संपादकीय

मिसळपावचा हा पहिला दिवाळी अंक हजारो सदस्यांना आणि लाखो वाचकांना देताना मला जो आनंद होतोय तो आनंद अगदी मिसळपाव संपादक मंडळापासून ते अंक डाऊनलोड करणार्‍या मूषकालाही होत असणार.

पाच वर्षांच्या वाढत्या वयात आजपर्यंत मिपाने कधी दिवाळी अंक काढला नाही याचं कारण शोधण्यापेक्षा, आता का काढला हे बघणं जास्त महत्वाचं आहे. मिपाकरांना लेखनातून व्यक्त व्हायला मनापासून आवडतं, आणि रोजच्या लिखाणातून ते मनसोक्त व्यक्त होतच असतात (मग.. घाबरतात की काय?!). तरीही वेगळा अंक काढण्याचा खटाटोप कशासाठी?

तर, बर्‍याच काळाच्या निरीक्षणाने असं दिसलं होतं की एखादा "प्रोजेक्ट" हाती घेतला तर मिपाकर नेहमीपेक्षा दुप्पट उत्साहाने त्यात भाग घेतात. आधी घोषित करुन घेतल्या गेलेल्या कानसेन स्पर्धेत सर्वांनी एकत्र येऊन जी धमाल केली ती पाहता हे लक्षात येईलच. हा सहभाग लेखक म्हणूनच असेल असं नव्हे, किंवा लेखक म्हणूनच असावा असंही नव्हे. निव्वळ वाचक किंवा प्रतिसादकर्ता म्हणूनसुद्धा मिसळपाव हा एक खूप मोठा परिवार एकत्र येतो असं दिसतं.

तस्मात्, हा अंक काढण्यामधे सर्वांना एकत्र आणणं हाच विचार आहे. आणि त्या निमित्ताने एक संकेतस्थळ म्हणून मिसळपाव परिवार हा नव्या कल्पना स्वीकारणं आणि काळानुसार कल्पना बदलणं यासाठी नेहमीच तयार आहे हे ही पुन्हा अधोरेखित होतं.

दिवाळी अंक काढताना ज्या चर्चा घडल्या त्यामधे अंक पीडीएफ स्वरुपात बनवावा, ऑनलाईन स्वरुपात बनवावा की दोन्ही, यावर चर्चेने सुरुवात झाली. शेवटी "दोन्ही प्रकारे बनवावा" हा पर्याय जिंकला, कारण हे सर्वच चर्चाकर्ते (संपादक असले तरी) आधी पक्के मिपाकर आहेत. "काथ्याकूट" हा अस्सल मिपाकराचा धर्म उत्तमरित्या पार पाडल्यानंतर हे एकमत झालं.

त्याचं असं आहे, की आपण सगळे प्रतिसादाची वाट पाहतो. इथे, मिपावर लिखाण करुनच नव्हे.. रोजच्या जगण्यातही आपण समोरच्याच्या प्रतिसादाची वाट पाहातच असतो. आपण जिवंत आहोत याच्या खात्रीसाठी समोरचा जिवंत आहे याची खात्री आपल्याला आधी हवी असते. ...रोजच्या जगण्यात तो प्रतिसाद क्वचितच मिळतो.

पण इथे मिपावर त्याची कमतरता नाही. अक्षरशः कामधाम सोडून घरा-हपीसातून लोक प्रतिक्रिया देतात. आपल्या लेखनाला येणार्‍या प्रत्येक नव्या प्रतिसादासोबत मूळ लेखकाची कॉलर आणखी टाईट होते. मिसळपाव वेबसाईटच्या इतिहासात सर्वकाळ आपल्या मुखपृष्ठापेक्षाही "नवे लेखन" या पानाला प्रचंड जास्त संख्येने हिट्स असतात ते यामुळेच.

मग अशावेळी दिवाळी अंक लिहीणार्‍या लेखकांना जर प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत तर मिसळपावचा अंतरात्माच हरवेल.
...म्हणून मग ऑनलाईन अंक हा प्रतिसादकांसाठी म्हणून आणि पीडीएफ स्वरुपातला अंक हा डाऊनलोड करुन आंतरजालाशी संपर्क नसतानाही निवांत वाचण्याची केवळ एक सोय म्हणून, अशी रचना केली आहे.

या अंकाची कल्पना नीलकांतने मांडली त्या क्षणापासूनच संपादक मंडळात उत्साह संचारला. रामदासकाका अंकाचे मुख्य सल्लागार असल्याने अंकाच्या भविष्याची काळजी नाहीशी झाली. वेळ कमी उरला होता म्हणून मग लेखन जमवण्याची जोरदार तयारी सुरु झाली. या अंकाला तेव्हापासून आजपर्यंत इतक्या सुहृदांचा हातभार लागला आहे की त्यांच्या नावाची यादी बनवणं हा या अंकाच्या निर्मितीतला सर्वात कठीण भाग असावा.

नीलकांत, प्रशांत आणि संपादक मंडळ या सर्वांनी अंकाची कल्पना मांडून, उचलून धरुन तिला प्रत्यक्षात आणण्याचं काम केलं. यात प्रत्येक संपादकाने आपले रोजचे व्याप सांभाळून जास्तीतजास्त लेखकांना लिहीतं केलं. संपादक मंडळातल्या प्रत्येकाने मोलाचा वाटा उचलला. अंकाचा काही भाग सर्वानुमते निवडलेल्या लेखकांकडून निमंत्रित लेखन म्हणून मागवला गेला. बाकीचा भाग मिपाकरांनी नीलकांतच्या आवाहनाला दिलेल्या प्रतिसादाने भरेल की नाही असा विचार कितीही दाबला तरी मनात येतच होता.

पण या आवाहनाचा प्रतिसाद पाहता आमची झोळी दुबळी पडली हे आता आनंदाने मान्य करतो. एक जाडजूड ग्रंथ बनेल इतकं साहित्य आमच्याकडे आलं. अक्षरशः पाऊस पडला. अंकाची एकूण जबाबदारी आणि त्यातही साहित्य निवडीची जबाबदारी नीलकांतने माझ्याकडे दिलेली असल्याने मी जरा तरंगत होतो.. पण इनकमिंग साहित्याचा हा गिरसप्पा धबधबा पाहून मात्र सुरुवातीला माझी साफ तंतरली.. जसंजसं वाचत गेलो तसंतसं मात्र इतका आनंद मिळत गेला की ही जबाबदारी न वाटता अभूतपूर्व संधी वाटायला लागली. आपलं नशीब चांगलं असं वाटायला लागलं.
मिसळपाव ही "क्लासेस"ची स्टडीरूम नव्हे. ते "मासेस"चं अंगण आहे. इथे लिहीताना थेट "माणसं" व्यक्त होताहेत, "लेखक" नव्हे. त्यामुळे मिसळपावच्या अंकाचा लौकिक "सर्वांचा" अंक असा राहिला पाहिजे. उच्चभ्रूंचा, सॉरी, "हुच्चभ्रूंचा" अंक असा नव्हे..त्यात साहित्यमूल्य ज्यांना शोधायचंय त्यांनी शोधावं..पण प्रत्यक्षात हा जनांचा प्रवाह आहे..त्यात आंबटगोडतुरट सर्व आहे..आणि त्यामुळेच इथे इतका आनंद आहे.

या भावनेतून आणखी एक ठरवलं, की एथ्निक, बोजड, अतिअभिजात कलाकृती असलेलं, क्लासिक पेंटिंग असावं तशा स्वरुपाचं, निसर्गसौंदर्य दाखवणारं, यापैकी रुळलेलंच एखादं मुखपृष्ठ किंवा डिझाईन करण्याऐवजी रंगीबेरंगी आणि लोकांच्या रोजच्या आयुष्यातली दिवाळीची प्रतीकं दाखवणारं डिझाईन कोलाज करुन या अंकात वापरलं.

मिसळीचा स्थायीभाव मिश्रतेतच असतो. वेगळ्या वाटीत फरसाण, वेगळ्या वाटीत उसळ, वेगळ्या वाटीत कांदा.. आणि तुमचं तुम्ही मिक्स करुन खा.. ही खरी मिसळच नव्हे. त्यामुळे कवितेचा वेगळा विभाग, रेसिप्यांचा वेगळा सेक्शन.. अशी नेहमीची मांडणी टाळली आणि खरोखर सर्व प्रकारचं लेखन मिसळीच्याच रुपात समोर यावं म्हणून कोणतेही विभाग करण्याचं टाळून सर्व लेख अधेमधे मिसळून त्यांचा क्रम लावला. मिसळ "लावली" म्हणा ना.. हे दोन्हीही पहिल्या प्रयत्नातले प्रयोगच..

या विचाराने एक झालं की जरी मला साहित्यावर कात्री वापरावी लागली,प्रत्येक शब्द प्रकाशित करता आला नाही, तरीही स्वतःचा व्यक्तिगत ढुढ्ढाचार्यपणा करुन फार अभिरुची वगैरे वगैरेच्या फाजील नशेत लोकांचं मनापासून आलेलं लिखाण घाऊकपणे नाकारत राहणं हेही घडलं नाही.

त्यामुळे माझा स्वतःचा सुरुवातीचा "चेकर"चा अभिनिवेष गळून गेला आणि मी जास्तीतजास्त साहित्याला अंकात स्थान कसं देता येईल याचा मनापासून प्रयत्न केला. जे साहित्य घेता आलं नाही त्याबद्दलही मला हळहळच जास्त आहे. पण निखालस निकृष्ट अशा कारणाने कोणतंही साहित्य नाकारावं लागण्याची वेळ लेखकमित्रांनी माझ्यावर आणली नाही. जे साहित्य नाकारलं त्यामागे मुख्यतः सर्वानुमते स्वीकारलेली काही बंधनं होती. संपादक या पदावर व्यक्तिगत मतांपेक्षाही सर्वसामान्य संकेतांना धरुन राहणं उचित होतं. त्यानुसार उदाहरणार्थ, मांसाहारी पाककृती.. मृत्यू किंवा रोग यांसारख्या विषयांवरचं दु:खांत लेखन.. सणाच्या उत्सवी वातावरणात समाजमान्यतेनुसार अभद्र किंवा बीभत्स ठरतील असे विषय यांना नाईलाजाने कात्री लावली गेली. त्यातलं बरंच लिखाण एरवीच्या संदर्भात उत्कृष्ट दर्जाचं असूनही..

आभार हा तर एक उपचार झाला. मिसळपावचा पिंड हा कृत्रिम "पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ.." छापाच्या औपचारिकतेपासून दूर आहे. तरीही केवळ मिसळपावशी कितीजण आणि कसे स्नेहाच्या धाग्याने जोडले गेले आहेत हे जाणवण्यासाठी अनेकजणांचा इथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे. चाळीत गणपती बसवायचा आहे असं ठरलं की सारे घरनंबर आपल्या घरचं कार्य असल्यासारखे झटून कामाला लागतात तसं इथेही झालं.

धडाधड येऊन पडलेल्या लेखांना एकत्र आणणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. त्यांना अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने एकत्र आणण्याचं काम किसन शिंदे यांनी केलं.. नाही नाही..आपल्या किस्नाने केलं.

त्यानंतर समोर उभा ठाकलेला एवरेस्ट पर्वत होता तो मुद्रितशोधनाचा. इथे सुधांशुनूलकर यांनी उत्स्फूर्तपणे, अगदी न मागता मदतीचा हात पुढे केला. या हाताचं बोट धरता धरता मग मी तो हात ताब्यातच घेऊन टाकला आणि त्यांनीही जवळजवळ एकहाती हा पर्वत निस्तरला. सुधांशुनूलकर हे व्यावसायिक मुद्रितशोधक आहेत आणि त्यामुळेच मिपाला आपोआप उत्कृष्ट दर्जाच्या प्रूफ करेक्शनचा लाभ झाला. सुधांशुनूलकरांना अधिकाधिक साहित्य देत असताना कधीतरी मलाच मनाची लाज वाटली आणि त्यांचा भार कमी करण्यासाठी मी प्रासलाही यामधे ओढलं. "प्रास द जीनी" आपलं आयुर्वेदिक संशोधन बाजूला ठेवून मुद्रितशोधनाला बसला आणि त्यानेही रातोरात काम पूर्ण करुन दिलं.

काही लेखन हे पीडीएफ स्वरुपात मिळालं होतं. त्याचं रुपांतर युनिकोडमधे करणं, आणि तेही चुका न होऊ देता, हे काम करण्याचा चांगला मार्ग म्हणजे ते पुन्हा एकदा टाईप करणं. हे काम निश्चित कंटाळवाणं आहे. पण आवश्यकही. अशा काही लेखांबाबत लीलाधर आणि अन्य मेंबर्सना विनंती करताच हेही काम त्यांनी तडीला नेलं.

अभिजीत, मी नाही, असं म्हणत असला तरी त्याने डिझाईनची पूर्ण जबाबदारी घेतली. स्पा आणि सौरभ यांनी त्याला तज्ञ सल्ले देऊन डिझाईनसाठी खूप कल्पना सुचवल्या.
ज्यांनी अंकासाठी लेखन दिलं ते या अंकाचे सर्वात मोठे आधारस्तंभ. मुळात लेखन येतानाच धबधब्याऐवजी करंगळीधार आली असती, तर कसलं मुद्रितशोधन आणि कसलं सिलेक्शन..

ज्या हातांनी या अंकाचा भार उचलला पण त्यांची नावं माझ्यापर्यंतही पोचली नाहीत त्या सर्वांचंही ऋण मी इथे नोंदवतो. कोणताही ऋणनिर्देश राहिला असेल तर मी त्याबद्दल सपशेल माफी मागतो आहे. असा उल्लेख राहण्यामागे बाकी काहीही नसून माझा अंगभूत गबाळेपणा आणि विस्कळीतपणा हेच कारण आहे.

हा दिवाळी अंक बनवताना आम्ही अनेकजण रात्री जागत होतो. मध्यरात्री "व्यनि चेकवत" होतो. आलेल्या लेखनातला भरपूर मजकूर इकडून तिकडे "चोप्य पस्ते" करत होतो.. फार थोडा मजकूर "फाट्यावर मारत" होतो. हे सर्व करताना मी एका जाणिवेने कमालीचा भारावून गेलो. ती जाणीव अशी, की जे सर्व मिपाकर लोक्स मिळून हे काम करत होते ते सर्व वेगवेगळ्या गावांत, इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या देशांत बसले होते.. कोणी अमेरिकेतून जर्मनीतल्या मिपाकराशी फॉलोअप करत होता, कोणी ऑस्ट्रेलियातून ठाण्याशी संपर्क ठेवून होते , कोणी नायजेरियातून रात्रीअपरात्री जागून महाडमधल्या लेखकमित्राला लिहीतं करण्यासाठी संवाद करत होते तर कोणी सोलापुरात बसून अमेरिकेतल्या वर्किंग टाईमात डिझाईन बनवत होता.. या सर्व कामात कोणीही एका छदामाची प्राप्ती होणार नसूनही समरसून भाग घेतला.. इतकंच नव्हे तर आपला पैसा कमावून देणारा रोजगारही काही क्षणच का होईना पण बाजूला ठेवून त्याच्याही वरची जागा या मिपा दिवाळी अंकाला दिली. यातल्या कित्येक लोकांची पूर्ण नावंही मला माहीत नाहीत. अगदी या घडीलाही माहीत नाहीत. अविश्वासाने भरलेल्या या जमान्यात चार देशांतल्या चार अनाम लोकांवर मी भिस्त ठेवून होतो, आणि एकदाही अशी सूक्ष्म शंकाही आली नाही की हे काम पूर्ण होणार नाही.. हा एक अद्भुतरम्य प्रकार आहे बुवा.

नीलकांतने मला अंकाची जबाबदारी घ्यायला सांगितलं. आणि पुढचं सगळं तर इतरांनीच केलं..अंक तर बनलासुद्धा..

पण मग या सर्वात मी नेमकं काय केलं..?

समुद्रात मोती बनताना शिंपल्याच्या आत वाळूचा एक कण शिरतो. तो शिंपल्यातल्या ऑयस्टरला बोचत राहतो. मग एरवी शांत असलेला ऑयस्टर त्या वाळूच्या कणाभोवती थरावर थर देऊन सुंदर मोती बनवतो.

मोती किती सुंदर बनला आहे ते तुम्ही ठरवा. पण तो मी बनवला नाही. मी त्यातला वाळूचा बोचरा कण फक्त.

- गवि
footer