दसर्यानंतरच्या एका (मी डोळ्यात प्राण आणून ज्याची वाट पाहत असतो अशा) रविवारी मस्त उशीरा उठलो. घड्याळ ९.३० ची वेळ दाखवत होते. पहिल्यांदा मला एक जबर धक्का बसला. मला वाटले बहुतेक आज माझे ऑफिस बुडल्यात जमा की काय? पण मग सावरलो. माझ्या अवलक्षणी सवयीप्रमाणे मी चहा नामक उत्तेजक पेय डोळ्यासमोर आणले आणि मला ते प्यावेसे वाटले. इकडे तिकडे पाहत, "कुणी मला चहा देईल का?" अशी आर्त साद मी घातली, ती नेमकी सौ.च्या कानावर पडली. त्याच क्षणाला माझी, रविवारची शांतता संपुष्टात आली. स्वयंपाकघरात आतून डरकाळी फोडावी तसा सौ.ने आवाज चढवला. "हं, उठलास वाटतं (आमच्याकडे स्त्री पुरुष समानता आहे, त्यामुळे "नो अहो-जाहो, इकडची स्वारी, तिकडची स्वारी.") आता काय चहाच हवा असेल. तुझा तेवढा रविवार आणि माझा काय सोमवार आहे असे वाटते का? जमत नव्हते तर कशाला वर तोंड करून बोललास की दर रविवारी मी चहा करेन. मी याव करेन नि त्याव करेन. ह्याचे नुसते बोलणेच पाहून घ्या" वगैरे वगैरे. माझा इकडे अंथरुणात उंदीर झाला. स्वयंपाकघरात मंगल सनई आपोआप वाजायला लागली. मी परत अंगावर पांघरूण घेणारच इतक्यात सौ. माझ्यासमोर दुर्गादेवीसारखी प्रगट झाली. "पुन्हा झोपतोस की काय? हद्द झाली आता. मी एकटीच उठून तडफडते आहे आणि तुला काय होतंय चहाच्या ऑर्डरी सोडायला? मलाही जास्त वेळ झोपावेसे वाटते. पण तरी मी काय करू शकणार? जाऊ दे, चल उठ लगेच. आपल्याला आज खूप काम आहे. सांगते नंतर तुला, आधी आवरून घे." माझ्या अंगावर काटा आला. मनात म्हंटले, "आवरून घे" म्हणजे नक्कीच आपला रविवार बुडीत खात्यात जमा करणारे काहीतरी असावे. पण नाविलाज को क्या विलाज?
अस्मादिक आज्ञाधारक नवऱ्याप्रमाणे उठले आणि एयर इंडियाच्या महाराजाचा पवित्रा घेऊन उभे राहिले. बायकांना जात्याच स्वसंमोहन अवगत असते असे लग्नाआधी मागे मी एकदा ऐकले होते तेव्हा त्याचे प्रचंड कुतूहल वाटले होते. परंतु आता गेली २ वर्षे सतत त्याचे माझ्यावर गिनिपिगसारखे होत असलेले प्रयोग पाहून ते कुतूहल पूर्णपणे मावळले . आज आपल्या नशिबात काय वाढून ठेवले असेल त्याची सूतराम कल्पना मला काही केल्या येत नव्हती. खूप काम म्हणजे काय? नक्की मला कुठे जुंपले जाणार आहे तेच ठाऊक नव्हते. परिस्थितीचा अंदाज घेत, कसलेल्या शिपायाने शत्रूच्या भूमीत पावले टाकावीत, तसा मी घरात फिरू लागलो. कारण गोळीबार कधी, कुठून आणि कसा सुरु होईल ते सांगणे ब्रह्मदेवाच्या तीर्थरूपांना पण जमले नसते. घरात नक्की काय काम निघाले असावे यासाठी थोडी टेहळणी केली पण माझ्या अज्ञ नजरेला कुठलेही काम दिसेना. (तसे मला काहीच दिसत नसते. पण आमच्या सौं.ची नसलेले काम निर्माण करण्याची हातोटी प्रचंड आहे.) मग मनाचा हिय्या करून मी सौ.लाच (दबक्या आवाजात) विचारले. "नक्की काय करायचंय आपल्याला आज? "ह्यानंतर साधारण २० मिनिटे झालेलं संभाषण तुम्हाला सांगण्यासारखे नाही. (तुम्हाला उत्सुकता असेल पण तरी नका विचारू) मात्र त्याचा थोडक्यात सारांश असा होता की मी कसा नवरा म्हणून निरुपयोगी आहे. इतर मैत्रिणींचे नवरे कसे प्रचंड कामसू आहेत (कोण लेकाचा गेलाय बघायला? लंकेत सोन्याचं विटा.) .माझ्यात जबाबदारी उचलण्याची तयारी नाहीये. (हे मला तिनेच सांगावे जिची जबाबदारी मी घेतलीय असे मी लग्नात कबूल केले होते. कुठे गेले ते देव आणि ब्राह्मण जे ह्या सगळ्याचे साक्षीदार होते? आता फक्त अग्निदेव उरलेत ज्यात मी खरपूस भाजून निघतोय आणि मग माझे लचके तोडले जातात!)
एकाएकी ती खास ठेवणीतल्या लाडातल्या भाषेत बोलू लागली. त्याचे काय आहे ना, तुला मला मदत करायला नको का? मग आपण आपले काम लवकर आवरून थोडा आराम करू शकू की नाही? (हे नुसते गाजर!) तरी मी गाढवासारखा दर वेळी फसतो. मग सर्वानुमते (म्हणजे फक्त तीच) असे ठरले की मला आज दिलेले काम जर मी केले तर माझे पापक्षालन होईल! खरं तर असे पापक्षालन मी पूर्वीही कित्येकदा केले आहे पण टोल नाक्याच्या वसुलीसारखे त्यातले मूळचे पाप किती आणि क्षालन कितीचे झाले याचा काही हिशोब अथवा नोंद नाही. हे असे ठरलेले इंजेक्शन मला दिले की मी बधिरता आल्यामुळे पुढचे सगळे काम बिनबोभाट करेन अशी तिची योजना असणार. मी मला दिलेला चहा अमृताप्रमाणे घटाघट पिऊन (चवीमुळे नव्हे, थंड झाल्यामुळे) पुढच्या श्रवणभक्तीकडे वळलो. सौ. कुठून तरी कागद आणि पेन घेऊन आली. त्यावर अगम्य भाषेत काहीतरी लिहिले होते. (अरे देवा! ही डॉक्टर का नाही झाली?) बराच मोठा प्लान असणार तिचा काहीतरी. मी लगेच बँकेत किती शिल्लक आहे याचे गणित डोक्यात जुळवले. कारण तिच्या हातात कागद पेन हे कॉम्बिनेशन म्हणजे खूप पैसा ओतायची तयारी. अजून पगार झाला नाहीये. बोनस मिळायची तर आशाच नाही. महागाईमुळे डोळ्यात आधीच पाणी उभे राहिलंय. त्यात आता दिवाळी तोंडावर आहे. दि वा ळी !!!! हा, हेच ते कारण असावे ज्यासाठी सौ.चा इतका आटापिटा चाललाय. आणि झालेही तसेच. हजारो प्रकारच्या वस्तूंची यादी तयार करून ती आता माझ्या गळी उतरवण्यासाठी तिचे हे नमनाला घडाभर तेल ओतणे चालले होते तर! असो. बघूया पुढे काय होतंय ते असे म्हणून मी परत तिच्याकडे पहिले तर तिच्या चेहऱ्यावर अर्धी लढाई जिंकल्याचे भाव आताच उमटले होते.
आमच्या प्रेमळ संभाषणाचा हा नमुना -
"हे बघ मी यादी केली आहे. हे सगळे आज आपल्याला जमेल तेवढे संपवायचे आहे. दिवाळीला जास्त दिवस उरलेले नाहीत. नंतर हे राहिले ते राहिले असे नको व्हायला. तू एकदा वाचून बघ.”
"नको ग! तूच वाच. तुझा आवाज किती गोड आहे. ( खरे तर मला तिचे अक्षरच कधी लागत नाही.) लता आणि आशानंतर तूच भारताची आशा! हं, वाच काय ते....”
"बरं. पहिल्यांदा तू माळ्यावर चढायचे आहेस. तिथे किती जळमटे लागली आहेत हे मी तुला किती वेळा सांगितलंय पण तू दर वेळी टाळतोस. आज आधी ते काम. सगळा माळा खाली काढून साफ करून घेणे हे काम तुझे. (आता आली का पंचाईत. मला धूळीची अलर्जी आहे हे तिला ठाऊक आहे पण ती मला आज माळ्यावर चढवणार म्हणजे चढवणारच. हर हर महादेव!)
"दिवाळीला माळा कसला साफ करतेस. आपण फारतर एक पडदा लावू तिथे......”
"नाही म्हणजे नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणी यावेळी आपल्याकडे येणार आहेत.”
"मग तुमची मैफल काय माळ्यावर ठेवली आहे का काय? घरात आलेले कुणीही कशाला जाईल तिथे चढायला?”
"तू माळा साफ करणार आहेस, बास! मी हवे तर तुला मदत करेन.”
"म्हणजे तू नक्की काय करणार आहेस? मला वर चढवून खालून स्टूल काढून घेणे याला तू मदत म्हणतेस?” (गतकाळातील एका दुर्धर व बिकट प्रसंगाची आठवण, आणिक् काय!?!)
"झाले विनोद करून??? चला आता कामाला लागा.”
"जरा ती लिस्ट आण बघू इकडे. (मी इतिहास संशोधक असल्यासारखी लिस्ट वाचली.) यात शेकडा ९० टक्के कामे माझ्याच नावावर दिसतायत. तू काय करणार मग नक्की? का मला बाहेर पाठवून तुझा लोळायचा प्लान आहे?”
"हो. तुला तेच सुचणार. माझी घरातली कामे तुला कशी दिसतील रे? विचारतोस का तरी कधी मला की किती कामे करतेस तू? काही मदत करू का मी तुला? सदानकदा नुसता आपला पसरलेला असतोस.”
"देवदयेने आधीच तुला माझी इतकी मदत मिळते आहे. अजून काय देऊ तुला? माझ्यासारखा नवरा आहे म्हणून... दुसरा कोणी असता तर कधीच पळून गेला असता....” (ती हा डायलॉग मारण्याआधीच मी मारून घेतला. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार.......)
"आता खूप झाले. तू नुसता पोपटपंची करत असतोस. आज काम करून दाखव. चल, आधी माळा साफ करणे. मग घरातले गेल्या वर्षीचे राहिलेले सामान जे वापरले गेले नाहीये ते शोधणे म्हणजे रंग, रांगोळी, पणत्या वगैरे. नंतर तुला बाहेर जायचंय आणि फराळाचे पदार्थ जे तू खाणार आहेस त्यांची तयारी म्हणजे कच्चा माल गोळा करायचा आहे. चला........!”
इतक्या कडक शब्दात ऑर्डरी मिळाल्यावर मी माझे सगळे शाब्दिक बाण भात्यात परत ठेवले. (पुन्हा वेळ पडल्यावर जपून वापरायला. माझे तिच्यासारखे नाही. तिच्या जिभेवर नैसर्गिक धनुष्य बसवलंय. बाण सुटला की माणूस हमखास उताणा....) सगळ्यात आधी सज्ज होऊन माळ्याकडे मोर्चा वळवला. कसाबसा वर चढलो आणि नको असलेल्या वस्तू शोधू लागलो, पाहतो तर काय, माझ्या हालचालीमुळे एरवी निवांतपणे फिरणारे माळ्यावरचे झुरळ आणि पाली यांचे सैन्य वेगवेगळ्या दिशेने माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीतच होते. मीही प्रसंगावधान राखून हातातला झाडू आणि तोंडाची बडबड एकदमच सुरु केली. ग म भ न ची बाराखडी आपसूकच जिभेवर नृत्य करू लागली. ती ऐकून खालून सौ.च्या दिशेने पण गोळीबार परत सुरु झाला. "बघ, मला वाटलंच वर झुरळं-पाली झाल्या आहेत. घरभर फिरत असतात. तुला किती वेळा सांगितले की पेस्टकंट्रोलवाल्याला बोलाव पण नाही! तुला कुठे जमतंय? काही करायलाच नको.”
मी सगळीकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे बावचळून गेलो आणि त्या गडबडीत माळ्यावर ठेवलेल्या कप बश्या माझ्या धक्क्याने खाली पडल्या आणि एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली. तो सेट नेमका लग्नात तिच्या घरच्यांनी दिला होता. आता माझा धीर सुटला. मी झाडू टाकून दिला आणि खाली उडी टाकली. खाली सौ. विठ्ठलासारखे दोन्ही हात कमरेवर ठेवून उभीच होती. गुन्हा आणि गुन्हेगार दोन्ही समोरासमोर होते. हा सूर्य आणि हा जयद्रथ! जयद्रथाच्या छातीचे ठोके अख्ख्या इमारतीला ऐकू जातील असे होते. मान खाली घालून कुर्बानीसाठी मी तयार झालो. त्यानंतर सगळे रीतीप्रमाणे झाले. मला घराबाहेर पिशव्या हाती देऊन हाकलण्यात आले. मीही पडत्या कप बश्यांची आज्ञा घेऊन बाहेर पडलो. खिशात जेमतेम १००० रुपये होते..म्हटले पुरेसे आहेत. काही जास्त सामान दिसत नाहीये....
एका किराणामालाच्या दुकानात कसाबसा घुसलो. दिवाळीसाठी खास आलेल्या वस्तूंनी आणि माणसांनीही दुकान ओसंडून वाहत होते. हवेत बेसन, गूळ, डाळी यांचा घमघमाट सुटला होता. मी माझी यादी पाहून भाव न विचारताच वस्तू बांधण्याची ऑर्डर दिली. आजूबाजूच्यांनी नजरेतूनच, "हा महामूर्ख कुठून आलाय देव जाणे" असे सर्टिफिकेट केव्हाच मला देऊन टाकले. दुकानदाराने मात्र तत्परतेने असे गिर्हाईक परत परत येत नसल्यामुळे माझे सामान बांधायलाही घेतले. संपूर्ण पिशवी भरून सामान आणि त्याचे बिल सुद्धा त्याने माझ्या हाती ठेवले तेव्हा मात्र मला फेफरे आले. त्याने लावलेले भाव पाहून माझ्या चेहर्यावरचे भावसुद्धा त्याच गतीने बदलू लागले. "कसा झटका बसला ह्याला, आता होईल सरळ." असे म्हणत ही गंमत पाहण्यासाठी बरेच लोक मुद्दाम वेळकाढूपणा करत तिथेच उभे होते. माझा चेहरा पाहून त्यातल्या बर्याच लोकांचे समाधान झाले आणि ते आपापल्या कामाला चालू पडले. आता दुकानात मालक आणि मी असे दोघेच होतो. मी मालकाला म्हटले, "अहो मी वस्तू मागितल्या होत्या. तुमच्या दुकानाचे खरेदीखत नाही. हे काय दिलंय मला? एवढ्याश्या वस्तूंचे बिल १२४० रुपये?"
"अहो ते बिलच आहे. दुकानाचा भाव ऐकलात तर आता इथूनच हॉस्पिटलला जायची वेळ येईल."
मी दिलेली पिशवी पुन्हा उपसायला सुरुवात केली. पहिल्यांदा तुपाचा डबा काढला. त्यावर स्पष्ट भाव होता, रू. २८० प्रति किलो. बापरे! यावेळी आपण तूप नकोच वापरायला. हे द्या परत ठेवून. आणि २०० ग्रामचा डबा असला तरच द्या. मागच्या वेळी मी तूप घेतले होते तेव्हा ते १६० रु किलो होते आणि आता एकदम २८०? मोगलाई लागली आहे काय? भाव म्हणायचा का मस्करी?”
"काय साहेब, दीड दोन वर्षांनी आज बाजारहाट करायला बाहेर पडलाय काय तुम्ही? जरा अधून मधून मार्केटात एखादी चक्कर मारत जा, मग कळेल!"
एव्हाना मला फक्त माझ्या खिशात १००० रुपये आहेत ह्या सत्याची टोचणी लागली होती. बर एखादा पदार्थ काढून टाकावा तर घरी सकाळच्या प्रसंगाचा रिपीट टेलिकास्ट झाला असता म्हणून तो विचार झटकून टाकला. पण मग आता करायचे तरी काय? पुढची खरेदी तर बोंबललीच होती. आता इथूनच घरी जाणे भाग होते. मग मी माझे खिसे चाचपायला सुरुवात केली. नशीब जोरावर असल्यामुळे हाताला एक ५०० ची नोट एका कप्प्यात कोंबलेली सापडली. अतिशय गरजेच्या वेळी ती उपयोगाला येईल म्हणून मीच कधीतरी ती ठेवली असणार आणि आजच्या दिवसापेक्षा अधिक गरजेचा दिवस माझ्यासाठी कोणताही नव्हता. एक रुपयाही कमी दिला असता तर ह्या मालकाने मला पुड्या बांधण्यासाठी ठेवायला पण कमी केले नसते. शेवटी एकदाचे पैसे देऊन तिथून बाहेर पडलो आणि परत घराकडे मोर्चा वळवला.
दिवाळी जवळ यायला लागली तसे एक एक करून कल्पनाही न केलेले खर्च उभे राहू लागले. मध्यंतरीच्या काळात आमच्या कंपनीने आम्हाला बोनस दिला. बोनसची ‘एवढी प्रचंड’ रक्कम पाहून मला इन्कम टॅक्सवाले आपल्या घरी धाड तर घालणार नाहीत ना ह्या विचाराने रात्र रात्र झोप लागायची नाही. आपण माकडांना सुद्धा गम्मत म्हणून खायला यापेक्षा जास्त शेंगदाणे देतो. एवढ्या रकमेत दिवाळीसारखा सण साजरा करणे म्हणजे एक मोठे दिव्यच होते. पण ते आव्हान मी स्वीकारले. (न स्वीकारून सांगतोय कोणाला?)
सालाबादप्रमाणे कपडे खरेदी आली. सौ.ला घेऊन खरेदीला जाणे हा आनंददायी अनुभव असतो. आपल्यासाठी नव्हे, आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांसाठी! प्रत्येक कपड्याच्या दुकानात कमीत कमी अर्धा तास घालवल्यावर वर त्याच्या मालकालाच, "तुमच्याकडे व्हरायटी काहीच नाही, नवीन स्टॉक आला की सांगा", असे ऐन सणासुदीच्या काळात गर्दीने भरलेल्या दुकानात सांगायला सिंहाचे काळीज लागते आणि ते तिच्याकडेच आहे. माझ्यासारखी माणसे आपल्या समोर टाकलेल्याच कपड्यातून त्यातला त्यात बर्यापैकी कपडा शोधून पाचव्या मिनिटाला दुकानाबाहेर पडणे हे आपले कर्तव्य समजतात. सौ.ने दिवाळी परत कधीही येणार नसल्यासारखी खरेदी केली आणि तिच्याबरोबर नुसता फिरून मी अर्धमेला झालो. खिशातले सगळे पैसे संपेपर्यंत तिचा उत्साह मात्र अबाधित होता. जणू काही कॉंग्रेस सरकारने तिच्या नावे मुंबईतले दोन तीन पेट्रोल पंप आंदणच दिले आहेत. त्याउपर "आऊचा काऊ तो माझा भाऊ" या नात्याने तिच्या ढीगभर नातेवाईकांना सदिच्छा भेट म्हणून देण्यासाठी सुकामेवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थ यांचीही खरेदी झाली. "दिवाळी हा सण सार्वजनिक असून तो केवळ आपल्या विभागापुरता मर्यादित नाही. इतर भागात दुष्काळ पडला असून तिथे मदत पाठवायची असल्यासारखी खरेदी करू नकोस" असा सल्ला मी त्या दिवशी ५६ वेळा ओठाशी आणून गिळला. दिवाळी आधीच रस्त्यात माझ्यावर फटाक्यांची आतिषबाजी होऊ नये म्हणून मोठ्या कष्टाने मी तो विषय टाळला.
दरम्यान मी आणून दिलेल्या सामानाची कशा प्रकारे ‘विल्हेवाट’ लावली गेली आहे हे पाहायला कामामुळे वेळच मिळत नव्हता. घरी आलो की नेहमी घरात चित्रविचित्र वास दरवळत असायचे. एक दिवस घरात इतक्या प्रमाणात जळण्याचा धूर जमा झाला होता की सौ.ने पार्ट टाईम फटाक्यांचा उद्योग तर सुरु केला नाही ना अशीही शंका मनाला चाटून गेली. पण मग एकदा हिम्मत करून स्वयंपाकघरात प्रवेश केला आणि तयार फराळ पहिला. दिवाळीनंतर मारामारीसाठी भरपूर शस्त्रास्त्रे असणार याचा मला प्रचंड आनंद झाला. चव घेऊन पहा असे म्हणत सौ. मागे लागली होती पण जर आताच चव घ्यायचा प्रयत्न केला तर ऐन दिवाळीत काहीच टाईमपास राहणार नाही म्हणून मी नको म्हटले.
साबण, तेल आणि उटणी यांचा उपयोग आमच्या नंतरच्या २ पिढ्या सुद्धा करू शकतील इतक्या प्रकारची होती (एवढे करून ती मला लावून द्यायला सौ. नेहमी विसरते. दिवाळी नंतर घरात हरवलेलं काहीही शोधले तरी उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून एक उटण्याचे पाकीट नक्की मिळतेच!) खिसे रिकामे होत होते आणि वस्तू घरात येत होत्या. त्यांचा उपयोग आहे की नाही ते पाहिल्याशिवायच ‘दिवाळी खरेदी’ या गोंडस नावाखाली त्या आणणे चालू होते. अचानक मला एक महान शोध लागला. मी माझा निष्कर्ष लगेच मांडला. घरात ह्या ज्या काही वस्तू येत होत्या त्या पुढच्या दिवाळीत बनणाऱ्या लिस्टमध्ये ‘माळा साफ करणे’ या सदराखाली मोडणार होत्या! आज पेरलेले उद्या उगवते ही म्हण सार्थ करणारी परिस्थिती कशी तयार होईल ह्याकडे जातीने लक्ष देण्याचे काम सौ. करत होती.
मध्यंतरीच्या काळात दिवाळी असल्याची जाणीव पदोपदी करून देणारे लोक भेटतच होते. पहिला बॉम्ब आमच्या घरातल्या मोलकरणीने टाकला. सौ.ला म्हणाली, “ताई, ह्यावेळी मला साडी-बिडी काही नको. (तिला देणार कोण होते हा दुसरा प्रश्न) तुम्ही आपला माझा एक पगार टाका. मी काय हवं ते करेन त्यातनं.” या बायकांच्या अशा गुगलींना सौ. चांगलीच सरावलेली आहे. ती लगेच म्हणाली, “चालेल. ठीक आहे. नाहीतरी दिवाळी निमित्त घरातले डबे, भांडी घासायलाच झाली आहेत. ती देते तुझ्याकडे. (तुला कोण नुसती दिवाळी देईल ग?)” तिचे हे बोलणे ऐकून शून्यावर आउट झालेल्या फलंदाजासारखे तोंड करून बाई निघून गेली. त्यानंतर अशीच एक दिवशी बेल दाबली गेली. मीच दरवाजा उघडला. तसा माझा अवतार, मी त्या अवस्थेत कोणाला दर्शन द्यावे, असा नव्हताच. एका हातात झाडू आणि एका खांद्यावर सगळे घर पुसून काळे पडलेले फडके, अशा जाम्यानिम्यासह मी प्रश्नार्थक चेहऱ्याने कोण आले आता ह्या वेळी कडमडायला, असे भाव मनात आणत समोर पहिले तर एक हिरोवजा मुलगा आमची बेल दाबत होता. अंगात मस्त टीशर्ट, एक महागडी दिसणारी जीन्स आणि डोळ्याला गोविंदा स्टैल गॉगल! मी विचारले, "बोला. काय पाहिजे?”
"दिवाळी."
"अरे तिला यायला वेळ आहे अजून."
"तसे नाय वो. मला दिवाळी द्या."
(ह्याला कसली दिवाळी? आणि मुळात हा आहे तरी कोण?)
"तू कोण बाबा?"
“मला नाय वलाखलाव? मी तुमचा दूध टाकणारा पोऱ्या!”
(अरे बाप रे! बाबा, इथे मीच तुझा पोऱ्या वाटतोय रे...... तूच दे मला काही तरी…..)
"अच्छा. तूच काय तो? रोज कितीही वायुवेगाने दार उघडण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्याही आत धूमकेतूसारखा पळून जाणारा?"
"व्हय. मीच तो. रोज तुमचे तोंड पाहायला थांबत जाव काय उद्यापासून म्हनताव तर? जरा लवकर द्या की! मला अजून ५-१० घरी जायचा हाय....”
"तुम्हाला सगळ्यांना इतक्या लवकर दिवाळी कशाला हवी असते रे?”
"द्या की सायेब, तेवड्या पैशात काय गाडी घेणार हाय का तुमी?”
माझे तोंड त्याने फेविकॉल लावल्यासारखे बंदच करून टाकले. त्याला कसाबसा १० रुपये देऊन वाटेला लावला.
ही तर फक्त सुरुवात होती. त्यानंतर कचरेवाला, माळी, धोबी, टेलिफोनवाले, इलेक्ट्रिसिटीवाले...... वाटेल ते लोक दिवाळी मागायला येत होते. सगळ्यात कहर म्हणजे घराखालचा रस्ता झाडणारा माणूससुद्धा पैसे द्या म्हणून मागे लागला. मी घरातच रिझर्व बँक उघड्ल्यासारखे मला वाटायला लागले. मी सगळ्या रिक्षावाल्यांशी भांडण करून करून महत्प्रयासाने मिळवलेले सगळे सुट्टे पैसे छूमंतर झाले, तसाच पगार आणि बोनस तर कधीच कापरासारखा उडून गेला.
अशातच येणार येणार म्हणता म्हणता दिवाळी आलीच. घर कधी नव्हे ते लख्ख दिसत होते. (त्यामुळे राहून राहून आपण कोणाकडे तरी पाहुणे म्हणून राहायला आलोय की काय अशी शंका येत होती.) आकाशकंदील, पणत्या, नवीन कपडे, गोड-धोड पदार्थ, सगळे काही सज्ज होते. पाहुणे, मित्रमंडळी यांचे येणे जाणे सुरु झाले. दिवाळीच्या त्या ५ दिवसात जेवढ्या मैफिली जमल्या त्या सगळ्या येणारे नवीन वर्ष नव्या उत्साहाने जगण्याची उमेद देऊन गेल्या. कित्येक जणांचे फोन येऊन गेले. फराळाची ताटे बिल्डींगभर फिरू लागली. घराघरातली बच्चेकंपनी त्यात अजूनच धमाल आणत होती. अक्षरशः स्वप्नवत् जात होते ते दिवस! सौ. तर सगळे मनासारखे झाल्यामुळे एवढी चांगली वागत होती की कधीतरी ती माझीच बायको आहे ना, अशीच शंका येत होती. पण तिच्यातला हा तात्पुरता का होईना पण झालेला बदल सुखावणारा होता.
सौ.ने न चुकता घरातल्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन चोख केले होते. आमच्या घरातला फराळ मी त्याचे ताट बाहेर जाण्याआधीच चाखून पाहिला. उगाच बिल्डींग मधल्या लोकांशी वाकडे नको. आश्चर्य म्हणजे घरात दरवळणारे वास जरी विचित्र असले तरी पदार्थ मात्र अत्यंत चविष्ट झाले होते. मी चाटच पडलो. तिलाच विचारले की हा काय प्रकार आहे? तर ती उसळलीच. हे बघ, जे केलंय ते गप खा. जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. पण मला भयानक उत्सुकता लागली होती. मी तिला खूपदा विचारल्यावर ती हळूच म्हणाली,
"सगळे विकत आणले आहे..........."
माझे डोके भणभणायलाच लागले. किराणामालाच्या दुकानात झालेला प्रसंग अजून ही जीवाला चटका लावत होता त्यावर आता हे काय नवीन?
मी कधी नव्हे ते चिडून म्हटले,
"मग हेच करायचे होते तर मला कशाला पिशवी देऊन एवढे ओझे उचलून आणायला सांगितलेस?"
तर त्यावर तिचे थंड उत्तर होते, "गॅसचा भाव काय चाललाय माहित आहे नं तुला? ह्या सगळ्यात गॅस घालवला असता तर ऐन सणासुदीत वेळेवर कोण देणार होतं? शिवाय गॅसवाल्याला दिवाळी द्यायला लागली असती ती वेगळीच. बघ मी तुझे किती पैसे वाचवले?"
"बरं केलंस बाई. आता हे सगळे कितीला पडले तुला? आणि घरातल्या सामानाचे काय केलेस?"
"जास्त नाही काही. सगळा फराळ फक्त १५६० रुपये. मला म्हणून स्वस्त दिलंय नाहीतर २००० च्या खाली कुठे मिळत नाहीये. घरातले सामान मी आईकडे पाठवून दिलेय."
मी नंदीबैलासारखी मान हलवत अजून एक लाडू तोंडात कोंबला.
दिवाळी म्हणून असणारी लोकांची लगबग पाहून मात्र मनाला कुठेतरी खूप बरे वाटत होते. आयुष्यात कितीही त्रास, कटकट असू दे पण ह्या दिवसात मात्र मन खरच प्रसन्न राहते. एखाद् दोन दिवस का होईना पण नवीन गोष्टींचे आयुष्यात स्वागत करणे आणि थोडासा बदल करून ते सुसह्य करणे हा उद्देश मात्र दिवाळीमुळे सुरेख साध्य होतो.
अत्यंत गरीबातले गरीब कुटुंबसुद्धा ह्या दिवसात त्यांच्या परीने जमेल तसे सण साजरा करण्याची धडपड करीत असते. म्हणून मग आम्ही दोघांनी सुद्धा ठरवले की आपल्या कॉलनीतल्या सायकल रिपेरिंग करणाऱ्या तुकाराम मामाच्या घरी जेवढे जमेल तसे फराळ, कपडे आणि त्याच्या मुलांसाठी फटके नेऊन द्यायचे. एक दिवस आम्ही ते सगळे घेऊन त्याच्या छोट्याश्या घरासमोर उभे राहिलो आणि त्याच्या मुलांच्या हातात ते सगळे ठेवले.
"दिवाळीच्या पणत्यांची आणि उत्साहाची खरी चमक आम्हाला त्या डोळ्यांमध्ये दिसली आणि आमची दिवाळी सार्थकी लागली!
