शेवटचा प्रवास...

एसी बसमधून प्रवास करताना एक छान बरं वाटतं. बाहेर उकाडा असला तरी आत बर्‍यापैकी
गार असतं. मी वाचायचा प्रयत्न केला, पण काही जमलं नाही. मग डोळे मिटून घेतले.

ट्रिंग ट्रिंग

खिशातला मोबाईल वाजला. तंद्री उडाली. वत्सला? बर्‍याच दिवसांनी फोन करतेय बाई.
“बोला वत्सला. काय म्हणताय?” मी कुणालाच एकेरी नावाने हाक मारीत नाही. "काही नाही. बसलेल्या स्थितीत आहे. मी आणि माझा परमेश्वर."
( हाहाssss हाssss गडगडाटी हास्य. थोडी व्हिम्सिकल.)

ड्रायव्हर ब्रेक मारतो. गचका बसतो.

मी हं हं करत राहतो आणि ऐकत राहतो. तिला कुणाशीतरी बोलायचं असतं आणि माझाही डोळे मिटूनच प्रवास चालू आहे. ऐकायला काय जातंय? तिलाही जरा बरं वाटेल. तसं इतर कुणी भेटलं नाही की तिला माझी आठवण येते, असं बर्‍याच पूर्वीपासून माझ्या लक्षात आलंय. ठीकाय, मला काही फरक पडत नाही. वेळ असला तर बोलतो, नाहीतर कट करतो. तिने फोने करून विचारलं तर सांगतो, “नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल.”

“बोल, बोल”

“काय झालं? तुला वेळ आहे नं? नाहीतर म्हणशील, बाई काय बोअर करतेय.”

“नाही, तसं काही नाही. बसने प्रवास करतोय, त्यामुळे अध्येमध्ये नेटवर्क तुटतंय. तू बोलत राहा, मी ऐकतोय.”
नोकरी गेल्यापासून बिचारीची अवस्था फार वाईट झाली आहे. एक तर वेळ खायला उठला आणि आपण काहीच करत नाही, त्यामुळे मनही खातंय. कुणाशी बोलताना तिला सतत वाटत राहतं, आपण बोलतोय पण समोरच्याला वेळ आहे नं?

“तुला बरंच सांगायचं होतं. आपली काही भेट होत नाही. फोनवरच बोलू या. तुझं काय चाललंय?”

“खास काही नाही, रूटीन.”

“हो ना? मला सध्या बरेच काही काही अनुभव येतात. कुणाशी बोलणार? तुला काय अनुभव येतात? मी या विषयावर फक्त तुझ्याशीच मोकळेपणे बोलते. बाकी कुणाशी या विषयावर बोलण्यात अर्थ नाही. उगाचच लोकांचे गैरसमज होतात आणि ते इतकेतिकडे काहीतरी बोलत राहतात.

मला वाटतं, आता माझी शेवटची स्थिती असावी. डोळे मिटले की दर्शन, अशी अवस्था झालीय. त्यामुळं झोपही येत नाही, मग काय करणार? जे दाखवतात ते बघत बसते. शेवटी सद्गुरूंची इच्छा.

पूर्वी बराच वेळ लागायचा. आता एकदम भृकुटीवरूनच सुरुवात होते. स्वर्गाचं दारच उघडल्यासारखं वाटतं, लख्ख प्रकाश. एकदम शार्प लाईट. कुठून येतो कळत नाही. एकदम प्रसन्न वातावरण – काहीतरी उत्सव असल्याची दर वेळी भावना. एकदम छान.

रात्री झोपायचा प्रयत्न करताना ही अवस्था व्हायची. आता कधीकधी दुपारी जेवणानंतर लोळत पडले असतानासुद्धा एकदम सुरू होते. कधी तंद्री लागेल, सांगता येत नाही.” (हिला काय भास होतात काय? की खरच दृष्टान्त मिळतात?)

“खालचं शरीर एकदम थंडावलेलं. श्वास चालू असतो. सगळं ओपन होतं. डोळे मिटलेले, पण आत विस्फारलेले. एक-दीड क्षण दर्शनाचा सोहळा. समाधी का काय म्हणतात ती अवस्था असावी. मग लक्षात आलं, आज संकष्टी चतुर्थी. मोठी करतात. रमेश म्हणाला, काहीतरी व्यवस्थित कर. मी म्हटलं आज मला कंटाळा आलाय, काहीही केलं तरी सारखं उरतं. कुणीच खात नाही, मी काही करणार नाही. पण दुपारी पडल्या पडल्या गणपतीचं दर्शन. मग उठल्यावर काम सुरू केलं. आपल्याकडून सगळं काही करवून घेतात, काही सोडत नाहीत. मग मी तळलेले मोदक केले, सगळा स्वयंपाक केला,

रमेश आला आणि चकित झाला. त्याला कुठे सांगत बसू, त्यांचं दर्शन झालं म्हणून? त्याचा विश्वास नाही. त्याला वाटतं, मला सगळे भास होतात. मग पूजा वगैरे करून सगळे छान जेवलो.”

"काय बाकी?"

“माझा आराम चालू आहे. मी पडून असते, बघत बसते. घरातली कामंही पटकन आटपून जातात. मग नुसता वेळच वेळ. बघत बसते. आडवी झाले की प्रवास सुरू. त्यापेक्षा नुसती बघत बसते, तर पोरं बसू देत नाहीत – आई, नुसती काय बसलीस? काहीतरी कर, नाहीतर उगाचच काहीतरी घेऊन येतात आणि विचारत बसतात. त्यांना माझी काळजी वाटते, ते बघून मला गंमतच वाटते. पोरं घरी नसली की काही विचारू नकोस. केव्हा माझी तंद्री लागेल सांगता येत नाही. वाचता वाचता चालू होतं. टीव्ही बघता बघता समोरची दृश्यं जाऊन माझ्या मनातली अवस्थाच स्क्रीनवर दिसायला लागते आणि खरं सांगते, भयानक भीती वाटते.

समोर अथांग निळा रंग पसरलेला असतो. त्याच्यात अधूनमधून लाटा पुढे-मागे होताना दिसतात. ज्योतींच्या माळा लागलेल्या असतात; पोटात, स्वामींच्या हृदयात त्या पेटतात आणि चालू लागतात त्या. चालतचालत अस्त पावतात आणि नवीच ज्योत तयार होऊन प्रवासाला निघालेली असते. सर्वत्र विलक्षण उजेड पसरलेला असतो. बरं वाटतं, पण भीतीही वाटते ......”

परत एकदा गचका बसतो, पण लाईन तुटत नाही.

“ खरं तर ही अवस्था प्राप्त व्हायला तीन गोष्टी असाव्या लागतात. कुठलीही तिरस्काराची भावना नको, कुठलीही लाज नको आणि कुठलीही भीती मनात नको, अशा अवस्थेला मन न्यायचं, म्हणजे खुपच तपश्चर्या करावी लागते. पण माझं काहीतरी वेगळंच आहे. मी सुरुवातीपासूनच तयार आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही तिरस्कार नाही, मला कशाचीही लाज वाटत नाही, म्हणजे त्यांनी काही सांगितलं तर ते करायला माझी तयारी असते.
पण मनात अजूनही थोडी भीती शिल्लक आहे. कसली आहे, ते सांगता येणार नाही. तिच्यावर मात केली पाहिजे. पण कशी, ते समजत नाही. ते झालं तर मग पूर्णावस्था साध्य होईल.”

“काय सांगताय?”

“हो ना, ते खरं आहे. पण कुणाचाच विश्वास बसत नाही. रमेशचासुद्धा नाही. तो असल्या विषयावर बोलूच देत नाही आणि सारखा म्हणत असतो, उगाचच काहीतरी विचार करीत जाऊ नकोस. घरी वेळ जात नसेल तर माझ्याबरोबर ऑफिसात चल, तिथे तुला काम देतो. त्यामुळे आजकाल मी त्याला काही सांगत नाही.
समोर प्रचंड महाकाय उजेड दिसला की दिपून जायला होतं आणि काहीशी भीती वाटते रे बाबा. सूक्ष्म स्थरावर सगळं काही होत राहतं. शरीरावर एक प्रकारचं शिथिलपण येतं.

सगळं हळूहळू ओपन होत जातं. तेच सगळं करवून घेतात. आपल्याला काही करावं लागत नाही. तुझा काय अनुभव आहे? पण शांतपणे करून घेतात, ओरबाडल्यासारखं करीत नाहीत.

मला वाटतं, आता हे सगळं सहन करता येत नाही. कुठेतरी वाट करून दिली पाहिजे. हे सगळं फिलॉसॉफिकली सांगता आलं पाहिजे. कदाचित माझ्या हातून हे लिहूनसुद्धा होईल. पण काही करावंस वाटत नाही. कुणीतरी माझ्याकडून करून घेतलं पाहिजे.
(मी फक्त फोन कानाला लावून ऐकतो आहे. समोरचा माणूस बघत राहतो. काचेतून बाहेर बघतांना चमत्कारिक दृश्य दिसतंय. म्हणजे बाहेर बघताना बाहेरचे दिवे आणि माणसे दिसतातच, पण त्याचबरोबर मागच्या बाजूचं दृश्यही काचेत दिसतंय.)

“बसल्या बसल्या कंठातून काहीतरी बाहेर येतं, ॐचा आवाज ऐकू येतो – तो माझाच असतो की आणखी कुठून येतो, ते कळत नाही. तो फक्त मलाच ऐकू येतो की इतरांनाही ऐकू येतो, समजत नाही.
पडून राहावंस वाटतं. देईल तो प्रसाद घ्यायची तयारी हवी. काय करणार आहेत, मलाच कळत नाही. माझ्या सगळ्या अपेक्षा आणि वासना गळून पडल्यात, पण माझ्या भोवतीच्या इतरांचे काय? नवरा, मुलं.. माझ्याकडून त्यांच्या काही अपेक्षा आहेत की नाही? त्या तरी पूर्ण कराव्या लागणार आहेत ना? मध्येच सगळं सोडून उठून निघून जाता येईल का? त्याचीच भीती वाटते. माझ्या पोरांचं काय, ती अजून लहान आहेत.

नुसतं बसलं तरी हे सगळे प्रकार सुरू होतात. नुसतं बघत बसावंसं वाटतं. कुणाला फोन करू नये, असं वाटतं. मुलं बळजबरीने हातात फोन देतात, त्यामुळे थोडंफार बोलते. बहिणी, वहिनी म्हणतात, तुझं काय, तुला काही कामच नसतं, कसलंच टेन्शन नाही. तुझं बरं आहे. काय संगाणार त्यांना? त्यांना सांगूनही काही कळत नाही. उगाचच आणखी प्रॉब्लेम होतात. मग त्या शेवटी म्हणतात – अगं बाई, काळजी घे बरं, उगाचच नसते काहीबाही विचार करीत बसू नकोस. पोरं लहान आहेत. आता त्यांना काय सांगणार?

भृकुटीवरून सुरू होणारा प्रवास हा शेवटचा असतो, असं म्हणतात. मला फार भीती वाटते रे! सूक्ष्म स्वरूपात गेल्यावर फार अवघड असतं ती अवस्था टिकवून ठेवणं. अहंकाराला जागा नसते. स्वतःला विसरावं लागतं, तरच शांतता अनुभवायला मिळते. तुला बोअर नाही ना होत? मी आता या विषयावर कुणाशी बोलायचं टाळते. कारण, लोकांना कळत नाही आणि मग आपापसात उगाचच काहीतरी चर्चा करत राहतात.

काल आईला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. परत ऑपरेशन आहे. मी उद्या जाणार आहे. जाऊन तरी काय करणार? आज सकाळी घरी जाऊन आले. शेवटी सगळं सोडून काही संन्यास तर घेतलेला नाही.

कधीकधी मी मनातच बोलत असते. काहीही मनात अपूर्ण ठेवू नकोस, नाहीतर पुनर्जन्म ठरलेला आहे. सगळं इथेच जाळून टाक, इथेच काय करायचं ते करून टाक, तरच सूक्ष्म काय ते कळेल.”
(बस स्टॉपवर थांबली आहे. ही काय म्हणतेय, कळत नाहीय. मी आपला ऐकत राहतोय.)

“ शरीराच्या बाहेर जाता येतं का? येतं, असं म्हणतात. मी कुठेतरी वाचलंय, जे. कृष्णमूर्ती यांच्या पायावर शस्त्रक्रिया करायची होती, तेव्हा ते म्हणाले, मला अनास्थेशिया देऊ नका, दहा मिनिटांनंतर खुशाल करा. तेवढ्या वेळात ते सूक्ष्मात गेले. त्यांना काही कळलं नाही. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया पूर्ण केली. थोड्या वेळाने ते शुद्धीवर आले.
माझ्या ब्रेस्टमध्ये लहान सिस्ट होता. औषधं चालू होती. एकदा स्वप्नात स्वामी आले, त्यांनी काठीच्या टोकाने ब्रेस्टमध्ये शिरून काहीतरी काढून फेकून दिलं. त्यानंतर काही दुखलं नाही. आणि टेस्टमध्येही काही आलं नाही. कुणाला सांगितलं नाही. कुणाचा विश्वास बसणार नाही आणि उगाचच आणखी काहीतरी विचारात बसतील.”

“तू हे सगळं लिहून का काढत नाहीस? असे अनुभव फार थोड्यांना येतात.”

“नाही रे बाबा. लिहिते कसली... मला धड सरळ विचार करता येत नाही. जे अनुभव येतात, ते सगळे लक्षात राहतात असं नाही. जेवढे राहिले, त्याच्या १० टक्केसुद्धा सांगितले नाहीत. यातलं बरंचसं शब्दांच्या पलीकडचं असतं.
काहीतरी बिझी राहिलं पाहिजे. रमेश म्हणतो ते खरं, असं कधीकधी वाटतं. डॉक्टर म्हणतात, तुम्हाला बीपी आहे. तुम्ही बीपीच्या गोळ्या घ्या, नाहीतर एकदम काहीही होऊ शकेल. काय व्हायचं असेल ते होऊ दे. मीसुद्धा आता कंटाळले आहे. धड तुमच्यात नाही, धड त्यांच्यात नाही. मध्ये त्रिशंकूसारखी अवस्था झाली आहे.

परत जॉब करायची आता इच्छा नाही. तेचतेच करून कंटाळले होते, म्हणूनच तर जॉब सोडला आणि इतकी गॅप पडल्यानंतर आता कोण बोलावणार आहे का, तूच सांग.”

“तेही खरं“, मी आपला उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.
बोलता बोलता तिचा आवाज अचानक गायब झाला. फोन खरंच कट झाला असावा. मी परत जोडण्याचा प्रयत्न केला नाही. तिचाही आला नाही. मी मुलुंड म्हाडा कॉलनीचा स्टॉप आल्यावर उतरलो. नेहमीसारखी सहा गावठी अंडी घेतली आणि रिक्षा करून मुलुंड पश्चिमेला घरी आलो.

काहीतरी चुकल्यासारखं वाटत राहिलं. जेवण झाल्यावर सकाळचे राहिलेले पेपर वाचायला घेतले तर त्यावर निळा रंग ओसंडून चाललाय, असा भास झाला. त्या निळ्या रंगाचा तांबडा भडक झाला, मी चमकलो.
फोन वाजला, त्यामुळे लिंक तुटली. जुना सहकारी फोनवर होता.

“वत्सला गेली. हार्टफेल.”

...