संपेल ना कधीही, हा खेळ चाकरांचा

जे नसते, तेच हवे असते हा तर अजरामर सिद्धान्त. लहान असताना आपल्याला कधी मोठे होऊ असे वाटत असते आणि मोठे झालो की ’गेले ते बालपण, गेले ते रम्य दिवस’ अशी हुरहुर लागते. मग बालपण आणि शाळेतले दिवस यावरच्या मेलांवर मेला येतात ज्यात ’गेले ते दिवस’ असा सूर लावणारे मुक्तक वा कविता असतात. कुणाला चिंचा आठवतात, कुणाला मधली सुट्टी आठवते, कुणाला न केलेले गृहपाठ आणि त्याबद्दल झालेल्या शिक्षा आठवतात, तर कुणाला बालपणी खेळलेले खेळ आठवतात. तसे म्हटले तर हे स्वाभाविक वाटते. पण मोठे झाले, नोकरीला लागले म्हणजे सगळे खेळ संपले, अशीच एक भावना का असते बरे? पटतंय? छे! मला तरी नाही पटत. साफ चूक. कोण म्हणतो खेळ संपले? किंबहुना व्यावसायिक जीवनात जितके खेळ खेळले जातात, तितके उभ्या बालपणात मैदानातही खेळले जात नसतील! मला तरी आतापर्यंत असा अनुभव आहे. अगदी सर्व स्तरात खेळ खेळले जातात. कारकुनांचे खेळ, अधिकार्‍यांचे खेळ, व्यवस्थापकांचे खेळ ... एकूण सगळाच खेळखंडोबा. बघा तुमच्या आस्थापनेतही असे खेळ खेळतात का ते?

कागदाची विमाने उडविणे - मवि (मराठीत त्याला एच आर म्हणतात)चे लोक हा खेळ मोठ्या हौसेने खेळतात. फार रंगणारा खेळ. न कंटाळता हे लोक रोज नवीने विमाने उडवितात आणि कर्मचारी ’पोरखेळ’ म्हणून ती सोडून देतात.. कुणी एखादे विमान चुकून धरेल तर शपथ. मागे एकदा एका कर्मचार्‍याने सरळ सरळ मवि व्यवस्थापकाला सांगितले होती की “साहेब, एवढे कागद वाया घालवण्यापेक्षा मला चार पैसे देत जा. त्याबद्दल मी आख्ख्या कचेरीत फिरून निरोप तोंडी सांगेन.” असो. न का वाचेनात कुणी? फर्माने काढण्यात मविचा वेळ तर छान जातो. खरे सांगू का, मुळात परिपत्रक (मराठीत त्याला सर्क्युलर म्हणतात) हा अत्यंत निरुपयोगी प्रकार आहे. मग ते छापील स्वरूपात असो, विरोप स्वरूपात असो वा अंतरजालीय पटलावर डकवलेले असो. माझा ठाम सिद्धान्त आहे, जर एखादी गोष्ट परिणामकारकरीत्या कचेरीतच काय, पण आस्थापनेच्या भारतभरातील सर्व शाखांमध्ये तत्परतेने पोहोचवायची असेल, तर उगाच परिपत्रकांचा प्रपंच करण्यापेक्षा जे काही सांगायचे असेल त्याचे चार कागद छापावेत, मग त्या छापील परिपत्रकाची घडी घालून त्याला टाचणबंद करून व वर मोठ्या अक्षरात ’गोपनीय’ असे लिहून ते कागद कचेरीतील अनुपस्थित असलेल्यांच्या, तसेच ’आकाशवाणी’ म्हणून ख्याती पावलेल्या महाभागांच्या कार्यासनावर ठेवावेत. काही तासातच मजकूर जगजाहीर झालेला दिसेल! पण असे झाले तर विमानांचा खेळ कोण खेळणार?

आंधळी कोशिंबीर - उत्पादन विभागातले कर्मचारी, संगणकीय क्षेत्रातले प्रणाली / आज्ञावली लिहिणारे, क्रय विभागातले यांचा आवडता हा खेळ. खेळात सहभागी असतात ते संलग्न विभागांचे कर्मचारी. साहेब आपल्या विक्री / पणन विभागातील कर्मचार्‍यांना आपल्या उत्पादनाविषयी काही वैशिष्ट्ये सांगतो. ते लोक ग्राहकाकडे आणि काही सांगतात. ग्राहक आणखी काही समजतो आणि आपल्या उपभोक्त्या विभागाला विचारून आपली मागणी नोंदवतो. मग आपल्या उत्पादन / विकसन विभागाच्या प्रमुखाला विक्रीवाले ती मागणी सांगतात. तो प्रमुख त्याला जे समजेल तसे आपल्या लोकांना कळवितो. मग चेपू, खाजगी विरोप, खरेदी संस्थळे यांच्या अध्ययनात मग्न कर्मचारी त्यांच्या मर्जीनुसार ऐकतात आणि जे समजले त्याप्रमाणे आपल्या सवडीने निर्मित वा विकसित करतात. अखेर ग्राहक जेव्हा आपल्या पदरी पडलेले फळ पाहतो तेव्हा त्याला चक्करच येते! मागितला हत्ती आणि मिळाला रेडा. मग तो परतपाठवणी करतो आणि उलट्या भाजणीने एकमेकावर राज्य ढकलायचा खेळ सुरू होतो. खेळाची सुरुवात होते ती उपभोक्ता विभागात. आपल्यावर राज्य आले हे समजताच ते डोळ्यावर पट्टी बांधून गरगरा फिरतात आणि आपल्या समन्वयकाला शिवतात. मग राज्य समन्वयकावर. समन्वयक राज्य घेतो आणि क्रय विभागाच्या प्रमुखाला हात लावतो. क्रय विभागवाला पुरवठादाराच्या विक्रेत्याला पकडतो. विक्रेता आपल्या उत्पादन प्रमुखाला पकडतो. उत्पादन विभागाचा वा विकसन प्रमुख आपल्या अधिकार्‍याना धरतो. तो अधिकारी निर्मितीचे सामान पुरविणार्‍या या क्रय विभागाच्या अधिकार्‍याला वा आपल्या चमूत नको ती माणसे टाकणार्‍या मवि विभागाला पकडतो. अशी ही आंधळी कोशिंबीर मस्त रंगते. ग्राहक हा नावाला राजा असला तरी राज्य त्याचे कधीच नसते, ते इतर सर्व जण उपभोगात असतात आणि दुसर्‍यावर देत असतात.

किंमत जंमत घसरगुंडी - व्यवस्थापन आपल्याला एखादा अतिरिक्त कार्यभार देणार असे ध्यानात येताच आपण फारच कार्यग्रस्त असल्याचा आव आणावा लागतो. मग एखादी संधी अचूक पकडून व्यवस्थापकीय संचालक, संचालक वा किमानपक्षी वित्त विभाग अध्यक्ष यांना गाठून गंभीर चेहर्‍याने सांगावे की आस्थापनेचा नफा कसा वाढेल याचा आपण विचार करतोय. वा! असे काही ऐकताच हे लोक तुमच्याकडे मोठ्या आदराने बघू लागतात. मग आपणही गंभीरपणे सांगायचे की अमुक उत्पादनाची किंमत अमुक टक्के घटवली तर खप तमुक टक्के वाढेल आणि जुना खप * जुने टक्के विरुद्ध नवा खप * नवे टक्के नफा यात नव्या नफ्याची रक्कम अधिक आहे. शिकारी कुत्र्यासारखे कान टवकारलेले हे लोक ताबडतोब चारचौघांना गोळा करतात आणि मग नवा खेळ सुरू होतो – ‘किंमत जंमत घसरगुंडी’. आपापल्या संगणकावर एक्सेलच्या चौकड्या आखायच्या आणि आकड्यांची मारामारी करायची! गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, गुणोत्तर वगैरे भरपूर हाणून झाले की त्या चौकड्या एकमेकांवर भिरकावायच्या. एकाने उत्पादन खर्च कमी केलेला दाखवला तर दुसर्‍याने दर्जाची काळजी व्यक्त करायची आणि ’ग्राहक दुरावेल, नाव खराब होईल’ अशी भीती व्यक्त करीत ते हाणून पाडायचं. तिसर्‍यानं नवा मुद्दा मांडायचा, म्हणजे झकासपैकी एक वक्ररेषालेख काढायचा, ज्याचा आकार घसरगुंडीसारखा असतो. वजन येण्यासाठी त्याला ’किंमत विक्रीमान कमान" यानेके पीवीसी उर्फ प्राइस व्हॉल्यूम कर्व असे भरभक्कम नाव द्यायचे, मग त्या घसरगुंडीवर अमुक किमतीला इतकी विक्री - इतका नफा, तर तमक्या किमतीला तमुक विक्री - तमुक नफा, असा धोशा लावायचा. शक्यतो कुणी निष्कर्षाप्रत येत नाहीच; पण आलेच तर इतरांनी त्याला परावृत्त करायचं. खेळ तुफान रंगतो. बराच वेळ खेळून अखेर भुका लागल्या की हा खेळ आपोआप थांबतो आणि खेळाडू जेवायला जातात.

दगड का माती? - हा खेळही मोठा गमतीचा असतो. हा खेळ खेळण्यासाठी लागणारे दोन गट सर्व कचेर्‍यांत असतातच; जास्तच, पण कमी नाहीत. हा खेळ खेळण्यासाठी खेळाडू तरबेज असावे लागतात. तर खेळ असा की आधी एक गट पकडायचा, एखाद्या अधिकार्‍या च्या केबिनीत अलगद शिरून, कुणी पाहिले नाही ना याची खातरजमा करत चक्क तळ ठोकायचा. त्या अधिकार्‍याची स्तुती करायची. त्याचे प्रकल्प किती जोरदार, त्याचे विचार कसे दूरवर जाणारे, तो कसा वाकबगार यावर भाषण ठोकायचे, त्याने मागविलेला चहा प्यायचा आणि बाहेर कुणी पाहत नाही याची खात्री करून ’आलोच हां जरा’ असे म्हणत सटकायचे आणि नेमके हेच सगळे दुसर्‍या गटातल्या अधिकार्‍याकडे जाऊन करायचे. ‘मालदारी तिथे कर्मचारी’ या उक्तीनुसार ज्याची कमान चढती, त्याची बाजू पटकन मिळवायची असते. समजा तो दगड असला तर ’माती’ची हवा वाहू लागताच पटकन तिथून पळ काढून शिताफीने मातीवाल्याला गाठायचे असते. ’दगड’ की ’माती’ यापैकी काय उच्चारले जाणार हे ज्याला आगाऊ समजले तो शहाणा. मात्र या खेळासाठी हुशारीची आणि सरावाची गरज असते. जर दगडावरून मातीवर किंवा मातीवरून दगडावर जाताना पकडला गेला तर खेळाडू बाद, अंहं, नुसता बाद नव्हे, कदाचित बरबाद. अनेकदा या खेळात मुरलेले खेळाडू बघता बघता दगडाची माती करून टाकतात.

मीटिंग मीटिंग - देवळात गेले असता भक्तांची वर्दळ दिसते, रेल्वेच्या फलाटावर गेले असता प्रवाशांची आणि हमालांची लगबग दिसते, विमानतळावर गेले असता चेहरे गंभीर केलेले प्रवासी, परिटघडीचे कर्मचारी वावरताना दिसतात, तसे कुठल्याही बड्या, नामांकित आस्थपनेच्या मुख्यालयात गेले असता गाडीच्या डब्यात गळ्यात तकट बांधून कानातली, गळ्यातली विकणार्‍या फेरीवाल्यांगत आपल्या दोन्ही हातात उघड्या झाकणाचे घडीचे संगणक घेऊन सुटाबुटातले कर्मचारी-कर्मचारिणी लगबगीने इकडून तिकडे जाताना दिसतात. ते कुठे जात असावेत? ते जात असतात मीटिंग मीटिंग खेळायला! बालपणी डॉक्टर डॉक्टर वा शाळा शाळा खेळतात, तसे कॉर्पोरेट विश्वातले कर्मचारी नित्यनियमाने मीटिंग मीटिंग खेळतात. भातुकलीच्या खेळाप्रमाणे या खेळाचीही खेळणी असतात. एखादी रिकामी खोली, एका भिंतीवर पांढरा फळा, रंगीत शाईचे बोरू, फळापुशे, धारण्या (मराठीत फाइल म्हणतात), कागदपत्रांची चळत, पाण्याचे पेले, चहा कॉफीचे पेले, विजेच्या / जालाच्या वाहिन्यांचे जाळे, बहुसमावेशक बोलका दूरध्वनी संच वगैरे. अशा प्रकारे अनेकानेक खोल्यांमधून अनेक चमू बघावे तेव्हा मीटिंग मीटिंग खेळताना दिसतात. हा अगदी मूलभूत आणि कुठल्याही विभागाच्या कुठल्याही पदाच्या कर्मचार्‍यांना आवडणारा आणि सहज खेळता येणारा लोकप्रिय खेळ. कुठे गंभीर चेहर्‍यां नी तर कुठे तावातावाने, कुठे हसत खेळत तर कुठे हमरीतुमरीवर येत हा खेळ रंगलेला दिसतो. लहानपणी खेळ खेळताना बाद होणार वा आपल्यावर राज्य येणार हे लक्षात येताच मुले मनगटाला जिभेने चाटत झाप्य म्हणत सटकायची, तद्वत या खेळातले खेळाडू हातातला हस्तसंच उंचावीत आलोच असे म्हणत पळ काढतात व बाहेर जाऊन चार झुरके मारून संभाषण आताच संपवून आल्याच्या थाटात हस्तसंचाची कळ दाबत पुन:प्रवेश करते होतात. खेळ अधिक लांबल्यास (तो सहसा लांबतोच) फराळही मागवला जातो. सामान्य खेळाडू आपले आताच सांगितल्याप्रमाणे आपापसात खेळतात तर मुरब्बी व वरिष्ठ खेळाडू हा खेळ अधिक व्यापक व भव्य प्रमाणावर खेळतात (आमची मीटिंग देवीची कहाणी वाचा)

या खेळाचे वैशिष्ट्य असे की या खेळातून अनेकदा दुसरा एक खेळ आपोआप चालू होतो. ’शिवाजी म्हणतो’ चा खेळ! अर्थातच शिवाजीच्या भूमिकेत असतो ’साहेब’. शिवाजी म्हणतो करा - केले. शिवाजी म्हणतो बंद करा - बंद केले. शिवाजी म्हणतो बरोबर - सगळे म्हणतात बरोबर. शिवाजी म्हणतो चूक - सगळे म्हणतात चूक. अचानक कुठूनतरी आवाज येतो ’हे असे नाही, ते तसे आहे’ - बेसावध खेळाडू फसतो आणि म्हणतो ’बरोबर, ते तसे आहे’. खल्लास! खेळाडू बाद आणि तो आवाज करणारा बरबाद. खरे-खोटे, बरोबर-चूक हे सगळे गैरलागू असते. अरे वा रे वा! स्वतः:ला काय शिवाजी समजतो? हा खेळ कधी कधी घरात सासू-सून वा नवरा-बायको यांच्यातही रंगतो. पण नियम तोच. शिवाजी म्हणतो तो हुकूम, अन्य बोलतो ते वायफळ. भावी नेतृत्व इथेच तयार होत असते.’मोठठं’ होण्यासाठी ’काय’ लागतं तेही मुले खेळता खेळता शिकतात. खेळापरी खेळ आणि अभ्यासापरी अभ्यास.

अत्यंत महत्त्वाचा, राजाश्रय लाभलेला आणि अनन्यसाधारण असा आणखी एक खेळ आहे आणि तो म्हणजे शाळा शाळा यानेके ट्रेनिंग ट्रेनिंग. जे गुण कर्मचार्‍याच्या अंगी असावेत असे अध्याहृत धरून भरती केलेल्या कर्मचार्‍यांला ज्ञानार्जनाची गरज आहे हे लक्षात आल्यावर, तसेच आपण आदर्श व कल्याणकारी तसेच कर्मचारी प्रोत्साहक अशी आस्थापना आहोत हे सिद्ध करण्यासाठी प्रशिक्षणाचा खेळ खेळला जातो. मविवाले आपल्या खात्यात खास एक प्रशिक्षण अधिकारी भरती करतात. (कर्मचारी त्याला रिंगमास्टर म्हणतात). आपल्या विकासासाठी कर्मचारी आणि कर्तव्यादाखल आणि लोक सुधारतील, या आशेवर खेळ केले जातात आणि अनेक विषयांसाठी अनेक विभागांसाठी अनेक कौशल्यांसाठी हा खेळ रचला जातो आणि समस्त साहेब लोकांना नामांकनाची फर्माने जातात. साहजिकच साहेबांच्या लाडक्या बाळांची वर्णी लागते. ’अमुक हा कर्मचारी अत्यंत हुशार व मेहनती असून मला त्यात भावी नेतृत्व दिसते’ असे शेरे मिरवत नामांकन जाते. लवकरच खेळाडूंची यादी फिरते आणि मग त्या खेळाडूंचा परस्पर संवाद सुरू होतो. बहुतेक करून दिवसा कष्ट केल्यावर रात्री श्रमपरिहार कसा करावा, ’सोय’ कोण करणार, कार्यस्थळ कसे आहे, यावरच संवाद होतात. एकदा आमच्याकडे मोठीच गंमत झाली. नव्याने भरती झालेल्या आणि कर्मचार्‍यांशी सुसंवाद करू पाहणार्‍या प्रशिक्षण अधिकार्‍याने ’होऊ घातलेल्या कार्यक्रमासाठी’ सूचना मागविल्या. पहिलीच सूचना जोरदार आली - ’काळ्या फिती ३ नग, म्हातारा एक नग, रशियाजल एक नग आणि खंड्या पक्षी दोन खोकी’. त्याच्या जिवाचा संताप झाला! खेळाडू कसले पोहोचलेले हो, त्याने जाब विचारताच उत्तर दिले, ’ आम्ही काय प्रवचनाला थोडेच येत आहोत?’ असो. तर कार्यक्रम ठरला की प्रशिक्षक नेमला जातो. ही प्रशिक्षक मंडळी म्हणजे मोठी वस्ताद! आपण ज्ञानी असल्याचा आव आणणे, मोठे मोठे शब्द व संक्षिप्तरूपे तोंडावर फेकणे, समोरच्याला निरुत्तर करणे - मुळात ज्याचे उत्तर कसेही वळवता येईल असे प्रश्न विचारणे, यात हे लोक वाकबगार असतात. आपण एक-दोन दिवसात कुणाला ज्ञानामृत पाजून शहाणे करू शकत नाही वा बिघडवूही शकत नाही, हे त्यांना पक्के ठाऊक असते. आलेल्या प्रशिक्षणार्थींना ते त्याहूनही माहीत असते. मुळात हा खेळ म्हणजे आनंद सोहळा असतो. प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी दोघेही एकमेकांना सांभाळून घेतात. प्रशिक्षण संपल्यावर एक कागद फिरवला जातो. कीर्तन झाल्यावर थाळी फिरवतात तसा. या कागदावर काही जुजबी माहिती आणि अभिप्राय विचारला जातो. हे बिलंदर प्रशिक्षक नेहमी स्वतः:च्या सोयीचे प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ, ’ शिकविणारा कसा वाटला?’ आता उत्तर ’बरा’ येणार हे पक्के माहीत असते. ’दिलेले वाचनसाहित्य कसे वाटले? आता परस्पर जालावरून वा कुठल्यातरी पुस्तकावरून उतरविलेले हे साहित्य असल्याने आणि ते कुणीही फारसे गांभीर्‍याने वाचलेले असल्याची शक्यता नसल्याने याचेही उत्तर सकारात्मकच येते. पुढचा प्रश्न ’हा कार्यक्रम उपयुक्त आहे असे तुम्हाला वाटते का?’ इथेच तर ग्यानबाची मेख असते. आस्थापनेच्या खर्चाने कचेरीबाहेर फिरायला मिळते, दोन दिवस आराम असतो, रोजची कामे करावी लागत नाहीत, शिवाय ’फुकट ’पाहुणचार’ होतो, तेव्हा समस्त लोक या प्रश्नाचे उत्तर नुसते सकारात्मक देऊन थांबत नाहीत, तर ’असा कार्यक्रम दर सहा वा तीन महिन्यांनी झाला पाहिजे’ असेही सुचवितात. प्रश्न विचारताना तुम्ही काय शिकलात? वा तुम्ही यापुढे स्वतः:ला कसे सुधाराल वा विकसित कराल याचा परामर्ष न घेता ढोबळ प्रश्न विचारलेले असतात. पुढे जेव्हा व्यवस्थापनाला या कार्यक्रमाचा अहवाल दिला जातो, तो अहवाल म्हणजे मुत्सद्दीपणाचा उत्कृष्ट नमुना असतो. ’तुमचे कर्मचारी ढ आणि उनाड आहेत’ असे लिहिले तर आफत ओढवेल आणि ’तुमचे कर्मचारी गुणी वा ज्ञानी आहेत’ असे लिहावे तर ’मग प्रशिक्षकाची गरज काय?’ असा प्रश्न व्यवस्थापनास पडेल व पुन्हा धंद्यावर गदा येईल. मग इराणच्या शहाने बादशहाला दिलेला पोपट मेला आहे हे बिरबलाने अकबराला सांगितले, तसे चातुर्याने घोळव घोळव घोळवलेला आणि ’तयारी चांगली आहे, लोक सकारात्मक आहेत, तेव्हा जर आमचे कार्यक्रम सातत्याने चालू ठेवले तर व्यवस्थापनास त्याचा नक्कीच फायदा होईल’ असा अहवाल सादर केला जातो.

कामाच्या गावाला जाऊ या! - वरच्याच प्रकारात मोडणारा, पण जरा वेगळा असा हा खेळ. यामध्ये कर्मचार्‍यांना कारखाना, प्रयोगशाळा, संशोधन केंद्र, पुरवठादार, व्यापार सहयोगी, इत्यादींच्या कार्यस्थळाला भेट देण्यासाठी पाठविले जाते. हीसुद्धा एक मस्त सहल असते. लोकदेखील उत्साहाने अशा भेट दौर्‍याची हिरिरीने मागणी करतात. ’प्रत्यक्ष पाहणे खरे, नुसते ऐकून, वाचून वा बोधपट पाहून समजत नाही, शिवाय प्रत्यक्ष भेटीने ज्ञान वाढते, आत्मविश्वास येतो, परस्परसंबंध दृढ होतात, अशा अनेक कारणास्तव हे कार्यक्रम फर्मावले जातात आणि आयोजितही केले जातात. कारखान्यात गेल्यावर प्रत्यक्ष कामकाज अभ्यासणे फारसे गरजेचे नसते. ’एकदा डोळ्याखालून घातले म्हणजे बरे, अधिक खोलात जाऊन आपल्याला कारखाना थोडाच काढायचा आहे? असे मौलिक विचार प्रकट केले जातात. आता प्रत्येक कारखाना, प्रयोगशाळा, संशोधन प्रकल्प यात कुठे ना कुठे काहीतरी अधिक-उणे असतेच. आलेल्या मंडळींनी नावे ठेवू नयेत यासाठी पाहुण्यांची सरबराई केली जाते, काही बिलंदर कारखाना व्यवस्थापक आलेल्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करतात. भाग्यवान मंडळींना याच कारणास्तव प्रदेश दौरेही घडतात. मात्र याचा लाभार्थी होण्यासाठी साहेबाचे आणि आपले संबंध सौहार्दाचे असणे अगत्याचे असते.

आता पटली ना खात्री? इतके खेळ खेळले जात असताना बालपणच्या खेळांची काय महती? आणि हो, नुसते खेळच नव्हे, तर क्रीडास्पर्धाही भरतात ’कॉर्पोरेट विश्वात’. जरा आठवा, विचार करा अशा स्पर्धा तुमच्या आस्थापनेतही नक्की होत असणार. काही स्पर्धा मी सांगतो, म्हणजे तुम्हालाही आठवतील.

तीन पायांची शर्यत - दोन कर्मचारी, दोन विभाग प्रमुख, दोन विभाग अशांची आवळ्याभोपळ्याची मोट बांधून त्यांना एखादा प्रकल्प एकत्रितरीत्या पुरा करायला जातो. या स्पर्धा बारमाही असतात आणि ’हॅ हॅ हॅ बघा कसे एकत्र फरफटताना तडमडत आहेत’ असे बोलताना वाक्य पुरे व्हायच्या आधी आपली तंगडी कुणाच्यातरी तंगडीला बांधली गेल्याचे कर्मचार्‍याला समजते.

’बाप शोधा स्पर्धा’ म्हणजेच फाइंड अ फादर कॉंटेस्ट - एके दिवशी व्यवस्थापनाच्या अचानक लक्षात येते की कुणीतरी उपद्व्याप करून ठेवला आहे. एखादा प्रकल्प हाकाटला तर गेलाय, पण आता ती ब्याद ठरल्ये! कुणी केला हा उद्योग? कोणाला जबाबदार धरावे? याची सुरुवात कुठे व शेवट कुठे? आतापर्यंत किती पैसा वाया गेला? हे व असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मग बर्‍याच वेळाने लक्षात येते की आता फार उशीर झालाय. पाय तर अडकलाय, मग काय करायचे? मग ’बाप शोधा स्पर्धा’ सुरू होते. करा रे हाकारे पिटा रे डांगोरा, या नगरात कुणी लायक व्यक्ती आहे का? मग कर्मचारी साळसूदपणे दुसर्‍याचे नाव सुचवितात. नसते झेंगट आपल्या कामाव्यतिरिक्त कोण ओढवून घेणार? मग पदोन्नतीला आसुसलेला, उत्साही आणि अर्थातच नवशिका बकरा सापडतो आणि त्याच्या डोक्यावर मुकुट चढवला जातो.

तर मंडळी, हे खेळ तुम्हीही खेळता का? उगाच ’ताण व्यवस्थापनाच्या’ शिबिराला जाण्यापेक्षा हसा, खेळा, आनंदी व्हा आणि निरोगी राहा, या माझ्यातर्फे तुम्हा सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.

footer