसेनची अवस्थाही काही फार निराळी झाली नाही. गॅलिलेओने म्हणे एक धर्म बुडवला होता विज्ञानाच्या नावाखाली, हुसेनने म्हणे दुसरा धर्म बुडवण्याचा प्रयत्न केला, कलेच्या आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली. पण हुसेनच का, संशोधकांबद्दलही अतिशय अनुदार उद्गार आजही काढले जातात.

इतर सर्व संस्कृतींप्रमाणेच, आपल्याकडेही जननाला आणि पर्यायाने जननीला फार महत्त्व आहे. खरं तर यात संस्कृती, धर्म यांचा फार भाग नाही; ही भावना उत्क्रांतीमधून आलेली आहे२. वंशसातत्य, आपली गुणसूत्र टिकवून ठेवण्याची आणि एक सजीववर्ग म्हणून संपूर्ण समूहाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड हे इतर सर्व प्राण्यांप्रमाणेच माणसांमध्येही आलेलं आहेच. 'शिर सलामत तो पगडी पचास' अशा प्रकारच्या सामान्य वापरातल्या म्हणींमधूनही तगून, टिकून राहण्याचं महत्त्व वारंवार दिसतं. त्यामुळे नवीन जिवाच्या जन्माला आणि तो जन्माला घालणार्‍या जननीला सर्वच संस्कृतींमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे, अगदी गर्भ कसा तयार होतो हे समजण्याच्या आधीपासूनच३. अर्थातच त्या काळात औषधं, सुबत्ता फार नव्हती, यंत्रं फारच कमी कामं करत असत. त्यामुळे अधिक मुलांना जन्म देणारी स्त्री (किंवा इतर प्राण्यांमधली मादी) ही अधिक महत्त्वाची समजली जात असे, किंवा मनुष्यांमध्ये पूजनीय होती. उत्क्रांतीच्या या प्रवासामुळे 'लज्जागौरी' ही माता आपल्याकडे पूजनीय होती. नग्नतेकडे बघण्याची आपली दृष्टी आज मात्र एवढी स्पष्ट आणि स्वच्छ नाही.

लज्जागौरीवर संशोधन करणार्‍या ढेरेंनी इतर देवतांवरही संशोधन केलं. पंढरपूरचा विठोबा मूळचा कर्नाटकातला, या त्यांच्या संशोधनावर समाजातून टीका झाली. ग.वा. बेहेरे 'सोबत' नावाचं नियतकालिक प्रकाशित करत. त्यात राजा राजवाडे यांनी ढेर्‍यांच्या संशोधनावर टीका करणारा लेख लिहिला. बेहेरे यांनी हा लेख छापला आणि शेजारी एक टिपण लिहून राजवाडे यांना सज्जड समज दिली, "शेवटी तुम्ही काय आणि मी काय, दीडदमडीचे पत्रकार आहोत. ढेरे यांच्यासारखे व्यासंगी लोक चार भिंतीत बसून जी ज्ञानसाधना / संशोधन करत असतात, त्यातून निष्पन्न झालेली गोष्ट भले जनसामान्यांच्या भावनांना न झेपणारी असो, आपण ती कशी पचवता येईल ते पाहायला हवं. त्या विरोधात लोकांना भडकावणे ही अक्षम्य चूक आहे."४

भावना, धर्म या गोष्टीही उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर महत्त्वाच्या आहेत. एक समाज म्हणून टिकून राहण्याच्या दृष्टीने माणसात असणार्‍या भावनांचं आणि धर्माचं महत्त्व आहे. पण मनुष्याचं अस्तित्व फक्त टिकून राहणं इथवरच मर्यादित नाही. टिकून राहणं तर मेंदूचा फार विकास न झालेल्या प्राण्यानांही जमतं. माणसाची खरी शक्ती आणि वेगळेपण त्याच्या मेंदूत आहे. या मेंदूत आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची शक्ती आहे. ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करून अस्तित्वाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात. कोणी उत्क्रांतीचा अभ्यास करतं, कोणी खगोलशास्त्राचा; तर कोणी मानवी मनात डोकावून बघतं. कलाकारांच्या अभिव्यक्तीमधून समाज किती प्रगत आहे याचा अंदाज येतो; म्हणून पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यासही अस्तित्वाचा अर्थ लावण्यात महत्त्वाचं ठरतं. या अभ्यासात, संशोधनात, नवीन विचार मांडण्यात वस्तुनिष्ठता आणि तर्कशुद्ध विचार जेव्हा भावनेपेक्षा वरचढ असतो, तेव्हा समाजाची प्रगती होते. पूर्वग्रह, मर्यादित आकलनावर अवलंबून असणारे धर्माधिष्ठित समज समाजाच्या प्रगतीच्या कोणत्याही टप्प्यावर मारकच ठरतात. संशोधनाच्या इतिहासात हे वेळोवेळी दिसलेलं आहे. या इतिहासातून बोध घेणं आपल्या हातात आहे.

---

* अनेक महिने ग्रहांची गती पाहिल्यास ग्रह हे तार्‍यांच्या पार्श्वभूमीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसतात. काही काळाकरता ग्रहांचे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकणे म्हणजे वक्री.
** आधुनिक विज्ञानात याला ग्रहगणित समजलं जातं. आज ज्याला विश्वरचनाशास्त्र समजलं जातं, ते त्या काळात अस्तित्वात नव्हतं.
*** आता या स्थिरांकाची किंमत शून्य समजली जात नाही, शून्य आणि एकच्या अध्येमध्ये याची किंमत असावी, असा अंदाज आहे. सध्या विश्वरचनाशास्त्रातला हा एक 'हॉट टॉपिक' आहे.

---

१. http://www.guardian.co.uk/science/brain-flapping/2012/oct/24/most-danger...
२. कहाणी मानवप्राण्याची - नंदा खरे आणि इतर
३. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - वि. का. राजवाडे
४. सतीश तांबे, अंशत: खासगी संवादातून.

footer