मसालेभात

मसालेभात
साहित्यः

बासमती तांदूळ २ वाट्या
तोंडली १ वाटी
हळद १/२ लहान चमचा (टी स्पून)
तिखट १ लहान चमचा
कच्चा मसाला ४ लहान चमचे
दही १ वाटी
गूळ लिंबा एवढा
कोथिंबीर १ वाटी
ओले खोबरे १ वाटी
मीठ चवीनुसार
तेल फोडणीसाठी
मोहरी २ लहान चमचे
कढीलिंब पाने दोन डहाळ्या
काळीमिरी १ लहान चमचा.
काजू तुकडा १२ ते १५
साजुक तुप १ छोटा डाव

तयारी:

तांदूळ अर्धा तास भिजत ठेवा.
तोंडल्यांची दोन टोके कापून त्यांच्या चार उभ्या फोडी करा.
कोथिंबीर चिरुन घ्या.
४ वाट्या पाणी तापत ठेवा.

कच्चा मसाला:

अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, शाहिजिरे २ लहान चमचे, १२ लवंग, ८" दालचिनी. हे सर्व साहित्य न भाजता मिक्सरवर दळून घ्या. (आवश्यकता भासल्यास बारीक चाळणीने चाळून घ्या) पाककृतीत हा मसाला फक्त ४ लहान चमचे घ्यायचा आहे. उरलेला मसाला उसळींसाठी वापरता येईल.

कृती:

पातेल्यात ४ मोठे चमचे तेल घेऊन मध्यम आंचेवर तापवा. तेल तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की कढीलिंबाची पाने आणि काळीमिरी घाला.
आता काजू घालून परता. काजूंचा रंग बदलायला लागला तोंडली घालून अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवून तोंडली अर्धवट शिजवा. तोंडली शिजली की निथळविलेले तांदूळ घालून परता. आता त्यावर हळद, तिखट, कच्चा मसाला, फेटलेले दही घालून परता.
जरा परतल्यावर गरम केलेले ४ वाट्या पाणी घालून सर्व हलक्या हाताने मिसळा. आता त्यात गूळ घाला. सजावटीसाठी थोडी बाजूला ठेवून बाकीची कोथिंबीर आणि ओले खोबरे घाला. चवीपुरते मीठ घालून पुन्हा सर्व मिसळा>

आता आंच अगदी बारीक करून भात पूर्ण शिजवून घ्या.

भात शिजल्यावर वरून एक छोटा डाव साजूक तुप सोडा.

भाताची मुद पाडून त्यावर थोडे ओले खोबरे, कोथिंबीर घालून लिंबाची फोड आणि लोणच्या बरोबर खायला घ्या.

शुभेच्छा....!