आयुख

चित्र रेखाटायच्या आधी
मनात बरेच मनसुबे
हे $$ सुंदर, असं सुरेख रेखाटू ...
तशी अंगात ज्वानीची रगही असते
नसानसात धडक्या मारणारं
उसळतं रक्तही भरीस पाडतं
आतापावेतो तसे आपण
दुसर्‍याच्या चित्रातले
त्यांचे मनसुबे कधी धुळीला लावलेले
तर कधी त्यांच्या मनाजोगता रंग ल्यायलेले
अन् कधी तर अवचित चक्क रंगबहार साधलेले
पण आता परिस्थिती वेगळी
हाती कुंचला अन् मनी रेखाटन
समोरच्या रंगांचा मर्यादितपणासुद्धा
ते आवेगी रेखाटन रोखू नाही शकत
धमकच असते तशी त्या वयाची
मग हळूहळू जाणवू लागतं
आपलं अपुरेपण
समोरच्या रेखाटनात उमटलेल्या
आपल्याच त्रुटी
आपल्याच भरकटलेल्या पाऊलखुणा
कधी चुकलेली कागदाची निवड
कधी चुकलेली रंग छटा
सारी सरमिसळ....
कुठे फिसकटलेले फराटे
कुठे निसटलेले आलेख
अन् कधीकधी तर उमटलेले ओरखडे
कधी परक्यांचे, कधी आप्तांचे
अन् कधी आपले स्वत:चेच
चित्र घडत जातं
तसं कधीकधी वाटतं
बदलावं हे सारं
काढावं नवीन काही
आता जाणिवांचे कंगोरे घेऊन
कदाचित काही चांगलं उमटेल
पण,
हाती तोच एक कागद
तेच चार कुंचले
अन् समोर पसरलेलं
सुटका नसलेलं
तेच एक चित्र
आपलं....

footer