नवरा बायकोमधल्या कुठल्याही संवादाचे बघताबघता नेमके कशामुळे विवादात रूपांतर होते, ह्याविषयी जरी दोघांमध्ये विसंवाद असला, तरी ‘समोरचा नेहमीच कैच्या कै बोलतो’, ह्या एका बाबतीत दोघांचेही एकमत असते. जर ‘उद्याच्या पार्टीला कोणती भेटवस्तू घेऊन जायचे’ ह्या विषयावर हा संवाद असेल, तर समोरच्याने सुचविलेले डाऊन मार्केट प्रेझेंट हे वेळ येईल तेव्हा त्याने त्याच्या (किंवा तिने तिच्या) नातेवाइकांनाच द्यावे, आज मी माझ्या आवडीचा अप-मार्केट आहेर देणार आहे, हा निर्वाणीचा इशारा ठरलेलाच असतो. असल्या निर्वाणीच्या इशार्यांचे पालन केले जाते किंवा नाही हे अर्थात हा इशारा फेअर सेक्सकडून आला होता की अनफेअर सेक्सकडून, ह्यावर अवलंबून असते. असो, हा कोळसा जास्त न उगाळलेलाच बरा, जितका जास्त उगाळाल, तितके फेअर-अनफेअर मळभ बाहेर येईल!
मात्र एक नक्की! भेटवस्तू काय घेऊन जायची, ह्याबद्दल अगदी तो इव्हेंट येईपर्यंत वादंग चालत असतो. भेटवस्तूंमध्ये पूर्वी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांची चलती होती. एकमेकांशी कुठलाही समन्वय नसलेले पेले, वाट्या, पातेली घराघरात जमायला लागली. बरे, ते पेलेदेखील द्यायचे तर निदान सहा, आठचा सेट तरी असावा? पण नाही. कोणी तीन उभे पेले दिले, की कोणी तीन बसके पेले दिले असणार! एसटीच्या बसमध्ये दिसावे तसे विविध रंगरूपाची व आकाराची मंडळी फडताळातल्या सिटांवर दाटीवाटीने बसलेली दिसू लागली. तीच गोष्ट चिनी मातीच्या मगांची. प्रत्येक मगवर आपापल्या परीने विनोदी वाटण्याच्या प्रयत्नातली घोषवाक्ये छापलेली. असे मग धड वापरताही येत नाहीत, ना फेकता येत! आणि काही वस्तू अशा आहेत की ज्यांची निर्मिती फ़क्त भेटवस्तू शोधण्याचे कार्य सुगम व्हावे म्हणूनच केली असावी. याउपर त्यांचा काहीही उपयोग नसतो. आहेरात वेगवेगळ्या आकारांचे कँडल स्टँड जमतात. त्यातल्या एकातरी वितळलेल्या मेणाचा लेप लागत असेल तर शपथ!
सुदैवाने भेटवस्तू निवडताना, ती जर (भारतीय) स्त्रियांसाठी असेल, तर ‘साडी’ हा एक बराच सेफ प्रकार आहे. साडी भेट मिळाली की बहुतांश स्त्रिया अगदी खूष होतात! स्वत: अगदी साडी क्वचित नेसत असल्या तरी. किंवा भले डझनावारी साड्यांनी त्यांचे कपाट भरलेले का असेना! लग्नात अगदी कितीही चांगली भेट मिळाली, तरी साडी तर दिलीच नाही असा सूर त्यांच्याकडून बरेचदा ऐकू येतो. त्यामुळे बायकांसाठी भेट म्हणून साडीचा अग्रक्रम असतो. अर्थात साडीची निवड हा मोठा क्लिष्ट प्रश्न असतो. तो सोडवायला बायकाच अगदी उत्साहाने मदत करीत असल्याने पुरुषांनी त्याची चिंता करू नये. साडी भेट मिळाल्यावर ती आवडणे हे मात्र उंबराचे फूल सापडण्याइतके कठीण असावे. ही अशी माझ्याकडे आधीच आहे, मला ही दिली, आणि त्या हिला पाहा किती सुंदर दिली! ही काय धूप-छावच आहे, आजकाल कोण्णी घालत नाहीत असल्या... काय वाट्टेल ती खुसपटे काढून, मिळालेली साडी कपाटातल्या उंच ढिगात सगळ्यात खाली खुपसण्यात येत असेल तर असो! आपले भेट देण्याचे कर्तव्य पार पडलेले असते!
इतके दीर्घ विचारमंथन करून आणलेली वस्तू, घेणारा किती ‘प्रेमाने’ वापरतो हे जर आधीच फास्ट फॉरवर्ड करून पाहण्याची सोय असती, तर मला वाटते जगातली भेटवस्तूंची अर्धी दुकाने बंद पडली असती. मुळात भेटवस्तू निवडण्याचा हा यक्षप्रश्नच निकालात निघाला असता. पण ही फास्ट फॉरवर्ड टेक्नॉलॉजी अवगत नसल्याने, प्रेम आणि पैसे खर्च करून घरोघरी एकापेक्षा एक टाकाऊ वस्तू घेतल्या आणि दिल्या जातात. त्यातल्या बहुसंख्य, वरचे वेष्टन पुन्हापुन्हा बदलून पुनर्वाटपात फिरविल्या जात असाव्यात, हा एक आपला अंदाज. सध्या रिसायकलिंग हा बझ वर्ड असल्यामुळे अशा कल्पना सगळीकडे भराभर फोफावतात. पण उघडपणे हे कबूल करणे म्हणजे सोशल टॅबू! त्यामुळे तेरी भी चूप, मेरी भी चूप असा मामला असतो. रंगीत गुळगुळीत वेष्टनांचा उद्योग मात्र ह्यामुळे जोरात आहे. जसा पूर्वीच्या काळी स्टीलच्या भांड्यांवरची नावे खोडून नवीन नावे घालणार्यांचा उद्योग जोरात होता ना, तसेच! लग्नप्रसंगी वा वाढदिवसाला वगैरे पुनर्वाटप करण्यायोग्यदेखील नसलेल्या वस्तू मिळेल ते अडगळीचे कोपरे शोधतात. तिथून कधी अगदीच अडचणीची वेळ आली तर त्यांनाही चलनवलनाचा व्यायाम मिळतो, किंवा रद्दीवाल्याची टोपली! ह्या सगळ्या वस्तू सोडून उरलेल्या केवळ थोड्यांनाच मालकाकडे वापरले जाण्याचे भाग्य लाभत असावे.
भेटवस्तूंची ही परवड पाहून की काय, इकडे लग्नसभारंभांत लाल पाकिटे देण्याची प्रथा सुरू झाली असावी. नक्षीदार सुबक लाल पाकिटांमध्ये करकरीत नोटा घडी करून बंद पाकीट यजमानाच्या हातात ठेवले की यजमान आणि पाहुणा, दोघेही खूश! काय आणू, आवडेल का? वापरतील का वगैरे डोकेदुखीपासून पाहुण्याची सुटका झालेली असते. ढिगांनी नको असलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावावी लागणार नाही म्हणून यजमानही सुटकेचा नि:श्वास टाकतो.
पाकीटांचे यश पाहून ही प्रथा बघता बघता सगळीकडे पसरली. पाकिटात किती पैसे घालायचे, त्याचे आराखडे एकमेकांना विचारून बांधले गेले. आता तर सिंगापुरात एक अलिखित नॉर्मच तयार झालेला असावा. म्हणजे पार्टी कोठे आहे ह्यावर भेटपाकिटातली रक्कम ठरते. पंचतारांकित मेजवानी आहे, की मोठ्या रेस्ट्रॉँमध्ये, की नुसतीच देवळात ह्यावर पाकिटातल्या रकमा ठरविल्या जात असाव्यात. कोणी तरी म्हणालेही होते, थंब रूल असा आहे की प्रत्येकी जेवणाचा जो खर्च त्या ठिकाणी असतो, निदान तेवढी तरी रक्कम प्रती पाहुणा अपेक्षित असते! बाजारीकरणाचा हा आविष्कारच म्हणायचा!
काही सभारंभात पार्टी हॉलमध्ये घुसण्याच्या मार्गात, रजिस्ट्रेशन टेबल मांडले जाते. टोल नाका असतो ना, तसेच म्हणा हवे तर. किंवा आत मांडलेल्या जेवणाचे मूल्य स्वीकारण्याची जागा! यजमान तिथे स्वागताला उभा असतो. बॉक्स आणि पाहुण्यांची यादी घेऊन एखादी सजलेली सुंदरी, आधी आलेल्या पाकिटांचा टेबलमागे बसलेली असते. त्या बॉक्समध्ये आधी आलेली पाकिटे निष्काळजीपणे टाकलेली असतात. नवीन आलेल्या पाहुण्यासाठी ते चांगले मार्गदर्शक ठरते. एखादा अगदीच बावळट (म्हणजे अंगी नाना कळा असणारा) ती खूण न ओळखता जाऊ लागला तर ती सुंदरी त्याच्याकडे कटाक्ष टाकीत त्या बॉक्समधल्या पाकिटांना उगाचच खाली वर करते. येवढा इशारा बहुधा पुरेसा होतो, आणि पाहुण्याच्या खिशातले विसरलेले पाकीट सुंदरीच्या अथवा यजमानाच्या हातात विराजमान होते. लगेच पाहुण्याचे नाव त्या यादीत टिक केल्या जाते. कोणास ठाऊक, पाहुणा आत गेल्यावर कदाचित खालच्या डुप्लिकेट यादीत इतरही काही नोंदी होत असाव्यात!
हा संशय येण्याचे कारण म्हणजे, एका मित्राच्या सभारंभात त्याने अनुभवलेला चटका! सभारंभ संपल्यावर आलेल्या पाकिटांमधील रोख मोजताना निदान पाच-सहा पाकिटे रिकामीच निघाली होती! अर्थातच, देणार्याचे नावही पाकिटांवर नव्हते! आणि नावे असलेली पाकिटे बाजूला काढून, ही निनावी मंडळी ओळखणे शक्य नव्हते; कारण, आत नोटा टाकूनदेखील निनावी राहिलेली चार-पाच पाकिटे होती. आता बोला! “ती टेबलवरची सुंदरी तुझ्या विश्वासातलीच होती ना?” असा प्रश्न विचारून मी त्याची दुविधा आणखीनच वाढवली!
हे असे सगळे पाहुणे गेल्यावर पाकिटांची उपसाउपस करून दु:खी होण्यापेक्षा, जुन्या काळी गावाकडे पाहिलेला प्रकार आठवला! स्टेजवर नवरा-नवरी बाशिंगे बांधून बसली असत. येणारा पाहुणा काय ती गिफ्ट म्हणा, फ़ुले म्हणा, पाकिटे म्हणा - घेऊन यायचा. ती भेट बघून लगेच माइकवर अनाउन्समेंट व्हायची - “भिका गदराळेकडून वधूस येक पाचवारी हिरवी साडी सप्रेम भ्येट!” लगेच मंडपात टाळ्यांचा कडकडाट! मग त्यातले काही नमुने ऐकण्याजोगे असत!
“येरबा दांडगट आणि पतनी कडूनवरवधूंस ईस रुपे आणि कुकवाचा करंडा भ्येट!”
“कोतवाल कदम याजकडून वरासाठी दुद काढायची बादली”.. काय विचारू नका! अशात रिकामे पाकीट आले असते तर कोण जाणे, अशी अनाउन्समेंट झाली असती - “भिमा बसनाळेकडून येक रिकामा लिफाग्फा!”
हे लिफाफा प्रकरण आता लोकांमध्ये एवढे आवडते झाले आहे की काही निमंत्रण पत्रिकांवर चक्क ‘बॉक्स गिफ्ट्स कृपया आणू नये’ असे आवर्जून लिहील्या जाते. म्हणजेच, रोख रकमेत आहेर द्या असा संदेश देणे! मनोरंजनाच्या कार्यक्रमासारखे सरळ प्रवेशशुल्क अमुक अमुक असे लिहिणेच अजून बाकी आहे. काही पत्रिकांवर ‘आपला आशीर्वाद हाच आहेर’ असे लिहिले असले, तरी आणणार्याने प्रेमाने आणलेच आहे तर त्याचे मन का दुखवा, म्हणून मागील कोपर्यात भेटी स्वीकारल्या जात आहेत, असेही दृष्य कधी दिसते. अशा वेळी आहेर देणारा भेटेल त्या आहेर न देणार्याजवळ “आम्ही आहेर न देता कुठल्याच सभारंभाला जात नाही हो!” अशी टिमकी मिरवायला विसरत नाही.
भेट वस्तूंच्या ह्या देवाणघेवाणी बाजाराचे अगदी तंत्रशुद्ध व्यवस्थापन काही ‘प्रगत’ देशांत झालेले दिसून आले. आंतरजालामुळे जग आधीच छोटे झालेले आहे. आता वेबअॅपमुळे त्याला प्रभावी चेहरादेखील मिळाला आहे. डोहाळजेवण (ह्याला बेबी शॉवर का म्हणतात कोण जाणे), लग्न इत्यादी सभारंभ असले की वेबअॅपवर एक इव्हेंट प्रकाशित करायचा. त्यावरच गेस्ट लिस्ट मॅनेजमेंट अॅप असते. सभारंभाला कोण येणार ह्याची ह्या अॅपवर नोंदणी होते. त्या पानावरच भेटवस्तू रजिस्टर करून ठेवायची. पण निवडीसाठी तुम्हा नवराबायकोत उगाच वाद नको व्हायला, म्हणून यजमानाची विश लिस्ट तिथे असते. कुठल्या दुकानातून ती घ्यायची ह्याचीही लिंक असते. ती भेट जर कोणी या आधी सिलेक्ट केली नसेल, तर त्यावर जाऊन कार्डने पैसे भरून ती आरक्षित करून ठेवता येते. म्हणजे यजमानाला हव्या असलेल्याच वस्तू मिळतात आणि डुप्लिकेट होत नाहीत.
बरे, एखादा विश लिस्ट आयटम खूप महाग असेल तरी काही हरकत नाही. पाहुणे त्यावर आपल्या इच्छेप्रमाणे रक्कम नोंदवू शकतात. प्रत्येकाने नोंदलेल्या अशा रकमा एकत्रित होऊन तिथे दिसतात. म्हणजे आवश्यक असेल ती कमी नवीन पाहुणा भरून काढू शकतो, किंवा अर्थातच यजमान ती कमी भरून ती वस्तू घेऊ शकतो आणि दुकानातर्फे ती वस्तू यजमानाने सांगितलेल्या वेळी ठिकाणावर पोहोचविण्याची सोयदेखील असते.
व्यवस्थापन तंत्राचा हा उत्तम नमुना जरी म्हणता आला, तरी सगळ्या उपस्थितांसमोर, स्वहस्ते भेट देण्यात पाहुण्यांना जो आनंद होतो, तो अशा परस्पर पोहोचविलेल्या भेटींनी कसा मिळणार? मग तो आनंद मिळविण्यासाठी, जालावरील आमंत्रणावर ती वस्तू बुक करून, दुकानातून स्वत: घेऊन ती सभारंभात स्वहस्ते आणणार्या उत्साही पाहुण्याचे काय होत असेल, ह्याचे काल्पनिक व्यंगचित्र मला एकदा दिसले.
जालावरच्या गिफ्ट ऑर्डर फॉर्ममध्ये लग्नात वधूवरांना कोणत्या भेटी हव्या ही यादी होती. नेहमीच्याच डीव्हीडी प्लेयर, टेनिस रॅकेट, ड्रेस, कॉस्ट्युम जुवेलरी इत्यादी इत्यादी. जवळ वळ सगळ्या वस्तू घेतल्या गेलेल्या दिसत होत्या. मात्र एका वस्तूने माझे लक्ष वेधून घेतले. मी खुर्चीवरून पडायचाच बाकी राहिलो. ‘घरात वापरायची शिडी’ त्या वराला हवी होती. ती काही कोणी अजून दिली नव्हती. बहुधा वाचणारे माझ्याचसारखे हसून हसून फुटले असतील!
मला कार्टून काढता येत असते तर मी ही संधी नक्कीच सोडली नसती. एक दांपत्य नटून थटून लग्नाच्या हॉलमध्ये प्रवेश करीत आहे. पुरुषाच्या हातात कशीबशी सांभाळलेली, रंगीत कागद गुंडाळलेली अॅल्युमिनियमची उंच शिडी आहे. त्याच्याकडे अचंब्याने पहाणार्या बघ्यांना तो म्हणत आहे - “काय करणार, जालावरच्या यादीत ही एकच वस्तू टिक केलेली नव्हती, मग मला तीच आणावी लागली!”
खरं तर, भेट देणे-घेणे हा किती सौहार्दपूर्ण सोहळा असायला हवा, नाही का? कुठली का असेना, पण प्रेमाने दिलेली भेट देताना आणि घेताना दोघांचाही ऊर प्रेमाने भरून यायला हवा. पण आजकाल जीवनाच्या बाजारीकरणात आम्ही हा आनंद गमावून बसलो आहोत. आता फ़क्त मोजमाप, तुलना आणि वन अपमनशिपची दु:खदायक स्पर्धा तिथे शिरली आहे. ह्याने काय आहेर दिला, त्याचा आहेर किती महागडा होता, त्याने लग्नसभारंभात कुठे जेवण दिले, अशा गोष्टींवर मनामनातली नाती तोलली जातात. साने गुरुजींच्या गोष्टीतला भाऊबिजेला सुपारी देणारा भाऊ आणि डबडबत्या डोळ्यांनी ती ओवाळणी स्वीकारणारी बहीण कुठे बघायला मिळेल? तशी बहीण आता सिनेमामध्येदेखील दिसणार नाही. कारण सिनेमा काय किंवा लेख काय, शेवटी जनमानसाचा आरसाच असतात! तेव्हा ह्या आरशात भेट जनातली जी स्मरते, ती बघण्याचा हा एक प्रयत्न!..... भेट तुझी माझी स्मरते!
