नीलकांताचा व्यनि आला, "या गणेशचतुर्थीला मिसळपाव या संस्थळाला पाच वर्षे पूर्ण होताहेत. तेंव्हा काका, त्यानिमित्ताने काहीतरी लिहा..."
अरे पण लिहा म्हणजे काय लिहा? योग्य विषयच सुचेना. उगीच काहीतरी कथा, व्यक्तिचित्र वगैरे लिहायला मन करेना. प्रवासवर्णन, पाककृती वगैरेच्या तर वाटेलाही आपण हल्ली फिरकत नाही!!! एखादं विडंबन लिहितां आलं असतं पण मुद्दाम पाचव्या मिपावाढदिवसाच्या शुभनिमित्ताने विडंबन टाकावं हे योग्य वाटेना. तेंव्हा असाच हताश होऊन माझ्याच खात्याची पाने चाळत असतांना एका ओळीने माझं लक्ष वेधून घेतलं...
मिपावास्तव्यः ४ वर्षे ३५ आठवडे
अरेच्चा! म्हणजे जर सुरवातीचे काही आठवडे सोडले तर जवळपास हा सगळा काळ मी मिपासोबत होतो की!!
म्हणून मग या मिपासहवासाचीच गोष्ट मी तुम्हांला सांगायचं ठरवलंय.
:)
तर पाच वर्षांपूर्वीची कथा! आंतरजालांवर मराठी ब्लॉग्ज तसे आलेले होते पण त्यांचं आत्ता फुटलंय तसं पेव फुटलेलं नव्हतं. बरेचसे ब्लॉग्ज हे स्वगुणगान/ स्वप्रकटन अशा बाळबोध स्वरूपाचे होते. पण काही जण मात्र त्यात नवनवीन लेखन करीत असत, आपले ब्लॉग वाचनीय करीत असत. असाच एकदा नेटसर्फिंग करत असतांना तात्या अभ्यंकर या महाभागाचा ब्लॉग सापडला. त्याचं लिखाण तर आवडलंच पण त्याहूनही त्याने स्वतःची करून दिलेली इरसाल ओळख अधिक आवडली!!
मग तात्याच्या ब्लॉगवर नित्यनेमाने फेर्या सुरु झाल्या. तो लिहितोय ते आवडत होतं पण त्याला तसं सांगायचं त्यावेळी कधी सुचलंच नाही. आणि एके दिवशी त्याने मिसळपाव या नवीन संस्थळाची स्थापना केल्याचं जाहीर केलं....
मग त्याने दिलेली लिंक वापरून मिसळपाव वर जाणं सुरू झालं. पहिले काही आठवडे फक्त वाचनच केलं आणि मग लक्षात आलं की हे मिसळपाव काही वेगळंच झटकेबाज रस्सायन आहे!! माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं होतं पण कॉलेज मुंबईचं सेंट झेवियर्स आणि त्यानंतर जवळजवळ वीसेक वर्षे परदेशात वास्तव्य! त्यामुळे मराठी वाचनाची चांगलीच आबाळ झालेली. आता इथे सगळं मिळतं पण नव्वदीच्या दशकात इथे भारताविषयी इंग्रजीतून काही वाचायला मिळायची मारामार तर महाराष्ट्राबद्दल मराठीतून कुठून वाचायला मिळणार? मग प्रत्येक मुंबईभेटीत जमतील तितकी मराठी पुस्तकं खरेदी करायची आणि पुढल्या भेटीपर्यंत पुरवून पुरवून वाचायची!!! आपली वाचून झाली की आपल्या मराठी मित्रांकडची उसनी आणायची आणि आपली त्यांना द्यायची हेच शक्य होतं.
पण मराठी पुस्तकं वाचण्यात एक अडचण होती ती म्हणजे ते सगळे लेखक आणि आपण वाचक! ते उच्चासनावर बसून लिखाण केलेले!! त्यांचं लिखाण आवडलं तर दाद द्यायची, नाही आवडलं तर भिकार आहे म्हणून सांगायची काही सोय नव्हती. शंका, प्रतिप्रश्नही विचारता येत नसत. त्यामानाने हे मिसळपाव मस्त वाटलं. आपल्यासारखीच काही अस्सल आणि इरसाल (तात्याच्या शब्दात येडझवी!!) मराठी माणसं असलेलं ठिकाण. आणि तात्याने डिक्लेअर करून टाकलं होतं की या स्थळाचं स्वरूप कॉलेजबाहेरच्या कट्ट्यासारखं राहील. लौकिक जगातला गंभीरपणा, महत्त्वाकांक्षा, चिंता, आग्रही मतं या सगळ्याला छेद देणारं हे एक आगळंच विश्व उपलब्ध झाल्यासारखं वाटलं...
मग काय विचारता? एके दिवशी आपल्या पदव्या, व्यवसाय, वय, सांसारीक स्थिती ही सगळी वस्त्रं उतरवून ठेवली आणि निस्सं:ग होऊन या डोहात सूर मारला!!!
आणि इथले इतर लोकं तरी काय? अहाहा!!!
विकास, नंदन, नीलकांत अशा खर्या नांवाने लिहिणारे काही बोअरिंग जीव सोडले तर बाकी सगळे कसे एकसे एक!!
धमाल मुलगा, आंबोळी, छोटा डॉन, इनोबा, सर्किट, क्लिंटन, आणि खुद्द मालक विसोबा खेचर!!!!! यांच्याशी आपलं फिट्ट जमणार असं जाणवलं आणि मग 'पिवळा डांबिस - बिल्ला नंबर ४०१' चा जन्म झाला!!!
एका पन्नाशीतल्या इरसाल म्हातार्याचं व्यक्तिमत्व पिवळ्या डांबिसाने स्वीकारलं. मध्येच टंकायचा आळस असलेल्या कुणीतरी (केशवसुमार कायरे तो?) मिसळपावचं मिपा केलं तेंव्हाच कधीतरी पिवळ्या डांबिसाचं पिडां झालं असावं. म्हणून मग प्राजुने त्याचं लगेच पिडांकाका केलं. तेंव्हापासून पिडांकाका हेच नांव वाचायची सवय झालीये...
सुरवातीला फक्त इतर धागे वाचून त्यावर अनुकूल-प्रतिकूल अभिप्राय देणं, काथ्याकूटात भाग घेणं आणि प्रामुख्याने इरसाल मराठीतून मनसोक्त गप्पा मारणं हेच चालू होतं. सगळ्यांच्या खोड्या काढून झाल्या, एक दिवस तर मी खुद्द प्राडाँचीही डब्बल-बॅरल खोडी काढून आलो. ते चिडले नाहीत हा त्यांचा मोठेपणा! अशी सगळी धमाल चालू होती, अवघा आनंदीआनंद होता....
आणि मग एके दिवशी तात्याची खरड आली. त्या निरोपाला खरड का म्हणतात ते त्या दिवशी कळलं!!! खरडपट्टीच ती!!
"डांबिसा फोकलीच्या, रोज नुसता येऊन धुमाकूळ घालतोस, शिंच्या जरा स्वतः काही लिही की!!!", तात्या उवाच.
अग्गं बाबौ! काहीतरी लिही? यापूर्वी केलेलं मराठी लिखाण म्हणजे माध्यमिक शाळेत असतांना! पण ते त्या वयाला अनुसरून शाळकरी वळणाचं!! इंग्रजीत लिखाण प्रकाशित केलेलं होतं पण ते गंभीर आणि व्यावसायिक स्वरूपाचं!! तात्यानं ही भलतीच टॉल ऑर्डर दिली होती. विचार करकरून मेंदूचा अगदी लगदा व्हायची पाळी आली. शेवटी ठरवलं की टेंशन नही लेनेका! बिंदास लिहायचं!!
मग माझं पहिलं लिखाण, कथा दुरावा, ती इथं प्रकाशित केली. आणि आश्चर्य म्हणजे बर्याच लोकांनी ती आवडली असं कळवलं. मग एक लास वेगास वरचं प्रवासवर्णन टाकलं. त्याचंही चांगलं स्वागत झालं.
लगेच धम्याची खरड आली, "इतकं चांगलं लिहिता येतंय ना! तर मग मिपावर नुसते येऊन का हो बसत होतांत इतके दिवस?"
हे कार्टं पहिल्यापासून आगावू बघा!!!! हो, तेंव्हा तो कार्टंच होता; आता लग्न आणि पोरंबाळं झाल्यावर मिशा पिळत त्याला इतर नवीन सभासदांना शिकिवतांना बघून गंमत वाटते!!!!!
मग काय मिपा सतत वाढत होतं आणि माझा मिपावरचा धुडगूसही वाढत होता!!!!
कथा, कविता, विशेषतः विडंबनं, व्यक्तिचित्रं; राडा करायला एक दालन म्हणुन शिल्लक ठेवलं नाही. अगदी पाकक्रिया विभागातही जाऊन दोन मॉक-पाकक्रिया टाकून आलो!! तात्या पस्तावला असणार पण त्याने बिचार्याने तसं कधी बोलून दाखवलं नाही. हां हां म्हणता नुसत्या अनुक्रमेचीच तीन पानं भरतील इतकं लिखाण मिपावर करून झालं. अभिप्राय्-प्रतिक्रिया ते वेगळे!!
आपल्याला मराठी लिखाण करता येतं, आपण लिहिलेलं काही थोड्या लोकांनातरी आवडू शकतं हे मिपाने मला जाणवून दिलं. आणखी दुसरी गोष्ट मिपाने दिली ती म्हणजे मित्रमैत्रिणी!!! सुरवातीला मिपावर फक्त आयडीच असल्याने मुख्यतः पत्रमैत्रीच होती. पण मग नंतर तात्याने मिपाकट्टे करायची आयडिया काढली आणि त्या आयडींमागचे चेहरेही दिसले. छोटा डॉनचा सुकेशी फोटो याची देही याची डोळा पाहिला आणि मी धन्य झालो!!! महाराष्ट्रातल्या कट्ट्यांच्या यशाने चेवून जाऊन इथे अमेरिकेतल्या मंडळींनीही कट्टे भरवायला सुरवात केली, त्यात मीही भाग घेतला. त्यातूनच नंदन, मयंक, भाग्यश्रीसारखे मित्र मिळाले. बे एरिआत नाटक्या, बेसनलाडू, बबलू, सर्किट, घासुगुर्जी, शिल्पा, नांवं घ्यावीत तरी किती? शिवाय ईष्टकोष्टी आणि मिडवेष्टी ते वेगळेच! भारतात तर काय विचारता? मुंबई, ठाणेएरिया, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, अगदी इंदूरपर्यंत स्नेही मिळाले. हा मिपाने जुळवलेला स्नेह, दुसरं काय?
आता पाच वर्षांनंतर मागे वळून बघतांना हे नक्की जाणवतं की मिपाने मला जसा मराठी ललितलेखनविषयक आत्मविश्वास दिला तसंच एक कॅथॉर्किक आउटलेट दिलं. आयुष्याच्या रोजच्या जोजारातून बाहेर पडून मुक्तपणे बागडायला मिपा माझी मैत्रिण झालं. संसाराचा ताप मागे ठेऊन वारीत सामील झालेल्या वारकर्याला जो एक वेगळा मोकळेपणा मिळतो, जिथे बाकी सगळे सहवारकरीच असतात, आई-वडील, भाऊ-बहीण, बायकोपोरं, बॉस वगैरे नाती जिथे अस्तित्वात नसतात असा मोकळेपणा. तो थोड्या काळासाठीच असतो पण तरी तो आपल्याला ताजंतवानं करतो पुन्हा संसाराचा रथ ओढायला! आयुष्यातले ताण-तणाव, सुखदु:ख्खं, समस्या तर कुणालाच चुकलेली नाहीत, पण त्यांना हसतमुखाने सामोरं जायची शक्ती इथे मला मिळते. आणि हे काय थोडं आहे? जोपर्यंत मिसळपावचं हे कट्टास्वरूप कायम आहे तोपर्यंत आमच्यासारख्या अनेक जणांना रोज काही काळ येऊन बसायला अगत्याचं ठिकाण आहे.
मी तर बायकोला सांगून ठेवलेलं आहे. तिला माझ्या लिखाणावर असंख्य शंका/ टिप्पण्या असतात, शेवटी बायकोच ती! तरी तिला सांगितलेलं आहे की "टीका करायची असेल तर खुशाल कर. मिपावर येऊन आयडी घे आणि तिथे कर टीका! तिथे तू आहेस आणि पिवळा डांबिस आहे!!!" घरगुती टीकेला नवरा म्हणून मी उत्तर देणार नाही कारण घरगुती वादात हार पत्करण्यातच माझं हित आहे असं जुने लोक सांगून गेलेत. अहो, आपल्याच हाताने आपली रसद तोडायला मी काय मूर्ख आहे काय?
:)
असो. तर अशा आनंददायी मिसळपाव ला पंचवर्षीय वाढदिवसानिमित्त आणि पुढील कट्टास्वरूप वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!