अ‍ॅनिमल्स आशिया

जिल रॉबिन्सन ह्या ब्रिटिश स्त्रीस लहानपणापासूनच जनावरांविषयी प्रेम होते, व त्यामुळे तरुण वयात तिने ब्रिटनमध्येच व्हेटर्नरी डॉक्टरच्या मदतनिसाचे काम केले होते. १९८५ साली तिच्या नवर्‍यासमवेत ती हाँगकाँग येथे गेली. तिथेही तिने व्हेटर्नरी डॉक्टरच्या मदतनिसाचे काम पत्करले. तिथे जनावरांच्या संबंधित कार्य करणार्‍या 'इंटरनॅशनल फंड फॉर अ‍ॅनिमल वेल्फेअर' ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या आशियातील प्रमुखाशी तिची ओळख झाली. जिलने ह्या संस्थेसाठी ह्यापुढील ११ वर्षे काम केले. आशियाई देशांतून जनावरांना मिळणार्याक क्रूर वागणुकीची अनेक उदाहरणे तिला ह्या काळात स्वतःला पाहता आली. १९९८ साली तिने स्वतः ‘अ‍ॅनिमल्स आशिया’ ही संस्था स्थापन केली.

चीनमध्ये अस्वलांचे अनेक 'फार्म्स' आहेत. ह्यात एकेकटी अस्वले अगदी छोट्या पिंजर्याकत कोंडून ठेवतात. त्यांच्या शरीरात विशिष्ट ठिकाणी भोक पाडून त्यातून नळी आत सारतात, जिच्यामार्गे त्यांचे पित्त (bile) बाहेर खेचले जाते. काही मानवी व्याधींवर हे उत्तम इलाज आहे, असा समज असल्याने ह्या फार्म्सचे मालक ते विकून पैसा कमावतात. अस्वले अत्यंत वाईट परिस्थितीत जखडून ठेवलेली असतात, त्यातून त्या नळीने त्यांचे पित्त (bile) सतत शोषण केले जात असतेच. कालांतराने ती व्याधिग्रस्त होतात, जखमेत सेप्टीक होते, व त्यांचा क्रूर अंत होतो.

१९९३ साली IFAW संस्थेसाठी काम करीत असताना जिलच्या नजरेत असा एक फार्म आला होता. हे क्रूर उपक्रम बंद करण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील, ते आपण केले पाहिजेत, असे तिने तेव्हाच मनोमन ठरवले होते. अॅ निमल्स आशिया स्थापन करावयाच्या अगोदरच १९९५ साली एका अस्वलाची सुटका करण्यात तिला यश आलेले होते.

तरीही ह्या फार्म्समधून अस्वलांची सुटका करणे व असे फार्म्स बंद करवणे हे अर्थात अत्यंत जिकिरीचे काम आहे, ह्याची जिलला कल्पना आहे. म्हणून ह्या कार्यासाठी तिच्या संस्थेने अत्यंत विचारपूर्वक धोरणाची आखणी केलेली आहे. 'चीनमधील अस्वलांची सुटका' ह्या उपक्रमासाठी स्थानिक सरकारे, समाज व या फार्म्समध्ये ज्यांचे व्यवहार गुंतले आहेत, अशा व्यक्ती ह्या सर्वांशी झगडा न उभारता, त्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी सुसंवाद साधत हे कार्य केले, तरच त्यात यश आहे, हे अगदी प्राथमिक धोरण संस्थेने ठरवले. २००० साली संस्थेने चिनी सरकारशी ह्या फार्म्समधून ५०० अस्वलांची सुटका करण्याचा करार केला, तेव्हापासून ह्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. असे करताना अस्वलांच्या पित्ताव्यतिरिक्त (bileव्यतिरिक्त) झाडपाल्यापासून बनवलेली इतर काही औषधी अधिक उपकारक आहे, हे संस्थेने साधार दर्शवून दिले. तसेच सदर फार्म्स बंद केल्यामुळे त्यांच्या मालकांस सरकारकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याची जबाबदारीही संस्थेने घेतली.
नंतर ह्याच उपक्रमास थोडे पुढे नेऊन संस्थेने २००६ साली व्हिएतनाम येथील २०० अस्वलांची सुटका करण्याचा तेथील सरकारशीही असाच करार केला. आजतागायत जिलच्या ह्या संस्थेने चीनमधून व व्हिएतनाममधून मिळून ४०० अस्वलांची सुटका केलेली आहे. अस्वले असलेली ही फार्म्स आता बंद झालेली आहेत. सुटका झालेल्या अस्वलांसाठी संस्थेने चीनमध्ये व व्हिएतनाममध्ये खास छावण्या उभारल्या आहेत. ह्या छावण्यांत व्हेटर्नरी डॉक्टर्स, तसेच प्रशिक्षित नर्सेस इत्यादी कर्मचारी वर्ग आहे.

एकट्या चीनमध्येच अजून सुमारे १०,००० अस्वले अशाच फार्म्समध्ये बंदिवासात आहेत. हे कार्य विशाल स्वरूपाचे आहे, अजून बरीच मजल मारावयाची आहे, ह्याची जिल व तिच्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांना जाणीव आहे.
अग्नेय आशियात इतर जनावरांनाही अनेकदा क्रूर वागणूक दिली जाते. गेल्या दहाबारा वर्षांत चीनमध्ये खाजगी प्राणिसंग्रहालये, तसेच सफारी पार्क्स सुरू झालेले आहेत. ह्या पार्क्समध्ये वाघ, तरस, अस्वले इत्यादी प्राणिभक्षक जनावरे असतात. प्राणिसंग्रहालयास भेट देणार्यास पाहुण्यांच्या 'मनोरंजनाप्रीत्यर्थ' दररोज ह्यांचा एक 'खेळ' असतो, त्यांच्यासाठी टाकलेल्या भक्ष्यावर झडप घालून पाहुण्यांसमोर त्याचा फन्ना उडवणे, हा! ह्यासाठी शेळी, कोंबडी, गाय इत्यादी जनावरे बळी दिली जातात. जिलच्या संस्थेने असल्या उपक्रमांची पाहणी सुरू केली व त्यांची मोजदाद ठेवलेली आहे. तसेच ह्या अघोरी प्रथेवर बंदी घालण्याच्या दृष्टीने संस्थेने सरकारबरोबर बोलणी सुरू केलेली आहेत. ह्यामुळे जगापुढे देशाची प्रतिमा डागाळते, असे सरकारला पटवून देऊन बंदीविषयक विधेयक पुढे करता येईल, असा संस्थेचा विचार आहे.

ह्याबरोबरच संस्थेने 'डॉक्टर कुत्रे' हा उपक्रमही अंगीकारला आहे. कुत्रे माणसांचे नि:स्पृह मित्र असतात, तेव्हा इस्पितळे, विकलांग माणसांसाठी असलेली आधारगृहे, अनाथालये, येथे संस्थेच्या मदतीने खास प्रशिक्षण दिलेल्या कुत्र्यांना नेऊन त्यांच्यातर्फे तेथील निवासी रुग्णांवर, वृद्धांवर अथवा विकलांग व्यक्तींवर 'अॅनिमल थेरपी' करणे, हा तो उपक्रम होय.
१९९१ साली हाँगकाँग येथील बालकांच्या एका रुग्णालयात स्वतःचा कुत्रा नेऊन जिलने ह्याची सुरुवात केली होती. अस्वलांच्या फार्म्सचे कार्य थोडे मार्गी लावल्यावर तिने संस्थेतर्फे हे कार्यही अंगीकारले आहे.

अनेक संस्थांनी व सरकारांनी जिलला वेळोवेळी पदके देऊन तिच्या ह्या सर्व कार्याची नोंद घेतलेली आहे.

जिलच्या संस्थेची सविस्तर माहिती तिच्या संस्थळावर मिळू शकते.

footer