चित्रपट बघणे : एक कला

चित्रपट पाहणे आणि त्यांची परीक्षणे लिहिणे हा आमचा एक आवडता छंद. काही लोक त्याला 'फुकटचा धंदा' असेदेखील म्हणतात. अर्थात ते, 'जे मित्र असले की शत्रूची गरज नाही' ह्या कॅटेगरीत मोडणारे असल्याने मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करत आलो आहे. हां, तर परवा असाच एक मित्र कम शत्रू आम्हाला रस्त्यात भेटला. (दारूखान्यात, शिणिमाला, तमाशाला आणि रस्त्यात मित्र भेटणे हा दुर्मीळ योग आमच्या आयुष्यात कायमच येत आला आहे.) अत्यंत उपहासाने त्याने मला 'मग, अटेंड करणार आहे का नाही सेमिनार? ' असे विचारले. दुपार असल्याने आणि मित्र बायकोबरोबर असल्याने प्यायलेला नसावा ह्याची खात्री होती. पण हे असे काही असंबद्ध बरळेल असे वाटले नव्हते. अर्थात अधिक चौकशी करता त्याच्याकडून जी माहिती समजली, ती ऐकून आम्ही अक्षरश: भर रस्त्यात डोक्याला हात लावून बैठक मारली. कुठल्याश्या संस्थेत म्हणे 'चित्रपट कसा पाहावा' ह्यावरती कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. अरे, कलियुग आहे म्हणून काय काहीही धंदे कराल का काय?
चित्रपट पाहायला शिकवणार? उद्या वंश वाढवायला शिकवाल, परवा दारू प्यायला शिकवाल.. काय अर्थ आहे का ह्या सगळ्याला? अभिनय, दिग्दर्शन शिकवतात इथपर्यंत ठीक होते, पण आता ते कसे पारखायचे हेसुद्धा शिकवणार? हे शिकायचे नसते तर अनुभवायचे असते, हेच ज्यांच्या मद्दड डोक्यात शिरत नाही, ते लोकांना काय शिकवणार आहेत? उद्या चित्रपटात फक्त सोनाक्षी सिन्हा आणि तिचे कमनीय अवयव येवढेच बघायला एखादा मनुष्य जात असेल, तर त्याला तुम्ही अजून नक्की काय शिकवणार आहात? की 'बाबा रे, असे एकदम 'टार्गेट ऍटॅक' करायचे नाहीत. आधी पावलापासून सुरुवात करायची, नेलपेंटची शेड, सॅंडल साधा आहे का हाय हील आहे ते बघायचे, मग वर वर सरकायचे. अंगात चोळी आहे, का काचोळी आहे.. साडी शिफॉनची आहे, का साधी वायल आहे ते ठरवायचे.. ' हे असले दळभद्री काही शिकवणार आहात का? तो इसम आत जाणार, सोनाक्षी आणि तिचे मटकणे डोळे भरून बघणार आणि साला पैसा वसूल झाला म्हणून बाहेर पडणार. त्याला घेणे देणे काय आहे तुमच्या कलेशी आणि शैलीशी? 'एक भुर्जी बना और हाफ फ्राय बिना पल्टी मार के उसके उप्पर' ही ज्याची अदा आहे, त्याला तुम्ही अजून शिकवूच काय शकणार आहात?
मुळात मला सांगा की, एक हिरॉईन आणि दोनचार फाइट सीन्स सोडले तर आजकाल चित्रपटात बघण्यासारखे असते तरी काय? नेहा धुपिया, दिया मिर्झा, कंगना राणावत, कल्की कोचलीन ह्यांच्यात काय बघायचे ते आम्हाला विचारू नका. मुळात हिरॉईन म्हणून ह्यांच्यावरती पैसे लावायला लोक तयारच कसे होतात? हा मला प्रश्न पडलेला आहे. ह्यांच्यावर पैसा लावण्यापेक्षा मी कल्याण बाजार किंवा अगदी एखाद्या क्रिकेट मॅचचे हायलाइट्सदेखील पसंत केले असते. ह्या बायांमध्ये सौंदर्य आणि अभिनय कसा बघायचा हे तुम्ही शिकवू शकणार आहात का? सलमानचा अभिनय कसा पारखावा, हे तुम्ही शिकवू शकणार आहात का? अक्षय कुमार काहीही कसाही आणि बादरायणदेखील संबंध नसताना, अचानक 'बच्चे की जान लोगे क्या? ' असे म्हणतो तेव्हा त्या वाक्याच्या अर्थ आणि चालू दृश्याशी संबंध शिकवणार आहात का?
गुढघ्यापर्यंत, खरे तर थोड्या वरच.. साड्या उंचावत (आठवले ना लगेच दृश्य?.. चावट कुठले) शाळेतल्या बायकांना समूहाने जाऊन एकाच विद्यार्थ्याची खाजगी शिकवणी घेण्याची गरज का वाटते? सोनम कपूर, रणबीर कपूर, नितीन नील मुकेश हे मानवी देह अभिनय समृद्धीमुळे चित्रपटात आहेत, का त्यांच्या मधल्या नावामुळे आहेत? अमीर खानला कॉलेज स्टुडंट म्हणून आणि मुग्धा गोडसेला सुपर मॉडेल म्हणून कसे सहन करायचे? प्रितम, अनु मलिक, हिमेश रेशमिया ह्या गंधर्वांनी जपानी डेली सोपपासून ते संतती नियमनाच्या जाहिरातीपर्यंतचे संगीत चोरून आपल्या चित्रपटात वापरले, तर ते कसे सहन करायचे? महेश भट्ट, विक्रम भट्ट हे दिग्दर्शक (? ) कथा, संगीत, तंतोतंत दृश्ये इत्यादी चोरून दमल्यावर आता फॉर अ चेंज म्हणून चित्रपटाची पोस्टर्सदेखील चोरू लागले आहेत. ह्याकडे कुठल्या नजरेने बघावे? हीरो हिरॉईनला खुले आम चुंबन, आलिंगन आणि विविध आसने करताना दाखवल्यावरती, बलात्काराच्या दृश्यात मात्र हात आखडता का घेतात? हीरोपेक्षा जास्त कमावणारा, मोठ्या पदावर कार्यरत असणारा बाप पाठीशी असलेला, आई किंवा बहीण ह्यांची जबाबदारी नसलेला, ४/५ प्रकारच्या चारचाक्या, १५/२० नोकर, बंगला इत्यादींचा मालक असलेला मनुष्य हा केवळ हिरॉइन त्याच्यावरती प्रेम करत नाही म्हणून खलनायक का मानायचा?
अभिनय आणि कलाकार सोडा, आपण चित्रपटातल्या महान दृश्यांवरती बोलू या. 'मर्द' चित्रपटात निरुपा रॉयने देवीच्या वाहनाला... आय माय सॉरी.. वाघाला नमस्कार केल्यानंतर तो तिला उलटून नमस्कार करतो, ह्यातून काय बोध घ्यायचा? तीन इसम तीन खाटांवरती लोळत लोळत एकाच बाईला रक्त देतात, ह्यातून काय विज्ञान शिकायचे? चार्ली चॅप्लिन हा रणबीर कपूरचा आदर्श आहे, म्हणून चॅप्लिनच्या चित्रपटातील दृश्ये तो सररास आपल्या चित्रपटात कॉपी करतो का? चंद्रमुखीसारख्या गर्भश्रीमंत नायकिणी कुठे असतात? मेक-अप मन आणि ड्रेस डिझायनर हे कायम 'गे'च असतात का आणि ते कायम नको तेव्हाच कसे पकडले जातात? क्रिश हा चित्रपट पे-चेकची सरळ सरळ भ्रष्ट नक्कल असतानादेखील इंडियाज फर्स्ट ओरीजिनल सुपर हीरो अशी त्याची जाहिरात का बघावी लागते? करिश्मा कपूरचा पापी गुडिया (तो बघण्याचे पाप करणारा मी बहुदा एकटाच) हा चाईल्ड्स प्लेवरून सरळ सरळ ढापलेला असताना, 'पर्दे पर पहेली बार एक अनोखी कहानी' ह्यावर विश्वास कसा ठेवायचा? 'दो फूल' ह्या मेहमूदच्या अप्रतिम चित्रपटाची झेरॉक्स म्हणजे गोविंदाचा 'आँखे' असा उच्चारदेखील का करायचा नाही? राष्ट्रीय पुरस्कार विजेता अग्निपथ आणि स्कारफेसमध्ये साम्य आहे, असे उघड उघड का बोलायचे नाही? अजय उर्फ महादू देवगण आणि काजोल पडद्यावरती जसाच्या तसा 'अ मुमेंट.. ' साकारतात, तेव्हा तो अद्भुत प्रेमकहाणी पहिल्यांदाच पाहत असल्यासारखा कसा पाहायचा?
बरं, हे नासके प्रश्न जाऊ द्या बाजूला. मला एक सांगा, आजकाल 'बघण्याच्या' लायकीचे कितीसे चित्रपट पडद्यावरती येतात? नो सर!! सनी लिऑनलादेखील पडद्यावरती साकारता न येऊ शकणारे दळभद्री दिग्दर्शक असल्यावरती अजून काय होणार? बघण्याच्या लायकीच्या चित्रपटाचीच बोंब असताना, शिकण्याच्या लायकीच्या चित्रपटांबद्दल न बोलणेच चांगले. शिकायच्या लायकीच्या चित्रपटांचा विषय निघाला की पथेर पांचाली, शेजारी, कुंकू आणि मदर इंडियाच्या पुढे आपली यादी जात नाही. सत्यजित रे यांची पिढी बहुधा श्याम बेनेगलांबरोबरच संपली असावी. कारण मीरा नायर किंवा अख्तर मिर्ज़ा, जानु बरुआ ह्यांच्या चित्रपटांना पडदा बघण्याचेदेखील नशीब मिळते, हेच आजकाल खूप म्हणायचे. अर्थात गाजावाजा करत आणि समाजाला सुधारण्यासाठी, आरसा दाखवण्यासाठी म्हणून निघालेले चित्रपट स्वत: दिग्दर्शक तरी पुन्हा बघतात का, हा खरा प्रश्न आहे. फायर, माय वाईफ्स मर्डर, कोलकाता मेल, मिस्टर ऍंड मिसेस अय्यर ह्या हटके चित्रपटांमधून तरी नक्की वाट्याला काय आले? बॉम्बे बॉइज ह्या चित्रपटाने सगळ्यात आधी ही मळलेली वाट सोडून एक वेगळाच रस्ता पकडला 'हिंग्लीशचा'. आज हा पादचारी मार्ग चक्क चक्क चार पदरी रस्ता होऊन 'बीइंग सायरस'पर्यंत पोहोचला आहे. सगळ्याच प्रस्थापितांना धक्का देणार्‍या 'द अंग्रेज' किंवा 'हैदराबाद नवाब'ने काही काळ जबरदस्त धुमाकूळ घातला होता, पण शेवटी तीदेखील एक पटकन ओसरणारी लाटच निघाली.
आठवड्यातल्या पहिल्या शुक्रवारी थेटरात आणि पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी चॅनेलवरती झळकणार्‍या आजच्या चित्रपटांच्या जमान्यात नक्की बघायला तरी काय शिकवणार आहेत? एकदा वाटले होते की, जावे आणि बघून तर यावे. पण मग भीती वाटली, की हे लोक अंधार करून पुन्हा पुन्हा मदर इंडिया, दो बिघा जमीन, भूमिका आणि अंकुरचे दळण दळत बसतील आणि स्वत:च्या समाधानासाठी, ही भूतकाळातील राजेशाही लक्तरे अंगावर घालत आम्हालासुद्धा टेर्‍या बडवायला लावतील. मग आम्हीदेखील उजेडात आल्यावरती दादासाहेब फाळके ते 'एक था टायगर' अशी परंपरेची झूल उडवत लिखाण करायला लागू. जाता जाता ह्या संदर्भात एक किस्सा आठवला. खालिद मोह्हमद ह्या नामवंत समीक्षकाने हृतीक आणि करिश्मा अशा नामांकित मंडळींना घेऊन 'फिझा' सारखा चित्रपट बनवला. ह्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनदेखील त्याचेच होते. ह्या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी त्याने सुभाष घईला आमंत्रण दिले होते. आपल्या भाषणात घई साहेबांनी जाता जाता एक फार छान वाक्य सांगितले. ते म्हणाले, “आजवर आमच्या चित्रपटातील ज्या ज्या गोष्टींची खालिदने खिल्ली उडवली, त्या सगळ्या गोष्टी ह्या चित्रपटातदेखील आहेतच की.”

footer