तारीख: २४ डिसेंबर १९९९ वेळ दुपारी ४ वाजता.
स्थळ: त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ, काठमांडू नेपाळ.
इंडियन एअरलाईन्सच्या आय सी ८१४ (एअरबस ए३००) या विमानाने नवी दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केले. प्रवासाचा अपेक्षित कालावधी होता १ तास २० मिनिटे.
एकूण प्रवासी - १७८; वैमानिकांसह एकूण कर्मचारी - १५
नेपाळची हवाईहद्द ओलांडून भारताच्या हवाईहद्दीमध्ये विमानाने अंदाजे ४:३० वाजता प्रवेश केला.
विमानाचे मुख्य वैमानिक होते कॅप्टन देवी शरण. त्यांच्या खेरीज कॉकपिटमध्ये होते सह-वैमानिक सिंग आणि फ्लाईट इंजिनियर श्री. जागिया. केबिन क्रूचे प्रमुख होते अनिल शर्मा
विमानातील बहुतांश प्रवासी नेपाळहून भारतात परतणारे पर्यटक होते. त्यामध्ये मधुचंद्राहून परतणाऱ्या रीपण व रचना कट्याल या नवदांपत्याचाही समावेश होता. विमान ठराविक उंचीवर पोचल्यावर केबिन क्रूने प्रवाशांना नाश्ता देण्यास सुरुवात केली. अनिल शर्मा यांनी कॉकपिट मध्ये जाऊन कॅ शरण व त्यांच्या सहकाऱ्यांना चहा नेऊन दिला. कॉकपिट मधून परतत असताना प्रवाशांपैकी एकजण चेहरा झाकणारी टोपी घालून त्यांच्यावर चालून आला. त्याच्या हातात पिस्तूल होते. काही क्षणांतच त्याने कॉकपिट मध्ये प्रवेश मिळवला अन कॅ शर्मा यांच्या मानेवर पिस्तूल रोखले व त्यांना धमकावत विमानाच्या अपहरणाची घोषणा केली. विमान पश्चिमेकडे उडवत राहण्याची सूचना त्याने केली.
त्याच्याखेरीज इतर चार अपहरणकर्ते प्रवाशांमध्ये होते. त्यांनी देखील शस्त्रांच्या जोरावर प्रवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. नाश्त्यासाठी मिळालेले अन्न खाली फेकण्याची सूचना केली, रुमाल, दुपट्टा वगैरेसारख्या कापडांनी डोळ्यावर पट्टी बांधण्यास सांगितले व मान खाली झुकवून दोन्ही हातांची घडी डोक्यावर ठेवण्यास सांगितले. अर्थात या अनपेक्षित संकटाला घाबरलेल्या प्रवाशांकडून कुठलाही प्रतिकार न होता या सूचनांचे पालन करण्यात आले. तेवढ्यात कॉकपिटमधून मायक्रोफोनद्वारे कॅप्टन शरण यांनी प्रवाशांसाठी घोषणा केली की आपल्या विमानाचे अपहरण झाले आहे. संयम बाळगा व अपहरणकर्त्यांच्या सूचनांचे पालन करा.
अपहरणकर्त्यांनी काही पुरुष प्रवाशांना इकॉनॉमी क्लास मधून एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये हलवले. यामध्ये एक जण होता रिपण कट्याल. तिथे अगोदरच इतर पुरुष प्रवासी होतेच. अपहरणकर्त्यांनी या पुरुष प्रवाशांचे हात पाठीमागे वळवून नायलॉनच्या दोरीने बांधले व सिटसला पूर्ण रिक्लाइन करून सिटबेल्टस लावले. प्रतिकार करू शकतील असे जे दिसतील त्या प्रवाशांना अगोदरच प्रतिकारहीन करून टाकले.
कॉकपिटमध्ये अपहरणकार्त्यांच्या प्रमुखाने विमान लाहोरला न्यायला सांगितले. कॅ शरण यांनी उत्तर दिले की विमानामध्ये इतक्या लांब जाण्याइतपत इंधन नाहीये. यावर तो अधिकच चिडला. त्याला ठाऊक होते की या या विमानाकरीता आपात्कालीन परिस्थितीमध्ये पर्यायी विमानतळ अहमदाबाद किंवा मुंबईचे आहे. तो म्हणाला जर हे विमान मुंबईपर्यंत जाऊ शकते तर लाहोरपर्यंत जाण्याएवढे इंधन नक्कीच असणार.
मधल्या काळात कॅ शरण यांनी आपात्कलीन परिस्थितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेडियो फ्रिक्वेन्सीची कळ दाबली होती. त्यामूळे एअर ट्रॅफिक कंट्रोलला कॉकपिटमधील संवाद ऐकू येऊ लागला व त्यांनी इतर यंत्रणांना या संकटाबाबत कळवले. कॅ शरण यांनी यंत्रणांना तयारीसाठी अधिक वेळ मिळावा यासाठी विमानाचा वेग बराच कमी केला. भारताच्या पश्चिम सीमेजवळ गेल्यावर लाहोर विमानतलाच्या एअर ट्रफिकला संपर्क साधला. परिस्थितीची कल्पना देवून लाहोर विमानतळावर लँडिंगची परवानगी मागितली.
पण लाहोरवाल्यांनी सरळ सरळ नकार दिला. कारगिल युद्धाला काहीच महिने झाले होते. त्यातच जनरल मुशर्र्फ यांची लष्करी राजवट येवून जेमतेम दोन महिने झाले होते. अशा परिस्थितीत भारताशी संबंधीत कुठल्याही बाबीपासून चार हात लांब राहिलेलेच बरे हा विचार त्यामागे होता. केवळ नकार देऊन ते थांबले नाही तर लाहोर विमानतळाला त्यांनी बंद केले. सर्व उड्डाणे व लँडिंग्ज बंद केली . धावपट्टीवरचे दिवेदेखील मालवले. या सर्व घडामोडींमूळे अपहरणकर्त्यांची गोची झाली. शेवटी इंधन संपत आले आहे हे पाहून त्यांनी अमृतसर विमानतळावर इंधनभरणासाठी उतरायला मान्यता दिली.
एकदाचे भारतीय भूमीवर लँड झाल्याने सर्वांना हायसे वाटले. वैमानिकांना वाटत होते की आता आपल्याला मदत मिळेल व हे प्रकरण इथेच मिटेल. मधल्या काळात केंद्रिय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेटची आपात्कालीन बैठक सुरू झालेली होती. पंजाब पोलिसांचे कमांडो पथक विमानतळावर तयार होते. पण त्यांना स्वतःहून कुठलिही आगळीक न करता दिल्लीवरून येणाऱ्या एन एस जी पथकाची वाट पहायला सांगण्यात आले. विमानतळावरील एअर ट्रफिक कंट्रोलरला सांगण्यात आले की अपहरणकर्त्यांना बोलण्यामध्ये गुंतवून ठेवा. इंधन देण्यास होईल तेवढा उशीर करा.
विमानातले अपहरणकर्ते काही लहानश्या अपघातात जखमी झालेले लोक नव्हते की ज्यांना गोष्टीत गुंतवून त्यांच्यावर उपचार करता येतील. इंधन भरण्याबाबत प्रत्यक्षात काहीच घडत नाहीये हे पाहून त्यांची चिडचिड क्षणाक्षणाला वाढत होती. कॉकपिटमध्ये होणारा आरडाओरडा नियंत्रण कक्षात ऐकू जात होता. पण दिल्लीवरून मिळालेल्या आदेशांनुसार वाट पाहण्याखेरीज त्यांच्याजवळ काहीच नव्हते. आपल्या धमक्यांना कुणीच गांभीर्याने घेत नाही हे पाहून अपहरणकर्त्यांनी निर्वाणीची कृती सुरू केली. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये हात पाठीमागे बांधून ठेवलेल्या प्रवाशांवर त्यांनी सुऱ्याने वार करणे सुरू केले. यातील जीवघेणे वार रिपाण कट्यालवर करण्यात आले.
भारतीय निर्णयकर्त्यांवर दबाव वाढवण्यासाठी त्यांनी फ्लाईट इंजिनियर जागिया यांना कॉकपिटमधून एक्झिक्युटिव्ह क्लासकडे नेले. मरणासन्न अवस्थेतला रिपाण व इतर जखमी प्रवाशांची अवस्था पाहून त्यांनी बोबडीच वळली. एका अपहरणकर्त्याने सूचक कृती म्हणून रक्ताने माखलेला सुरा जागिया यांच्या शर्टाला पुसला म्हणजे रक्ताचे डाग बघून वैमानिकांची खात्री पटावी. जागिया परत कॉकपिटमध्ये आल्यावर व त्यांच्याकडून केबिनमधल्या घडामोडींची माहिती मिळाल्यावर कॅ. शरण यांनी नियंत्रण कक्षाला कळकळीची विनंती केली की आता तरी इंधन पाठवा कारण अपहरणकर्त्यांनी प्रवाशांना जीवे मारणे सुरू केले आहे.
याउपरही काहीच हालचाल होत नाही हे पाहून अपहरणकर्त्यांच्या प्रमुखाने विमान लाहोरला नेण्यासाठी उड्डाणप्रक्रिया सुरू करण्यास वैमानिकांना भाग पाडले. इंधनाचा साठा अत्यंत धोकादायकरित्या कमी असूनसुद्धा. कॅ शरण यांनी देखील पडत्या फळाची आज्ञा म्हणून तसे केले कारण कुठलाही निर्णय घेण्यास अधिक उशीर म्हणजे प्रवाशांच्या जीवानिशी खेळणे होते.
विमान उड्डाण करत आहे हे दिल्लीमधल्या आपात्कालीन बेठकीत कळले तेव्हा उद्विग्न होऊन तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांनी फोनचा रिसिव्हर स्वतःकडे घेतला व विमानतळावरील नियंत्रणकक्षाला आदेश दिले की असेल ते मोठे वाहन उदा. ट्रक धावपट्टीवर नेवून विमानाला अडथळा करा. यावेळी इंधनाचा टँकर जो बऱ्याच वेळचा तयार होता त्याला धावपट्टीकडे कूच करण्याचे आदेश देण्यात आले. पण दुर्दैवाने काही सेकंदांच्या फरकाने ही खेळी चुकली व टँकर काही मीटर अंतरावर असताना विमान त्याच्या जवळून गेले व उड्डाण यशस्वी झाले. या टँकरमध्ये पंजाब पोलिस दलाचे कमांडो लपून बसले होते व त्यांची योजना होती की, इंधन भरण्याच्या प्रक्रियेच्यावेळी विमानाचे टायर पंक्चर करायचे. अर्थात इंधन न देण्याचे स्पष्ट आदेश असल्याने हि योजना अमलात येऊ शकली नाही. नियंत्रण कक्षाला वाटले की उड्डाण करण्याइतकेही इंधन शिल्लक नाहीये त्यामुळे काहीही झाले तरी विमान त्यांच्या दृष्टीसमोर राहणार आहे. वैमानिकाबरोबरच्या संभाषणावरून झालेला हा समज फारच महागात पडला.
संध्याकाळी ७:३० वाजता अत्यल्प इंधन घेऊन विमान लाहोरच्या दिशेने आकाशात झेपावले व भारत सरकारने हि समस्या स्वतःच्या भूमीवर सोडवण्याची शेवटची संधी गमावली.
अमृतसरवर विमानतळाहून लाहोरचे विमानतळ फक्त ५० किमीवर होते. उड्डाणानंतर लगेचच कॅ शरण यांनी तेथील विमानतळ नियंत्रकांशी संपर्क साधला व लँडिंगची परवानगी मागितली. तोवर माध्यमांतील बातम्यांद्वारे त्यांना या सर्व घडामोडींची माहिती होतीच. त्यांनी परवानगी देण्यास यावेळीही नकार दिला. कारण स्पष्टच होते, पाकिस्तानी निर्णयकर्त्यांना भारताशी संबंधित कुठल्याही अवघड बाबीपासून सुरक्षित अंतर ठेवायचे होते. पाकिस्तानी भूमीवर अपहृतांबरोबर काहीही झाले असते तरी जगभर बदनामी पाकिस्तानचीच झाली असती व अपहरणकर्त्यांना पाकिस्तानी सरकारचीच फूस होती असेच चित्र बनले असते.
कॅ शरण यांनी काकुळतीला येऊन सांगून पाहिले की आमचे इंधन संपत आलेले आहे, तुम्ही लँडिंगची परवानगी न दिल्यास विमानाचा अपघात होण्याखेरीज दुसरे काहीही होवू शकत नाही. लँड झाल्यावर आम्हाला केवळ इंधन द्या, आम्ही तुमच्या भूमीतून निघून जाऊ. हे ऐकूनही पाकिस्तानी नियंत्रकांच्या भूमिकेत तसूभरही बदल झाला नाही. तुम्ही कुठेही जा पणा आमच्या भूमीवर लँड करू नका हा संदेश त्यांनी दिला व संपर्क तोडला. एवढेच नव्हे तर लाहोर विमानतळ विमानवाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. धावपट्टीवरील दिशादर्शक दिवेही मालवण्यात आले. दोन महिन्यांअगोदरच कोलंबोहून परतणाऱ्या जनरल मुशर्रफ यांच्या विमानाच्या लँडिंगच्यवेळीही हाच प्रकार करण्यात आला होता पण त्या विमानाच्या वैमानिकाने अनुभवाचा व कौशल्याचा वापर करत त्याही परिस्थित विमान सुखरूप उतरवले होते. अन त्या घटनेच्या काही तासांनंतरच तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना लष्कराने पदच्युत करून अटक केली होती.
कॅ शरण यांच्याजवळ आता मोजकेच पर्याय होते, अमृतसरला परत जाण्याइतकेही इंधन शिल्लक नव्हते. त्या क्षणी असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे, स्वकौशल्यावर लाहोर नियंत्रणकक्षाच्या कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय लाहोर विमानतळ हुडकून काढणे व विमान लँड करणे. जमिनीवरील दिव्यांची रांग दिसल्यामुळे एका ठिकाणी त्यांनी विमान बरेच खाली आणले तर तो शहरातला रहदारीचा रस्ता निघाला. सहवैमानिक ओरडलाच - सर, ये तो रोड है. अर्थात लाहोरच्या नियंत्रकांना हे सर्व रडारवर दिसत होते व यावेळी त्यांना विमानाच्या परिस्थितीची जाणीव झाली व त्यांनी वैमानिकांशी संपर्क साधून लँडिंगची परवानगी दिली व मार्गदर्शनही केले.
विमानाचे टचडाऊन झाल्यावर दोनपैकी एक इंजिन इंधन संपल्यामुळे बंद पडले. म्हणजे मृत्यूच्या अगदी समीप पोचूनच जीव वाचला होता. विमान यशस्वीपणे लँड झाल्यावर वैमानिकांना पाकिस्तानकडून मानवीय आधारावर काही मदत मिळेल अशी आशा निर्माण झाली. कॅ शरण यांनी लाहोर विमानतळाच्या नियंत्रकांना विनंती केली की काही प्रवासी जबर जखमी आहेत त्यांना वैद्यकीय मदत मिळणे अत्यावश्यक आहे अन्यथा त्यांचा मृत्यू समीप आहे; त्यामुळे जखमी प्रवासी, स्त्रिया, लहान मुले व वृद्ध प्रवासी यांना उतरू द्या. यावर पाकिस्तानी नियंत्रकांकडून उत्तर मिळाले की तुम्हाला इंधन हवे होते तर इंधन देतोय, ते घ्या अन लौकरात लौकर इथून उड्डाण करा. त्याखेरीज कसलीही अपेक्षा ठेवू नका. यावेळी दिल्ली विमानतळावर अपहृत प्रवाशांचे कुटुंबीय जमू लागले.
अखेर निराश मनाने कॅ शरण यांनी इंधन भरून झाल्यावर पुन्हा उड्डाण केले. आता अपहरणकर्त्यांनी विमान काबूल ला न्यायला सांगितले. तेव्हा अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर तालीबानची लष्करी राजवट होती. तिथे अपहरणकर्त्यांना कसलीही आडकाठी येण्याची शक्यता नव्हती. वैमानिकांनी विमान काबूलच्या दिशेने वळविल्यावर तेथील नियंत्रकांशी संपर्क साधला. त्यावर त्यांना उत्तर मिळाले की काबूल विमानतळावर नाइट लँडिंगची सोयच नाहीये. यावर अखेरचा तोडगा म्हणून विमान दुबईकडे वळविण्यात आले. या प्रवासादरम्यान जबर जखमी असलेल्या रिपण कट्यालने शेवटचा श्वास घेतला. त्यापूर्वी तो बराच वेळ पापा पानी, पापा पानी असे पुटपुटत होता. त्याच्या शरीरावर सुऱ्याचे जवळ जवळ १५ वार होते असा उल्लेख त्याच्या शवचिकित्सा अहवालामध्ये आहे.
यावेळी भारत सरकारने युनायटेड अरब अमिरातींच्या सरकारबरोबर संपर्क साधला व दुबई विमानतळावर भारतीय कमांडोजद्वारे कारवाई करू देण्याची विनंती केली. युएइच्या सरकारने ती फेटाळून लावली. मात्र अपहरणकर्त्यांकडून इंधन व अन्नाच्या बदल्यात काही प्रवाशांना विमानातून उतरू देण्यास तयार केले. याचे फलित म्हणून काही जखमी प्रवासी, काही स्त्री प्रवासी व लहान मुले यांना विमानातून उतरू देण्यात आले. सर्वात शेवटी केबिन क्रूला रिपणचे शव विमानाला जोडलेल्या जिन्यावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले. हे दृश्य तेव्हा बातम्यांमध्ये दाखवण्यात येत होते.
या प्रवाशांना आणायला तत्कालीन विमान वाहतूक मंत्री शरद यादव अधिकाऱ्यांबरोबर गेले होते. त्या वेळेस त्यांच्याकडे पारपत्रही नव्हते. ऐनवेळी अधिकाऱ्यांना धावाधाव करून पारपत्र बनवावे लागले व युएईच्या भारतीय वकिलातीच्या सौजन्याने डिप्लोमॅटस साठी असलेला विशेष व्हिसा लगेच मिळाला.
जखमी प्रवासी उतरल्यावर १० मिनिटांतच विमानाने पुन्हा उड्डाण घेतले व ते उत्तरेकडे जाऊ लागले.
२५ डिसेंबरची पहाट - विमानात अजूनही एकूण १६२ लोक होते, बहुतांश प्रवासी निद्राधीन असताना विमानाने कंदहार विमानतळावर लँड केले. कंदहार विमानतळाची धावपट्टी एवढ्या मोठ्या विमानांसाठी पुरेशी नव्हती तरीही वैमानिकांनी कौशल्याने तेथे लँड केले. अपहरणाला १८ तास उलटून गेल्यानंतरही भारताच्या गुप्तहेर खात्यातील अधिकाऱ्यांना या अपहरणकर्त्यांबद्दल काहीच माहिती मिळू शकली नव्हती. दुबईला उतरलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीवरून ते लष्करी प्रशिक्षण मिळालेले, जिहादसाठी जीव द्यायलाही तयार असलेले अतिरेकी होते याची त्यांना पूर्ण कल्पना आली. इकडे कंदहारमध्ये अपहरणकर्त्यांनी विमानाच्या कार्गोमध्ये प्रवेश मिळवून एका मोठ्या बॅगेत लपवून ठेवलेली शस्त्रे विमानात आणली. त्यात पिस्तुले, ग्रेनेड्स वगैरेचा समावेश होता.

२५ डिसेंबरच्या दुपारी रिपण कट्यालचा अंत्यविधी झाला. त्याची दृश्ये जगभरातील वृत्तवाहिन्यांवर दाखवली गेली. ते पाहून भारतातील जनमानसात संताप उसळला व सरकारवर काहीतरी ठोस करण्याचा दबाव वाढला. भारत सरकारचे तत्कालीन तालीबान राजवटीबरोबर कुठलेही राजनैतिक संबंध नव्हते त्यामुळे त्यांच्याद्वारे वाटाघाटी करणेही अवघड होते. त्यातच २६ डिसेंबरला जसवंत सिंह यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अपहृत प्रवाशांच्या नागरिकांनी जोरदार निषेध नोंदवला. काहीही करा पण आमच्या नातलगांना सुखरूप परत आणा. या सर्व गोष्टींचे भारतात नव्यानेच सुरू झालेल्या २४ x ७ वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केले.
शेवटी २७ तारखेला अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक कंदहारला रवाना झाले.
अपहरणकर्त्यांनी विमानाच्या कॉकपिटचा ताबा घेतला व वैमानिकांना केबिनमध्ये प्रवाशांसोबत बसवले.
या पथकामध्ये काही कमांडोजचादेखील समावेश होता. म्हणजे भारत सरकारने कमांडो कारवाईचा पर्याय अजूनही बंद केलेला नव्हता. या गोष्टीची तालिबान्यांना कल्पना दिली गेलेली नव्हती. असे काही घडण्याची शंका येताच तालीबानच्या सैनिकांनी आय सी ८१४ भोवती रणगाड्यांचे व लष्करी वाहनांचे कोंडाळे केले. त्यामुळे भारताच्या अचानकपणे कमांडो कारवाई करण्याच्या मनसुब्यांवर पाणी ओतले गेले.
आता शेवटचा पर्याय शिल्लक होता तो म्हणजे वाटाघाटी. आय सी ८१४ च्या कॉकपिटमध्ये बसून अपहरणकर्त्यांनी भारतीय पथकाबरोबर चर्चा सुरू केली. भारतीय पथक विमानतळावरील एका कक्षात होते. याद्वारे प्रथमच त्यांचा उद्देश भारत सरकारला कळला. त्यांचे प्रमुख लक्ष होते जम्मू येथील तुरुंगात बंदिस्त असलेल्या मौलाना मसूद अझहर याला सोडवणे. जवळ जवळ तीस तासांच्या वाटाघाटींनंतर त्यांच्या सर्व मागण्या स्पष्ट झाल्या, त्या खालीलप्रमाणे
मौलाना मसूद अझहर व ३५ इतर अतिरेक्यांची भारतीय तुरुंगांतून सुटका व त्या सर्वांना कंदहारला पोचवले जाणे
काही महिन्यांपूर्वी मसूद अझहरला जम्मूच्या तुरुंगातून सोडवण्यासाठी केल्या गेलेल्या हल्यात तुरुंगाच्या सुरक्षा रक्षकांकडून सज्जाद अफगाणी नावाचा एक अतिरेकी मारला गेला होता; त्याच्या शवाची मागणी.
त्याखेरीज २०० मिलियन अमेरिकन डॉलर्सची रोख रक्कम
दरम्यानच्या काळात भारतीय गुप्तहेर खात्याला माहिती मिळाली की अपहरणकर्त्यांचा प्रमुख इब्राहिम अझहर हा मौलाना मसूद अझहरचा धाकटा भाऊ आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मसूदच्या सुटकेखेरीज अपहरणकर्ते जुमानणार नव्हते हे स्पष्ट झाले. त्याखेरीज आश्चर्यकारकरीत्या तालिबान्यांनी वाटाघाटींत भाग घेऊन अपहरणकर्त्यांना त्यांच्या काही मागण्या मागे घेण्यास भाग पाडले. त्या मागण्या होत्या सज्जाद अफगाणी याचे शव व २०० मिलियन डॉलर्सची रोख रक्कम. अन त्यामागचे कारण म्हणजे त्या मागण्या गैरइस्लामी होत्या.
२८ डिसेंबर - अपहरण सुरू झाल्यापासूनचा हा पाचवा दिवस. विमानाच्या केबिनची अवस्था अत्यंत घाण झालेली होती. टॉयलेट्सची अवस्था तर पाय ठेवण्यालायकही नव्हती. अनेक प्रवाशांनी विशेष काही खाल्लेही नव्हते. अन वाटाघाटींमध्ये ठोस अशी कुठलीही प्रगती होत नव्हती.
२९ डिसेंबर - वाटाघाटींमध्ये एक सकारात्मक संदेश जावा म्हणून विमानातील ३५ प्रवाशांची विमानातून सुटका करून विमानतळाच्या इमारतीमध्ये रवानगी करण्यात आली. या प्रवाशांमध्ये स्त्रिया व त्यांच्या मुलामुलींचा समावेश होता.
३० डिसेंबर - अचानक विमानतळावर पाठवलेल्या ३५ प्रवाशांना पुन्हा विमानात परत आणण्यात आले. वाटाघाटी संपूर्णपणे फिसकटल्याचा हा परिणाम होता. काही अपहृत प्रवाशांनी आता जिवंतपणे सुटका व्हायची आशा सोडून दिली होती.
३० डिसेंबर - भारतीय अधिकाऱ्यांच्या आठमुड्या धोरणामुळे अपहरणकर्ते सगळा संताप प्रवाशांवर काढू लागले. मारहाण करणे, अंगावर पिस्तुले रोखून जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. आधीच नैराश्याचा परमोच्च सीमेवर असलेले प्रवासी आता असहायपणे मृत्यूची वाट पाहू लागले अन ज्यांच्या आशा जिवंत असलेले मनोमन देवाची प्रार्थना करू लागले.
अचानक काही तासांनी अपहरणकर्त्यांनी घोषणा केली की तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तुमच्या सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत, तुमच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. तिकडे दिल्लीमध्ये तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्र यांनी पत्रकारांना माहिती दिली की अपहरणकर्त्यांबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत व भारत सरकारने अपहृत भारतीय नागरिकांच्या बदल्यात भारतीय तुरुंगात असणाऱ्या तीन अतिरेक्यांना सोडायचे ठरवले आहे. त्यांची नावे
•मौलाना मसूद अझहर
•अहमद ओमर सईद शेख
•मुश्ताक अहमद झरगर
३६ अतिरेक्यांना सोडायच्या मागणीवरून अपहरणकर्त्यांना ३ वर आणले हि गोष्ट हे खूप मोठे यश आहे असे तत्कालीन राज्यकर्त्यांनी दाखवले. प्रत्यक्षात भारत सरकारकडून याबद्दल निर्णय होऊन जाहीर घोषणाही केली गेली असली तरी हा निर्णय जम्मू काश्मीरच्या सरकारवर आदेश म्हणून लादण्यात आला नाही. वरील तिघांपैकी मसूद अझहर व मुश्ताक अहमद झरगर तेव्हा अनुक्रमे श्रीनगरच्या व जम्मूजवळील उधमपूरच्या तुरुंगात होते. ३० डिसेंबरला संध्याकाळी रॉचे (रिसर्च ऍनालिसिस अँड विंग - भारताचे गुप्तहेर संस्था) प्रमुख जम्मूला पोचले व तेथील मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्याबरोबर तातडीची बैठक सुरू झाली. फारूख अब्दुल्ला मसूद अझहरची सुटका करायला अजिबात तयार नव्हते. त्यांचे मन वळवायला रॉच्या प्रमुखांनी सर्व युक्त्याप्रयुक्त्या वापरल्या. अखेर नाईलाजाने का होईना फारूख यांनी मसूद अझहर ची सुटका करायला होकार दिला. हे होईपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती.
३१ डिसेंबर - पहाटे चार वाजता उधमपूर येथील तुरुंगात बंदिस्त असलेल्या मुश्ताक अहमद झरगर याला घेऊन उडालेले हेलिकॉप्टर जम्मू विमानतळावर पोचले तेव्हा श्रीनगरवरून मसूद अझहर अगोदरच पोचला होता. दोघांना घेऊन रॉच्या प्रमुखांचे विमान दिल्लीकडे निघाले. ओमर सईद शेख याची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. तिघांनाही दिल्ली विमानतळावर पोचवण्यात आले. कंदहारला जाण्यासाठी विशेष विमान तयार होतेच. परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह हे स्वतः इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर या विमानाने सुटका करण्यात आलेल्या अतिरेक्यांना घेऊन कंदहारकडे निघाले.
कंदहार विमानतळावर या तिघांना सोडल्यावर अपहरणकर्ते आय सी ८१४ मधून खाली उतरले व तालीबानने पुरवलेल्या एका जीपमधून अज्ञात स्थळी रवाना झाले. विमानाच्या आतील प्रवाशांनी एकमेकांना मिठी मारून, हस्तांदोलन करून सुटकेचा क्षण साजरा केला. आठवडाभरापूर्वी अपरिचित असलेले अनेकजण आता जवळचे मित्र बनलेले होते. विमानतळाच्या इमारतीमध्ये जसवंत सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तालिबानी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
३१ डिसेंबरच्या संध्याकाळी विशेष विमानाने सर्व लोक दिल्लीला परतले. दिल्ली विमानतळावर हजारो लोक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. आय सी ८१४ ला परत आणण्यासाठी जसवंत सिंह यांच्याबरोबर गेलेले काही इंजिनियर व वैमानिक त्या विमानाला घेऊन दुसऱ्या दिवशी परत आले. तालीबानने आठवडाभरात झालेला खर्च वसूल करण्यासाठी मोठे बिल भारत सरकारला पाठवले.
या अपहरणामागची पार्श्वभूमी व इतर तपशील
हे सर्व करण्यामागे पाकिस्तानी अतिरेक्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते मौलाना मसूद अझहर याची सुटका करणे. १९६८ मध्ये जन्मलेला अझहर हरकत उल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा एक महत्त्वाचा नेता होता. त्याला अफगाणिस्तानातील सोव्हियत युनियनविरुद्धच्या युद्धाचा व सोमालियातील यादवी युद्धाचा अनुभव होता. १९९४ मध्ये तो श्रीनगर मध्ये पोचला, त्याचे उद्दिष्ट होते त्याच्या संघटनेतील विविध गटांचे तंटे सोडवून त्यांना एकत्र आणणे. पण काही आठवड्यांतच तो भारतीय सुरक्षा संस्थांच्या हाती सापडला अन या अपहरणामुळे सुटका होईपर्यंत तो बंदिस्त होता. फार प्रभावी वक्तृत्व लाभलेल्या अझहरमुळे अतिरेकी संघटनांना अनेक फायदे होत असत जसे नवी भरती करणे, भरती झालेल्यांना जिहादसाठी जीवाची बाजी लावण्यासाठी प्रेरित करणे. थोडक्यात सांगायचे तर लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगायला हवा अशी त्याची प्रतिमा होती. त्याच्या सुटकेसाठी पूर्वीही जोरदार प्रयत्न करण्यात आले होते जे अयशस्वी झाले होते.
या योजनेच्या पूर्वतयारी बऱ्याच काळापासून सुरू होती. नेपाळहून भारतात यायला भारतीय नागरिकांना पारपत्राची गरज नसे, कुठलेही सरकारी ओळखपत्र चालत असे. अपहरणकर्त्यांची ओळखपत्रे हिंदू व्यक्तींची नावे वापरून मुंबईतून बनविली गेली होती. पैशासाठी या कामात मदत करणाऱ्या एका व्यक्तीला अपहरणकांडाच्या खटल्यात मोठी शिक्षा देखील झाली.
काठमांडू विमानतळावरील ढिसाळ सुरक्षा तपासणी अपहरणकर्त्यांच्या पथ्यावरच पडली. एवढी सारी शस्त्रे व दारुगोळा केबिन बॅग्ज व चेक इन बॅग्जद्वारे विमानात नेमका कसा पोचला हे कधीच उघड करण्यात आले नाही. विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या सढळ सहयोगाखेरीज हे शक्यच नव्हते. या घटनेच्या काही दिवस अगोदरच हे अपहरणकर्ते पाकिस्तानी पारपत्र वापरून पाकिस्तान इंट्रनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाने काठमांडू विमानतळावर पोचले होते. भ्रष्टाचाराचा मार्ग वापरून हे सर्व घडले असावे असे मानण्यास पुरेपूर वाव आहे.
अझहरखेरीज इतर दोन अतिरेक्यांची सुटका होणे हा अपहरणकर्त्यांसाठी बोनसच होता. या सर्व घडामोडींमध्ये स्पष्ट झालेली गोष्ट म्हणजे आपल्या देशाच्या सर्वोच्च नेतृत्वापासून विविध सुरक्षा संस्थांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये आणीबाणीच्या प्रसंगी धडाडीचे निर्णय घेण्याच्या क्षमतेचा अभाव. १९९९ साली लाहोर अमृतसर बसवाहतूक खुली करून तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी शांततेसाठी गंभीर प्रयत्न करणारा नेता अशी जोरदार प्रतिमा बनविली होती पण प्रथम कारगिल युद्ध व नंतर हे अपहरण या घटनांमुळे पाकिस्तानला झुकते माप देण्याची अतिघाई त्यांना नडल्याचे स्पष्ट झाले.
यापूर्वीही भारतात विमानाच्या अपहरणाचे लहानसहान, अर्धवट यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्न झालेच होते. पंजाबमध्ये व काश्मीरमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या व पर्यटकांच्या अपहरणांच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यापैकी काहींचा बीमोड करण्यात सुरक्षा संस्थाना यश आले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारांना तोंड देण्याची हि काही पहिलीच वेळ नव्हती. तरीही या गोष्टीची पहिली माहिती मिळाल्यापासून सुरुवातीच्या काळात अत्यंत ढिलाई दाखवल्या गेली. पंतप्रधान त्यावेळी पाटण्याहून दिल्लीला परतत होतो. त्यांना हि बातमी दिल्ली विमानतळावर देण्यात आली अन मग त्यांनी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले. हेच काम केंद्र सरकारच्या मुख्य सचिवांना तासाभरापूर्वीच करता आले असते.
पहिली बातमी कळल्यावर कुठलीही ठोस उपाययोजना न बनवता (जसे विमान भारतातील ज्या विमानतळांवर उतरू शकते तिथे स्थानिक कमांडोजना तैनात करणे व स्थानिक पातळीवरचे निर्णय घेण्यासाठी मोठ्या हुद्द्यावरच्या पोलिस अधिकाऱ्यांना आदेश देणे) केवळ पुढे काय होणार याची वाट पाहण्यात वेळ दवडला गेला.
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत इतकी आणीबाणीची परिस्थिती असूनही भारतीय लष्कर व हवाईदलाच्या अधिकाऱ्यांना या बैठकींमध्ये पाचारणही करण्यात आले नाही. नेहमीपेक्षा हळू चालवण्यात आलेले नागरी विमान नेपाळ भारत सीमेवरून लाहोरकडे पोचून परत अमृतसरला पोचल्यावरही दिल्लीहून एन एस जी कमांडोजचे पथक तेथे पोचू शकले नाही यापेक्षा अधिक गलथानपणा असू शकत नाही.
अपहरण झाल्यापासून कितीतरी वेळापर्यंत भारतीय बाजूने प्रत्यक्ष निर्णय घेणे व अपहरणकर्त्यांना उत्तर देणे हि जबाबदारी विमानाच्या प्रमुख वैमानिकासच पार पाडावी लागली हि देखील एका मोठ्या राष्ट्राच्या व्यवस्थेस लाजिरवाणी बाब होती.
या सर्व घडामोडींमध्ये अपहरणकर्त्यांचे वागणे आंतरराष्ट्रीय स्तरांवर घडलेल्या इतर अपहरणांसारखेच होते. विमान उडवण्याची व प्रवासी अन वैमानिकांना मारण्याची धमकी देणे, काही प्रवाशांना जखमी करणे, धमकीचे गांभीर्य कमी होऊ नये म्हणून एखाद्या प्रवाशाला जीवे मारणे हे सगळे अगदी नेहमीप्रमाणेच होते. अपहरण झाल्यावर दुसऱ्या देशाच्या भूमीवर जाऊन यशस्वीरीत्या कमांडो कारवाईची उदाहरणे फारच विरळा (यात एक इस्राईलचे आहे) पण १००% निर्विवाद यश कधीच मिळालेले नाही. कमांडो कारवाईदरम्यान काही अपहृतांना जीव गमवावा लागलेलाच आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा संस्थांद्वारा कुठलीही आगळीक न करणे हे एका अर्थाने बरेच झाले कारण एका दुर्दैवी जीवाखेरीज इतर सर्वांचे जीव तर वाचले.
भारताच्या व जगाच्याही दुर्दैवाने सोडलेल्या अतिरेक्यांना दहशतवादी कार्यात उदंड यश मिळाले. अझहर ने जैश ए मोहम्मद स्थापन करून भारतात भारता सरकारचे नाक कापणाऱ्या कारवाया घडवल्या. मूळचा ब्रिटिश नागरिक असणाऱ्या ओमर सईदने तर सप्टेंबर ११ च्या हल्ल्यासाठी पतपुरवठा मिळवून देण्याची भूमिका पार पाडली. नंतर वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनियल पर्ल याच्या पाकिस्तानातील अपहरण व हत्येच्या प्रकरणात त्याला पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली; जी अजूनही प्रलंबितच आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर तर त्याने तुरुंगातून भ्रमणध्वनीद्वारे पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांना तत्कालीन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांचा आवाज काढून फोन करून आक्रमणाची धमकी दिली. एवढेच नव्हे तर मुखर्जींच्या कार्यालयातही फोन लावायचा प्रयत्न केला जो अयशस्वी झाला. भारत पाक युद्ध सुरू करायचा त्याने प्रयत्न करून पाहिला.
राजकीय कवित्व - हे सर्व प्रकरण हाताळण्यात तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह व पंतप्रधानांचे तत्कालीन सचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर असणाऱ्या ब्रजेश मिश्र यांचा वाजपेयी सरकारमधले थिंक टँक म्हणून उदय झाला व मे २००४ मध्ये रालोआचा पराभव होईपर्यंत दोघांवरही वाजपेयींनी मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या. परराष्ट्रमंत्री यासारख्या पदावर असूनही अपहृतांना कंदहारहून परत आणणाऱ्या पथकाबरोबर जाण्याची त्यांची कृती भारतीय सुरक्षा संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी होती. कारण तोवर सगळी उदाहरणे केवळ तोंडाने बोलणारीच होती. प्रत्यक्षात अश्या प्रकरणांच्या वेळी पोलिस अथवा सैनिकांनाच जीवावर उदार व्हावे लागत असे. तालीबानी राजवट भारताची शत्रू नसली तरी भारताच्या शत्रूंशी तिचे मित्रत्वाचे संबंध होते.
मात्र याच कृतीला काही काळानंतर विरोधी पक्षांनी व रालोआतील काही शुक्राचार्यांनी असे रूप दिले की जसवंत सिंह यांनी स्वखुशीने तुरुंगात असणाऱ्या अतिरेक्यांना अफगाणिस्तानात नेऊन सोडले. जसे भारताने काही केले नसते तरीही काही १९२ भारतीय नागरिकांना तालीबानने किंवा पाकिस्तानने सुखरूप भारतात पोचविले असते. रालोआच्या राजवटीत जसवंत सिंह यांनी संरक्षणमंत्रीपदापासून अर्थमंत्रीपदापर्यंत विविध खाती लीलया सांभाळली. मोठमोठ्या गप्पा हाणून सर्वोच्च पदावर डोळा ठेवणाऱ्यांपेक्षा ते नक्कीच विशेष होते.
सुरक्षा व्यवस्थेत झालेले सकारात्मक बदल - या घटनेनंतर भारतीय विमानतळांवरील सुरक्षेत क्रांतिकारी बदल झाले. नेपाळनेही काठमांडू विमानतळाच्या सुरक्षेत बऱ्याच सुधारणा केल्या. घटनेनंतर पहिले ६ महिने इंडियन एअरलाइन्सने नेपाळची हवाईसेवा बंद केली व नंतर काठमांडू विमानतळावर स्वतःची वेगळी सुरक्षा तपासणी व्यवस्था उभारून हवाईसेवा पुन्हा सुरू केली. या सर्व गोष्टींचे यश म्हणजे त्यानंतर आजवर अतिरेकी कारवायांसाठी विमान अपहरणाचा प्रयत्नही भारतीय भूमीवर होऊ शकला नाही.
गेल्या दशकात जम्मू काश्मीरमधील अतिरेकी कारवायांत लक्षणीय घट झाली तरी देशाच्या इतर भागांत त्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. या सर्व गोष्टींना शत्रुराष्ट्रांची अदृश्य फूस असली तरी आपल्या व्यवस्थेतील दोषांमुळे भारतातील विविध प्रदेशांत लोकशाहीचे अनेक लाभ मिळालेले नागरिकच अशा देशविघातक कार्यांमध्ये भाग घेत असतील तर एक व्यवस्था म्हणून ६५ वर्षांनंतरही आपण कमकुवतच आहोत. दहशतवाद्यांना सहजपणे उपलब्ध होत राहणाऱ्या कारणांबद्दलही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री स्व. वसंत साठे यांचे एका चर्चेतले विधान आठवते. ते भारत व पाक यांच्या संबंधांवर होते. ते म्हणाले होते, 'पाकिस्तान छुरा हैं, और भारत तरबुजा, अब चाहे छुरा तरबुजे पर चले या तरबुजा छुरे पर, कटना तो तरबुजे को ही हैं...
कट्टरवादावर आधारित असलेल्या दहशतवाद व भारतीय लोकशाही व्यवस्था यालाही हेच लागू होते.
