पनीर पापडी

मध्यंतरी एका हॉटेलच्या मेनूकार्डवर पहिल्यांदा हा पदार्थ पाहिला. उत्सुकतेने मागवला आणि थोड्या अनवट पदार्थाची चव घेता आली. यात काय काय वापरलं असावं, याचा खाता खाता विचार सुरू झाला. पनीर आणि पापड हे तर सहज कळून येत होते. पण बाकीचे पदार्थ अंदाजपंचे वापरून हा पदार्थ घरी बनवायचा घाट घातला.
साहित्यः
पनीर पाव किलो
पापडाचा चुरा (मी उडदाच्या पापडाच्या बोटभर जाडीच्या पट्ट्या कापून घेतल्या होत्या.)
तीन मोठे चमचे डाळीचं पीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
एक हिरवी मिरची बारीक चिरून (आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता)
चवीपुरते मीठ
चिमूटभर हळद
तळणासाठी तेल.

पनीर पापडी

कृती:
पनीरचे साधारण इंचभर आकाराचे तुकडे कापून घ्यावे. डाळीचं पीठ, भजीसाठी भिजवतो त्यापेक्षा किंचीत पातळ भिजवून घ्यावं. कारण पापडाचे तुकडे पनीरला नीट चिकटावे म्हणून हे पीठ वापरायचं आहे. पनीरवर त्याचा जाड थर तयार होता कामा नये. या पीठात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून नीट ढवळून घ्यावं.

आता एका कढईत तेल तापत ठेवावं. तेल नीट तापलं की पनीरचे तुकडे डाळीच्या मिश्रणात बुडवावे, जास्तीचं पीठ निथळलं की पापडाच्या तुकड्यांमध्ये घोळवून तेलात मध्यम आचेवर तळावेत. गॅसची आच मोठी राहिल्यास पापड करपून जायची शक्यता असते, त्यानुसार अंदाज घेऊन आच कमी-जास्त करत राहावं. तळून झाले की टिश्यूपेपरने जास्तीचे तेल टिपून सॉस किंवा चटणीसोबत हा पदार्थ गरमगरम खायला द्यावा.

पनीर पापडी

footer