
चित्रगृहातील फक्त एक दिवा चालू राहतो उशिरा आलेल्या प्रेक्षकांना जागा नीट दिसावी म्हणून. काहीतरी जाहिराती वगैरे पडदा व्यापून असतात. मग ती वेळ येते. अंधार.
टूण डॅंग, टूण डॅंग, टूण डॅंग टूण डॅंग
तरा त रा ................
पडद्यावर कॅमेर्याच्या शटरसारखा पिसारा व त्यात एक गोल. त्यात एक उंचनीच व्यक्ती पडद्याच्या डावीकडे चालू लागते. मग
पुढचा पिसारा डावीकडे उजवीकडे सरकतो व एकदम ती व्यक्ती प्रेक्षकांवर गोळी झाडते. रक्ताचा ओघळ मात्र वरून खाली असा पडद्यावर सरकू लागतो.
मग वर दर्शविलेली "अल्बर्ट ब्रोकोली ...प्रेझेन्ट्स .......इयान फ्लेमिंग्ज" ही अक्षरे प्रकट होतात......
इयान फ्लोमिंग हे काही काळ सैन्यात होते. त्यानी आयुष्यात नंतर व आधी प्रत्रकारितेत काम केले. दुसर्या महायुद्धात त्याने अनेक कमांडोज व गुप्तहेर जवळून पाहिले. आपल्या निरीक्षणाची शिदोरी घेऊन कमांडर जेम्स बाँड हा मानसपुत्र निर्मिला. उंच, बांधेसूद, कपाळावर केस न येणारा, निळ्या डोळ्यांचा, प्रणयी, निर्दय, समयसूचक, थंड डोक्याचा, प्रसंगी वरिष्ठांना नडणारा. १९६२ साली "डॉ. नो" ते अलीकडेच प्रदर्शित होऊ घातलेला ‘स्कायफॉल, या ५० वर्षांच्या प्रवासात अनेक नटांनी हे पात्र रंगविले. ग्रेगरी पेक, हॅरिसन फोर्ड, टॉम क्रूझ अशांची वर्णी या कामी लागली नाही. पण ज्यांनी हे पात्र साकारले, त्यातील चौघांनी तरी ते पात्र आपल्या वेगवेगळ्य अभिनयशैलीने मस्त रंगविले.
काळाच्या ओघात विशेषत: रॉजर मूरने या पात्राला मिश्कीलपणाची डूब दिल्यानंतर बाँड हा प्रौढांचाच लाडका नायक राहिला नाही. निर्मात्यांनीही स्त्रीच्या अंगप्रदर्शनाचे प्रमाण कमी करून सर्वांनाच माय नेम इज...बोंड...जेम्स बाँड हे टिपिकल वाक्य मूरनंतरच्या सर्व बाँडना सर्वच वयोगटाच्या प्रेक्षकांसमोर पेश करण्याची संधी दिली.
बाँड हा सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, इंडियाना जोन्स, काउंट ड्रॅक्युला, फॅन्टम, फॉन्टोमस, पिंक पँथर, मिस्टर बीन यांच्याप्रमाणेच अजरामर झालेला आहे. त्यात बाँडचे खास काय आहे हो? असा प्रश्न पडावयासच नको खरे तर! १९६२मध्ये "डॉ. नो" या चित्रपटाने खरे तर बाँडपटाने प्रथम रुपेरी पडदा पाहिला. आता ‘स्कायफॉल’ या तेविसाव्या बाँडपटापर्यंत ती वाटचाल आली आहे. सारेच बाँडपट अगदी तुफान यशस्वी झाले नाहीत, पण बहुतांशी झाले. त्यामागे प्रथम अल्बर्ट ब्रोकोली व आता बार्बरा ब्रोकोली यांचे कौतुक आहेच. पण अनेक कारणांनी यशस्वी बनण्याची बाँडपटांची परंपरा का निर्माण झाली, हे पाहणे रंजक ठरावे.
बाँडपटाचे प्रथमपासूनच खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची श्रेयनामावली. त्या त्या काळातील अत्युत्तम तंत्रांचा ग्राफिक्समध्ये वापर करून घेतलेली ‘टायटल्स’ चुकवू नये अशीच असतात. साधारणपणे चित्रपटाचा विषय व श्रेय नामावली यांचा संबध सर्व हॉलीवूड पटात असतो, पण विशेषत: बाँडपटात हे प्रकर्षाने जाणवते. उदा. अलीकडच्या 'कॅसिनो रोयाल'चे पाहा. चित्रपटातील पत्त्याचा जुगार आपल्याला श्रेयनामावलीत दिसतो. श्रेयनामावलीत चित्रपटाच्या नावाशी संबंधित गीत बहुधा असते व त्या धुंदफुंद गीताच्या पार्श्वभूमीवर मदनिकांच्या आकृत्या, पिस्तुले व दस्तुरखुर्द महाशय कमान्डर जेम्स बाँड हे असतात.
बाँड यांचे पूर्ण नाव 'जेम्स बाँड' असून त्याना त्यांची प्रेयसी, त्यांचे बॉस ‘एम’ व त्यांच्या कार्यालयातील मिस मनीपेनी ह्याच व्यक्ती सर्वसाधारणपणे जेम्स या नावाने संबोधतात. वाकी सहकारी डबल ओ सेव्हन या नावाने त्यांना संबोधतात, तर त्यांचे शत्रू त्यांना मिस्टर बाँड या नावाने संबोधतात. जेम्स बाँड हे ब्रिटिश नेव्हल सर्व्हिसेसचे सदस्य असून हा कमांडर त्यांचा हुद्दा आहे. एम १६ या गुप्तचर विभागाचे एजंट म्हणून साहसी कारवाया करणे व मानवजातीच्या दुष्मनांचा नायनाट करणे, हे त्याचे जीवितकार्य आहे. बाँडपटाच्या सर्वच कथा इयान फ्लेमिंग यांच्या कृती नाहीत. तरीही श्रेयनामावलीत निर्माते इयान फ्लेमिंग यांचे नाव आवर्जून देतात.
एका साहसी मोहिमेने बहुतेक वेळा बाँडपटाची सुरुवात होते. त्यात जबरी मारामारी वगैरे होऊन बाँडच्या व्यक्तिमत्त्वाची एक झलक दाखविली जाते. मग श्रीमान बाँड हे नव्या मोहिमेसाठी एम १६च्या कार्यालयात दाखल होतात व मुख्य कथानक चालू होते. तसे पाहता बाँड यांचा कारभार एकहाती नसतो. हरेक मोहिमेत एक प्रेयसी व एक स्थनिक साहाय्यक त्यांना येऊन मिळतोच. काही वेळेस प्रेयसीच धोका देते व विषकन्या बनू पाहते, असेही कथानक असते. बाँडपटातील काही मूलभूत गोष्टी प्रेक्षकांनाही आता पाठ झालेल्या आहेत. मियामी, वॉशिंग्टन, शिकागो, न्यूयार्क, सॅन फ्रॅन्सिस्को व लॉस एंजिलिस, तसेच ग्रॅन्ड कॅनियन येथे अमेरिकन चित्रपटांचे चित्रीकरण होताना दिसते. पाईनवूड स्टूडियो लंडन येथे बाँडपटाचे इनडोअर शूटिंग; तर जगभर कुठेही म्हणजे बहामा, कॅरिबियन वेटे, माल्टा, हॉलंड, भारत, दक्षिणपूर्व आशिया, जपान, सार्दिनिया, ग्रीस, नेपाळ येथे बाह्य चित्रीकरण झालेले आढळून येईल. मधूनमधून आदिवासी लोकांच्या वस्त्यांच्या ठिकाणीही बाँडमहाशय साहसे करताना आढळतात.
अर्नोल्ड श्वार्त्झनेगर यांच्या चित्रपटातील अशक्यप्राय साहसांप्रमांणे बाँडपटात साहसे दाखविण्यात येत नाहीत. मोठे मोठे किडे, साप असला अवास्तव आचरटपणाही बॉन्डपटात टाळलेला दिसेल. बाँडच्या साहसांप्रमाणे साहसे प्रत्यक्ष करून दाखविणारे लोक आहेत. फक्त या सार्याच साहसांचे एकत्रीकरण बाँड यांच्या कौशल्यात कसे काय दिसते बुवा? असा प्रश्न पडणे शक्य आहे. बाँडना कमांडो पद्धतीचे प्रशिक्षण मिळाले असावे, असे त्याचे उत्तर शोधता येते. बाँड एकाच वेळी हिंदी हीरोप्रमाणे अनेकांशी मारामारी करताना आढळणार नाहीत. जमिनीवरून गुरुत्वाच्या विरुध्द दिशेने उडी घेताना दिसणार नाहीत. बाँड हा माणूस ताकदीपेक्षा युक्तीचा, तसेच साधनांचा वापर करताना आढळतो. खात्याच्या तांत्रिक प्रयोगशाळेकडून त्यांना अशी जादुई साधने वेळोवेळी पुरविण्यात येतात. बाँडच्या पटात त्याच्या डेमोचा एक कार्यक्रम असतोच. एका चित्रपटात मांसाचे तुकडे एका खडकावर टाकून त्यांचा मगरींसाठी आकर्षण म्हणून शत्रूने उपयोग केलेला असतो. व खडकावर उभे असलेल्या बाँडच्या पायापाशी ते तुकडे ठेवलेले असतात. त्याच मांसाच्या तुकड्याना विशिष्ट अंतरावर फेकून मगरींचा सेतू उभा करून बॉन्ड मगरीच्या पाठीवर पाय देऊन पळून जातो. किंवा एका चित्रपटात बाथरूममध्ये सोडलेला विषारी साप तो ज्वालाग्राही रूम-स्प्रेने जाळून टाकतो, ही बाँडच्या समयसूचकतेची पुरेशी उदाहरणे आहेत.
जेम्स बाँड हे शत्रूच्या गोटात जाऊन वेगवान हालचाली करून शत्रूचा प्लॅन व प्लॅन्ट दोन्ही उडवून लावतात. बहुतेक वेळा हे प्लॅन्ट भूमीखाली असतात. कधी पाण्याखालील स्कूबा डायव्हरच्या रूपात शत्रूशी भिडणे, कधी स्विस आल्पसच्या उतारांवर स्केटिंग करीत गुंगारा देणे, कधी अस्मानातून डीप जंप घेणे तर कधी अॅेमस्टरडॅम वा व्हेनिसमधील चित्तथरारक पाठलाग, तर कधी सॅन फ्रॅसिस्कोच्या गोल्डन गेट ब्रिजवर मारामारी, असा प्रचंड साहसाचा मसाला ठासून भरण्यात या चित्रपटाचे निर्माते वाकबगार आहेत. अशा साहसी कारवाया करताना बाँडपटाची टूण डॅन्ग ,,,टूण डॅन,,,,,,टूण डॅन्ग तरा त्त रा ही सिग्नेचर धून वेगवेगळ्या चित्रपटात वेगवेगळ्या वाद्यांवर व दर वेळी नवा बाज घेऊन वाजविली जाते. हे बाँडच्या चाहत्यांना मोठे रोमांचकारी वाटत असते.
बाँडपटांची नावे ही कधी लांब तर कधी लहानशी असतात. नेव्हर से नेव्हर अगेन, ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्वीस, द स्पाय हू लव्हड मी ही लांब किंवा गोल्डफिंगर, कसीनो रोयाल अशी आखूड. बहुतेक सर्व चित्रपट टेकनिकलरमध्ये असून पॅनव्हिजन या अॅस्पेक्ट रेशोमध्ये असतात. बाँडपटात आलेली काही इतर पात्रेही लोकांच्या दीर्घकाल स्मरणात राहिलेली आहेत.
जेम्स बाँड यांना अतिअडचणीच्या प्रसंगी साह्यभूत व्हावीत अशी साधने बनविणारे श्री क्यू हे असेच पात्र आहे. ते एकूणापैकी २० बाँडपटात येऊन गेले आहे. एम, मिस मनीपेनी हे तर आहेतच पण स्कारामांगा, ब्लोफेल्ड या उलट्या काळजाच्या व्यक्तिरेखांनाही आपण विसरू शकत नाही. एका चित्रपटातील क्लॉ नावाचे पात्रही अविस्मरणीय. बॉक्स ऑफिसवरील धंद्याचा भाग म्हणून अल्पवस्त्र मदनिका हा बाँडपटाचा अविभाज्य भाग आहे. तरी अलीकडे त्याला अधिक मर्यादा आलेल्या दिसतात. अशी मदनिका समुद्राच्या पाण्यातून किनार्याकडे डौलात चालत येत बिकिनीवर दर्शन देते, असा प्रसंग बहुधा बाँडपटात असतोच. मदनिका मात्र नायिका नसेल तर छद्मीपणे ‘गुडबाय मिस्टर बाँड,,, (मीन्स गो टू हेल नाऊ) असे म्हणायचा सीनही असतो.
बाँडपटात सात वेळा चमकून रॉजर मूर हा आघाडीवर आहे, तर सहा चित्रपटात झळकून शॉन कॉनेरी हा रनरअप आहे.
पण डॅनियल क्रेग याने सादर केलेला आताचा ‘जेम्स बाँड’ सर्वोत्तम आहे, असे अनेकांचे मत आहे. बॉक्स ऑफिसचा विचार करता असे दिसते की एकाही बाँडपटाने निर्मात्याला खड्ड्यात घातलेले नाही. पण खर्चाच्या मानाने गल्ल्ला गोळा करण्यात बॉन्डपट क्रमाक्रमाने घसरत चाललेले दिसतात. १९६२ साली प्रथमच बाँडपट ‘डॉ.नो’ या नावासह प्रदर्शित झाला, त्याचा एकूण खर्च व गल्ला यांचे प्रमाण १:५८ असे होते, ते घसरत जाऊन ‘क्वांटम ऑफ सोलेस’पर्यंत ते १:२ इतके घसरले आहे. बहुधा हॅरिसन फोर्ड, टॉम क्रूझ, अर्नोल्ड श्वार्त्झनेगर यासारख्यांच्या थीमवाल्या थ्रिल्ररनी बाँडपटांना चांगलाच शह दिलेला दिसतो.
बाँडपटाबद्दल मजेशीर कथाही आहेत. श्री इयान फ्लेमिंगनी आपल्या काही वैयक्तिक ‘आवडीनिवडी जेम्स बाँड या मानसपुत्राला चिकटविल्या आहेत. १९६४मध्ये त्यांचे निधन झाले, त्यापूर्वी १९६३मध्ये त्यांनी एका बाँडपटात हौस म्हणून दीड मिनिटाचे काम केले आहे. इतर काही प्रसिद्ध व्यक्ती (उदा. मॅडोना) यांनीही प्रसंगी अगदी लहान फुटेज असलेली कामे केली आहेत. याबाबत निष्ठावंत निर्माते अल्बर्ट ब्रोकोली यांनीही एका बाँडपटात आपली हौस भागवून घेतली. (अशी ‘हौस’ आपल्याकडे सुभाष घई व हॉलीवूडमध्ये आल्फ्रेड हिचकॉक यांना होती, हे बाय द वे सांगावेसे वाटते). बाँडपटांना फारसे गौरव पुरस्कार काही मिळाले नाहीत, पण दोन चित्रपटांना तांत्रिक बाबतीत ऑस्कर मिळाले. बाकी चार चित्रपटांना उत्कृष्ट संगीतासाठी नामांकन मिळाले होते.
हे काही असले तरी बाँडचा एक चाहतावर्ग आहे. तो बाँडचा नवा चित्रपट आला की थेटरला जाऊन आजही पाहतो.
या वेळी टायटल्समध्ये नवीन काय? बाँडची मल्टीपर्पज कार आता काय काय घेऊन येते? मारामारीसाठी आता कोणती नवी लोकेशन्स असणार? याची उत्सुकता त्याला थेट चित्रगृहाकडे खेचून नेते. या वेळी १९६२सारखे थेटर नसते. तिथे आता आरामदायी खुर्च्या, मंद रूम स्प्रे, मोठा पडदा सगळे चकाचक! अंधार होतो. पडद्यावर कॅमेर्याच्या शटरच्या पिसार्याचे ग्राफिक अवतरते.. गोलाकार आकारातून बाँडची आकृती चालू लागते. साउंड ट्रॅकवरचे सिग्नेचर ट्यून आजूबाजूच्या अत्याधुनिक स्पीकरमधून घुमू लागते. ‘टूण डॅंग, टूण डॅंग, टूण डॅंग टूण डॅंग तरा त रा .......
बाँड अचानक आपल्याकडे वळतो ... पिस्तूल चालवतो..... रक्ताचा ओघळ रूपेरी पडद्यावर खाली सरकू लागतो.
